थायमॉल : संरचनासूत्र

थायमॉल  हे ओवा (ट्रॅकिस्पर्मम ॲम्मी, Trachyspermum ammi), रानतुळस (ऑसिमम ग्रॅटिसिमम, Ocimum gratissimum), पुदिना (थायमस व्हल्गॅरिस एल., Thymus Vulgaris L.) इ. वनस्पतींच्या बाष्पनशील तेलामध्ये सापडते. अशा तेलांपासून थायमॉल मोठ्या प्रमाणावर मिळविता येते.  हे थायमिक अम्ल, ओव्याचे फूल, थायिम कापूर या नावांनी सुध्दा ओळखले जाते. हे जंतुनाशक आहे.

इतिहास : १७१९ मध्ये जर्मन रसायनशास्त्रज्ञ कास्पर नॉयमन (Caspar Neumann) यांनी ओवा, पुदिना, रान तुळस यासारख्या वनस्पतींच्या तेलांपासून थायमॉल वेगळे केले. परंतु १८५३ मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ     ए. लॅलेमंड (A. Lallemand) यांनी या संयुगाचे थायमॉल असे नामकरण केले आणि अनुमात्रिक सूत्र देखील (empirical formula) शोधले. १८८२ मध्ये स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ ऑस्कर वीटमान (Oskar Widman) यांनी प्रथमच थायमॉल हे संयुग प्रयोगशाळेत तयार केले.

भौतिक गुणधर्म : थायमॉल कार्बनी संयुग असून याचे रासायनिक सूत्र C10H14O आहे.याचे IUPAC नाव १-मिथिल-३-हायड्रॉक्सि-४-आयसोप्रोपिलबेंझीन असे आहे. या व्यतिरिक्त २-आयसोप्रोपिल-५-मिथिलफिनॉल आणि आयसोप्रोपिल मेटा-क्रेसॉल या नावांनी देखील हे संयुग ओळखले जाते.

थायमॉल रंगहीन स्फटिक स्वरूपात असून त्याला ओव्यासारखा गंध व चव असते. त्याचा विलयनबिंदू ५१° से. असून उत्कलन बिंदू २३२° से.आहे त्याचे विशिष्ट गुरुत्व ०.९७९ आहे.

थायमॉल स्फटिक

थायमॉल फिनॉल वर्गातील अम्लधर्मी संयुग आहे. ते पाण्यात खूप कमी प्रमाणात विरघळते परंतु क्लोरोफॉर्म, अल्कोहॉल, कार्बन डायसल्फाइड, ईथर इ. कार्बनी विद्रावकांत जास्त प्रमाणात विरघळते.

थायमॉल : संश्लेषण

संश्लेषण : मेटा-क्रेसॉलवर प्रोपिलीनची (किंवा आयसोप्रोपिल क्लोराइड किंवा आयसोप्रोपिल अल्कोहॉल) रासायनिक अभिक्रिया करून थायमॉल बनविता येते.

महत्त्वाची संयुगे : मेटा-क्रेसॉल, पॅरा-थायमॉल अल्डिहाइड, थायमॉल आयोडाइड ही थायमॉलची काही प्रमुख संयुगे आहेत.

उपयोग : मेटा-क्रेसॉल, पॅरा-थायमॉल अल्डिहाइड यांचा उपयोग अन्नपदार्थ टिकविण्याची मिश्रणे, कीटकनाशके, प्रतिजैविके, वेदनाशामके तसेच दाहविरोधक औषधे व पूतिरोधक (antiseptic) यांच्यात होतो.  थायमॉल आयोडाइड हे संयुग प्रामुख्याने दंतमंजनात व दातांतील फटी भरण्याच्या मिश्रणात वापरले जाते. त्वचेला होणाऱ्या बुरशीजन्य (fungal infection) विकारांत, घशातील व दातातील संसर्गात तसेच पोटातील कृमिविकारांत (ringworm, hookworm) थायमॉल प्रामुख्याने वापरतात. औषधात थायमॉल व त्यापासून बनविलेल्या इतर संयुगांचा उपयोग जंतुनाशक म्हणून केला जातो. त्याचबरोबर सुगंधी द्रव्यांत, दंतधावनामध्ये (toothpaste) याचा वापर केला जातो.

 संदर्भ : Gibson, Charles S. Essential principles of organic chemistry, 2016.

 समीक्षक : प्रा. श्रीनिवास सामंत