बर्टी : (शामूल; हिं. सांवा, झांगोरा; बं. श्यामा; क. उडलू; ओरिया – खिरा; पं. स्वांक; त. कुथिराईवोल्ली; ते. उडालू, कोदिसामा; इं. बार्नयार्ड मिलेट; लॅ. एकिनोक्लोआ फ्रुमेंटासिया; कुल – पोएसी). बर्टी या पिकाची लागवड मुख्यत्वे डोंगराळ भागांत अन्न व जनावरांचा चारा म्हणून केली जाते. हे पीक दुष्काळ परिस्थितीवरदेखील मात करू शकते. ऐतिहासिक नोंदींनुसार चीनमध्ये या पिकाची लागवड साधारणपणे ख्रिस्तपूर्व ४१५० वर्षांपूर्वी केली जात होती. भारतामध्ये बर्टी लागवड ०.९६ लाख हेक्टर क्षेत्रात असून त्यापासून ०.७३ लाख टन उत्पादन मिळते. सरासरी उत्पादकता ७५८ किग्रॅ. प्रति हेक्टरी एवढी आहे.
या वनस्पतीची लागवड भारत, चीन, जपान, नेपाळ, पाकिस्तान आणि कोरिया या देशांमध्ये महत्त्वाचे अन्न म्हणून केली जाते. जपान आणि भारतात वेगवेगळ्या जमीन व हवामानात येणाऱ्या तिच्या खूप प्रजाती आहेत. तिची वाढ वेगवेगळ्या हंगामात, तसेच कमीअधिक उंचीवरच्या सर्व भागांत केली जाते. ज्या ठिकाणी भात व इतर पिके योग्य प्रकारे वाढत नाहीत; अशा हलक्या जमिनीमध्ये बर्टीची लागवड केली जाते.
वनस्पती वर्णन : बर्टी हे वर्षायू (एक हंगाम जगणारे) तृणधान्य पीक असून उंची ०.६ ते १.५ मी. असते. त्याला तळावातून अनेक फुटवे निघून व ते वाढून झुबकेदारपणा येतो. प्रकाराप्रमाणे फुटवे कमीजास्त येतात. पाने अरुंद पट्टीसारखी लांबट व एकाआड एक असतात. पुष्पबंध (फुलोरा) खोडावर अग्रस्थ (टोकाला) असलेला परिमंजरी प्रकारचा असतो. कणिशके (फुलोऱ्यातील एकेक) सर्वसाधारणरणे एकएकटी, परंतु काही वेळा २ – ७ च्या झुबक्यांत असतात. दाणा लहान, गोल व पिवळसर पांढऱ्या रंगाचा असतो. या पिकात स्वपरागीभवन होऊन बीजधारणा होते.
पौष्टिक गुणधर्म : बर्टीचे बी हे खाद्यधान्य असून प्रति १०० ग्रॅम धान्यांमध्ये सर्वांत जास्त तंतुमय पदार्थ (१३.६ ग्रॅ.), प्रथिने (११ ग्रॅ.), कर्बोदके (५५ ग्रॅ.), ऊर्जा (३०० किकॅ.), कॅल्शिअम (२२ मिग्रॅ.), लोह (१८.६ मिग्रॅ.) असतात. तसेच थायमिन, रायबोफ्लावीन व निॲसीन ही जीवनसत्वेदेखील मुबलक प्रमाणात असतात.
हवामान, जमीन, लागवड व खते : या पिकास उष्ण व दमट हवामान मानवते. तांबडवट, फिक्कट व राखी रंगाच्या जमिनीत पीक चांगले येते. बी मुठीने जमिनीत फोकून, पेरून किंवा रोपे लावून लागवड करतात. हेक्टरी ३ किग्रॅ. बी लागते. महाराष्ट्रात रोपे तयार करून लावतात. रोपांची लागवड करताना दोन ओळींतील अंतर ३० सेंमी. व दोन रोपांमधील अंतर १० सेंमी. ठेवतात. प्रतिकूल परिस्थितीतही रोप ताबडतोब मूळ धरू शकते. या पिकाला खत देण्याची गरज पडत नाही. सुधारित खत मात्रेनुसार ४० किग्रॅ. नत्र आणि २० किग्रॅ. स्फुरद प्रति हेक्टर दिल्यास फायदेशीर ठरते.
पेरणी कालावधी : साधारणपणे १५ जून ते १५ जुलै दरम्यान पेरणी केल्यास फायदेशीर ठरते.
पक्वता कालावधी व मळणी : या पिकाचा पक्वता कालावधी ९५ ते ११० दिवस असतो. पीक काढणीसाठी तयार झाल्यानंतर पाने वाळू लागतात व कणसाचा रंग पिवळसर तांबडा होतो. तयार कणसाची खुडणी व बडवणी करतात. त्यानंतर बियाणे स्वच्छ करून घेतात. साधारणपणे नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात पीक काढणीसाठी तयार होते.
उत्पादनक्षमता : या पिकापासून साधारपणे हेक्टरी १५ ते २० क्विंटल धान्य उत्पादन मिळते.
सुधारित वाण : बर्टी या पिकाचे काही सुधारीत वाण खालील प्रमाणे –
वाण | विकसित करणाऱ्या संस्थेचे नाव | प्रसारित वर्ष |
पक्वता कालावधी (दिवस) |
उत्पादनक्षमता ( क्विं/हे.) |
को (के वि) २ | तमिळनाडू कृषि विद्यापीठ, कोईमतूर. | २००८ | ९५ ते १०० | २१ ते २२ |
डी एच बी एम-९३-३ | कृषि विद्यापीठ, धारवाड | २०१६ | ९० ते ९५ | २२ ते २४ |
डी एच बी ९३-२ | कृषि विद्यापीठ, धारवाड | २०१८ | ८६ ते ८८ | २७ |
एम डी यु-१ | तामिळनाडू कृषि विद्यापीठ, कोईमतूर. | २०१८ | ९५ ते १०० | १५ ते १७ |
फुले बर्टी-१ | महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी (महाराष्ट्र) | २०१८ | ९५ ते १०५ | १७ ते २० |
समीक्षक : डॉ.प्रमोद रसाळ