भारतामध्ये इ. स. १२०० ते इ. स. १७०० या मध्ययुगीन कालावधीदरम्यान मुस्लिम राजवट होती. ती प्रामुख्याने दिल्ली सलतनत व मोगल काळ या दोन मुस्लिम राजसत्तांत विभागली होती; मात्र सुरुवातीच्या गझनी सुलतानांच्या काळात शिक्षणाकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही. पुढे मध्ययुगीन मुस्लिम काळातील शिक्षणाचा उदय धर्मप्रसारासाठी होऊ लागला. त्या वेळी शिक्षणाकडे धर्मप्रसाराचे एक प्रमुख व प्रभावी साधन म्हणून पाहिले जाई. शैक्षणिक आणि धार्मिक सूचनांचा आदर केला जाई. या काळात मुस्लिम शिक्षणाचा फारसा प्रसार झाला नसला, तरी मुस्लिमकालीन शिक्षण उत्तम प्रतीचे होते आणि मुसलमानी अंमलातील सुलतानांनी मक्तब (प्राथमिक विद्यालय), खानकाई, दरगाह आणि विशेषत: मद्रसा (महाविद्यालये) दिल्ली, लाहोर, आग्रा, जौनपूर येथे सुरू केल्या होत्या. केवळ दिल्लीत त्या वेळी एक हजारापेक्षा जास्त मद्रसा होत्या. या शैक्षणिक संस्थांमध्ये अरबी, फार्सी, मुसलमानी, धर्मशास्त्र, न्यायशास्त्र यांचे मुल्ला-मौलवींकडून शिक्षण दिले जाई. मुसलमान अध्यापक आणि धर्मवेत्त्यांना सरकारकडून मानधन मिळत असे. लहान खेड्यांतील आणि शहरांतील मुसलमानी वस्त्यांत मक्तबा असत.
शिक्षणाची सुरुवात ‘बिस्मिल्लाह’ या संस्कारान होत असे. उत्तम हस्ताक्षर, निर्दोश शब्दोच्चार, वाचन, लेखन, पाठांतर, गणित व कुराणातील आयते यांवर भर दिला जात असे. मद्रसांमध्ये उच्च शिक्षणाची सोय होती. याठिकाणी कुराण, हदीस (पैगंबरांची वाचने), मुसलमानी विधी आणि अरबी भाषा प्रामुख्याने शिकविली जात. शिवाय व्याकरण, तर्कशास्त्र, धर्मशास्त्र, भौतिकिशास्त्र, साहित्य, न्याय तत्त्वे, विज्ञान व युनानी यांचा उच्च शिक्षणात समावेश होता. फार्सी व अरेबिक भाषा हे शिक्षणाचे माध्यम होते. पुढे मोगल काळात (१५२६ – १७०७) सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले, तरी सरकारमान्य विद्यालये थोडीच होती. उच्च शिक्षणासाठी नंतरच्या सम्राटांनी विधायक प्रयत्नही केले नाहीत. ग्रामीण भागात मशिदीतून मक्तब असत. त्यांतून मुख्यत्वे धार्मिक शिक्षणावर भर असे. मक्तब व मद्रसा (Madrasa) हीच मुसलमानांची खरी शैक्षणिक केंद्रे होती. अकबर, शहाजहान व जहाँआरा यांनी आग्रा येथे मद्रसे स्थापन केले. आग्रा, दिल्ली, जौनपूर, सियालकोट, अहमदाबाद ही इस्लामची अध्ययनाची केंद्रे होती.
इस्लाम धर्म (Islam Religion) याचा प्रसार करणे, ऐहिक जीवनात प्रगती करणे ही तत्कालीन शिक्षणाची ध्येये होती. ती साध्य करण्यासाठी विद्वान लोकांची शिक्षक पदावर नेमणूक केली जाई. जुन्या शिक्षकांचे अनुकरण करून नवीन शिक्षक तयार होत. शिक्षक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवीत व त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देत. विद्यार्थ्यांमधून हूशार विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्याकडून इतर विद्यार्थ्यांना शिकविले जात असे. याप्रमाणे वर्गनायक पद्धती अस्तित्त्वात होती. तेथे शिक्षक व विद्यार्थी एकत्र राहात असल्यामुळे त्यांच्यात पिता-पुत्रांप्रमाणे संबंध होते. कडक शिस्तीवर भर दिला जाई. सुखी जीवन व धार्मिक शिक्षण यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न मुस्लिमकालीन शिक्षणपद्धतीत केला गेला.
‘जो ज्ञानाचा शोध घेतो, तो अल्लाची उपासना करतोʼ अशी मुस्लिमांची श्रद्धा असल्यामुळे सक्तीच्या शिक्षणावर भर दिला जात असे. भारतात मुस्लिम सत्तेच्या स्थापनेपूर्वीच अन्य देशात मुस्लिम शिक्षणाला सुरवात झाली होती. मुहम्मद घोरी ( Muhammad Ghori) यांने भारतात अजमेर येथे मद्रसा स्थापन केली. फिरोजशाह यांनी मुस्लिम शिक्षणाचा विकास करण्याकरिता सुमारे तीस मद्रसा सुरू केल्या. दिल्लीतील फिरोझशाह मद्रसात शेख अब्दुल्ला नावाच्या विद्वान प्राचार्याने तर्कशास्त्र विषयाचा विस्तार करून त्यात काजी अझुद्दीन यांच्या मतलनामक ग्रंथाचा समावेश केला. जौनपूर हे मुस्लिम शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. मशिदीमध्ये छात्रालये होती. मद्रसा प्रामुख्याने शहरीभागातच होत्या. महमूद गावान यांनी १४७९ मध्ये बीदर (कर्नाटक) येथे स्थापन केलेल्या मद्रसा अल्पावधीत नावारूपास आल्या. इ. स. १५२० मध्ये जयपूरजवळील नरनौ या गावात शेर शहा यांनी एक मद्रसा सुरू केली. नरेंद्रनाथ यांच्या उल्लेखावरून अकबराच्या कारकिर्दीत (१५४२ – १६०५) हिंदू व मुसलमान एकाच मद्रसात फार्सी भाषा शिकत होते. अकबर बादशाहच्या आणि त्यानंतरच्या काळात मद्रसात धर्मशास्त्राशिवाय तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान यांसारख्या बुद्धिप्रधान विषयांना योग्य तो मान दिला जात असे. तसेच फार्सी साहित्यातील गुलिस्तान बोस्तान आणि दिवाने हाफीज यांसारखे ग्रंथ शिकविले जात. सम्राट अकबर (Akbar) यांनी आपल्या काळात अनेक शैक्षणिक बदल व सुधारणा केल्या होत्या. त्यांना शिक्षणात फार रूची होती. त्यांनी मुस्लिम अभ्यासक्रमात भारतीय तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी जीवनाभिमुख विषयांचा समावेश केला होता. भाषा मंडळ स्थापन करून अन्य भाषिक उत्कृष्ठ ग्रंथांचे फार्सीमध्ये भाषांतर करून घेतले. त्यांच्या काळात मुस्लिम पाठ्यक्रम लवचिक होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार शिकता येत असे.
भारतात आग्रा, फतेपूर, सीक्री, दिल्ली, जौनपूर, सियालकोट, अजमीर (अजमेर), लखनौ, गुलबर्गा, विजापूर, गोवळकोंडा, हैदराबाद इत्यादी ठिकाणी मुस्लिम शिक्षणाची केंद्रे होती.
संदर्भ :
- अहेर, हिरा, उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षण व शिक्षक, नागपूर, १९९५.
- गाठाळ, एस. एस., भारताचा इतिहास, परभणी, २००४.
- गायकवाड, आर. डी. भोसले, आर. एच., प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास, कोल्हापूर, २००६.
समीक्षक – सु. र. देशपांडे