विजयनगर साम्राज्याकालीन मंदिरे – भाग २

१. तिरुवेन्गलनाथ (अच्युतराय) मंदिर समूह :

तिरुवेन्गलनाथ (अच्युतराय) मंदिर समूह

दोन संरक्षक तटबंदीने वेढलेला हा मंदिर समूह १६ व्या शतकात राजा अच्युतरायाच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. एकापेक्षा जास्त आयताकृती तटबंदी आणि त्याच्या मध्यभागी मुख्य मंदिर अशी रचना म्हणजे मंदिरांच्या स्थापत्यशास्त्रातील पुढची पायरी आहे. वेंकटेश मंदिर (मुख्य मंदिर), प्रदक्षिणापथ, सभामंडप, महासभामंडप, कल्याणमंडप आणि देवीचे देऊळ अशा सर्वांचा या समूहामध्ये समावेश होतो. बाह्य बाजूकडील भिंतीच्या उत्तरेस मुख्य प्रवेशद्वार आहे. त्या गोपुरावर विजयनगर साम्राज्याची राजमुद्रा म्हणजे वराह आणि तलवार कोरले आहेत. दोन्ही तटबंदींच्या प्रवेशाद्वारांच्या चौकटीवर वैष्णव देवता कोरल्या आहेत. खुला महासभामंडप (३० स्तंभ असलेला), नंतर दोन्ही बाजूस द्वारमंडप असलेला बंदिस्त सभामंडप व त्यापुढे गर्भगृह अशा क्रमाने येथील मुख्य मंदिराची रचना आहे. गर्भगृहाच्या वर द्रविडीयन शैलीतील शिखर आहे. वेंकटेश मंदिराच्या पश्चिमेस लक्ष्मीचे देऊळ आहे, तेथील द्वारामंडपाच्या स्तंभांवर व्याल कोरले आहेत. तसेच या समूहाच्या वायव्येस शिल्पकाम केलेल्या १०० स्तंभांवर उभा कल्याणमंडप आहे. या समूहाच्या समोरील भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूस कमी उंचीचे व लहान आकारातील खुले मंडप आहेत, जेथे पूर्वीच्या काळी मोत्यांचा बाजार भरत असे.

२. विजय विठ्ठल मंदिर :

विजय विठ्ठल मंदिर

हे मंदिर विजयनगरकालीन वास्तुकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना मानला जातो. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचे आवार ५०० X ३१० फूट मोठे आहे. ह्याचे बांधकाम कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत सुरु झाले. मुख्य मंदिराच्या आवाराच्या तीन बाजूस गोपुरे आहेत. मुखमंडप, रंगमंडप आणि गर्भगृह हे विठ्ठल मंदिराचे प्रमुख भाग आहेत. मंदिराच्या उंच चौथाऱ्यावर कोनाड्यांमध्ये दशावतार कोरले आहेत. तसेच येथील रंगमंडप त्याच्या सुशोभित आणि कोरीव स्तंभसमूहांसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक स्तंभसमूह हा एकेका दगडातून कोरला आहे. आतमध्ये मंडपाचे ४ भागात विभाजन केले आहे. ग्रानाइटच्या कोरीवकाम केलेल्या छताला आधार देण्यसाठी मोठ्या आकाराच्या तुळया आणि बेळके (brackets) यांचा वापर करण्यात आला आहे. छताच्या कोपऱ्याना दिवे अडकवण्यासाठी कड्या केल्या आहेत.

विजय विठ्ठल मंदिरा समोरचा रथ

मंदिराच्या समोरील बाजूस असलेला दगडी रथ हे येथील प्रमुख आकर्षण आहे. द्रविडीयन मंदिराच्या लहानशा प्रतिकृतीप्रमाणे भासणारा आणि ४ चाके असलेला हा रथ म्हणजे गरुडाचे देऊळ आहे. हा रथ कोणार्क सूर्यमंदिर व महाबलीपुरम यांच्यासह भारतातील तीन दगडी रथांपैकी एक आहे. या मंदिरावर पूर्वी विटांचे शिखर होते पण त्याची पडझड झाली आहे. गरुड रथाच्या दोन्ही बाजूस खुले मंडप आहेत. त्यातील दक्षिणेकडील प्रमाणबद्ध (symmetrical) रचना असलेला कल्याणमंडप आजही चांगल्या स्थितीत आहे. दक्षिणेकडील गोपुराजवळ १०० स्तंभ असलेला मंडप आहे, याच्या भिंतीवर कानडी, तमिळ व तेलुगु भाषेत लेख कोरलेले आहेत .
हंपी मधील या ऐतिहासिक वास्तुंना युनेस्कोतर्फे जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळालेला आहे.

 

 

संदर्भ : 

ग्रंथ –
Hampi Vijayanagar, by John M Fritz & George Michell
Karnataka : A garden of Architecture, Dr. A.V. Narasimha Murthy & Dr. R. Gopal

वेबसाईट –
http://hampi.in/hazara-rama-temple
• http://www.vijayanagara.org/html/ramachandra.html
• https://www.thinkingparticle.com/sites/default/files/imagecache/node-gallery-
• display/Achyutaraya%20temple%20from%20Mathanga%20Hill%20at%20Hampi.jpg
• http://tourmet.com/wp-content/uploads/2014/12/Vijaya_Vittala_temple_Hampi.jpg

समीक्षक : श्रीपाद भागवत