रेम कूल्हास  (१७ नोव्हेंबर १९४४ – )

रेम कूल्हास हे डच वास्तुविशारद, वास्तुविषयक सिद्धांतवादी, अर्बनिस्ट (शहर-रचना व नियोजन तज्ज्ञ), हार्वर्ड विद्यापीठातील ग्रॅज्युएट स्कूल ऑफ डिझाईनचे प्रोफेसर आणि एकविसाव्या शतकातल्या सर्वोत्कृष्ट वास्तुतज्ज्ञांपैकी एक म्हणून जगप्रसिद्ध आहेत. त्यांनी लंडनमधील आर्किटेक्चरल असोसिएशन स्कूल ऑफ आर्किटेक्चर आणि न्यूयॉर्क येथील इथाका येथील कॉर्नेल विद्यापीठातून वास्तुविज्ञानाचा अभ्यास पूर्ण केला. ते ओ.एम.ए.चे (द ऑफिस फॅार मेट्रोपॉलिटन आर्किटेक्चर ) व रॉटरडॅम येथील त्याच्या संशोधन-आधारित ए.एम.ओ.चे संस्थापक भागीदार आहेत. २००५ मध्ये त्यांनी मार्क विगले आणि ओले बौमन यांच्यासह वॉल्यूम मॅगझिनचे सह-संस्थापक केले.

   रेम यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९४४ रोजी नेदरलंडच्या रॉटरडॅम मध्ये झाला. त्यांचे वडील अँतॉन कूल्हास आणि आई सेलिंडे पिटर्ट्झ रोझेनबर्ग. रेम यांचे वडील उपन्यासकार, टीकाकार आणि पटकथालेखक होते. तर आजोबा डर्क रोसेनबर्ग हे आधुनिकतावादी वास्तुतज्ज्ञ होते, स्वत:ची व्यवसाय सुरु करण्यापूर्वी, त्यांनी हेंड्रिक पेट्रस बर्लेजसाठी काम केले. १९७५ मध्ये आर्किटेक्ट एलिया झेंगेलिस, झो झेंगेलिस आणि मॅडेलन व्ह्रिसेनडॉर्प (कूल्हास यांची पत्नी) यांच्यासह लंडनमध्ये त्यांनी ओएमए कार्यालयाची स्थापना केली. ओएमएच्या कामातूनच कूल्हास सर्वप्रथम लोकांच्या व टीकाकारांच्या नजरेत आले. १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धातील तत्कालीन प्रभावी उत्तरआधुनिक अभिजाततावाद आणि ओएमएचा वेगळेपणा प्रथम  १९८० च्या व्हेनिस बिनालेमधील (द्विवार्षिक प्रदर्शन)  त्यांच्या ‘प्रेझेन्स ऑफ द पास्ट’ योगदानातून दिसून आला.

रेम वास्तुविशारद होण्यापूर्वी पत्रकार होते. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी वास्तुविज्ञानाचा अभ्यास सुरु केला. रेम म्हणतात, ‘वास्तुबांधकामाचा अभ्यास सुरु करण्याआधी पुस्तक लिहिण्याचा मोठा फायदा महणजे मला काम मिळण्यात मदत झाली, पण त्याचा वाईट परिणाम असा झाला की माझ्या पुढील वास्तुविज्ञानाच्या कामाला पुराव्यांच्या जोरदार ओझ्याला सामोरे जावे लागले.’ रेम यांचे पहिले पुस्तक डिलिरियस न्यूयॉर्कने त्यांच्या कारकिर्दीची गती वाढविली. ‘शहर एक व्यसन लावणारे मशीन आहे ज्यातून सुटका नाही’ असे रेम त्यात म्हणतात.  कूल्हास यांचे महत्त्वपूर्ण प्रकाशन एस, एम, एल, एक्सएल  (ब्रूस माऊ, जेनिफर सिग्लर आणि हान्स वेरलेमॅन सह लेखक १९९५), हे एक १३७६ पानांचे विद्वत्तापूर्ण पुस्तक आहे ज्यामध्ये  निबंध, घोषणापत्र, डायरी, कल्पनारम्य प्रवास आणि समकालीन शहरांवर चिंतन याचा समावेश आहे.

सेंट्रल टेलिव्हिजन मुख्यालय, चीन.

वास्तुकलेचे स्वरूप व सामाजिक भूमिकेवर आपला अभिप्राय मांडताना सीटीबीयूएच अवार्ड सिंपोझियम (२०१३) येथील प्रेझेंटेशनमध्ये कूल्हास म्हणाले, ‘जेव्हा मी माझे अलीकडील पुस्तक कंटेंट (२००३) प्रकाशित केले, तेव्हा त्यात ‘किल द स्काईस्क्रेपर’ नावाचा एक लेख प्रसिद्ध झाला. गगनचुंबी इमारतीच्या स्वरुपाचा वापर व विनियोग याबद्दल मूलभूतपणे मला निराशा वाटते.  गगनचुंबी इमारतीमध्ये सर्जनशीलता राहिली नाही. म्हणूनच मी गगनचुंबी इमारतीच्या विरोधात एक मोहीम सुरू करण्याचा प्रयत्न केला.’

मॅककॉर्मिक ट्रिब्यून कॅम्पस सेंटर, शिकागो, यूएसए.

 

रेम कूल्हास यांना प्रित्झकर पुरस्कार (२०००), चेवालियर लीजियो दि ऑनर (२००१), प्रेमियम इम्पेरिअले (२००३), रॉयल गोल्ड मेडल (२००४), कॅथॉलिके युनिव्हर्सिटिट लियूव्हन यांचे डॉक्टर ऑनरिस कोसा (२००७), वेनिस द्विवार्षिक वास्तुकलाचे गोल्डन लायन लाईफटाईम अचीवमेंट (२०१०) असे पुरस्कार मळाले आहेत. २००८ मध्ये, टाइम मॅगझीनच्या जगातील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींच्या यादीत  रेम यांचे नाव होते.

नेदरलॅंड दूतावास, बर्लिन (२००३), सिएटल सेंट्रल लायब्ररी (२००४), कासा दा म्युसिका, पोर्टो (२००५), सेंट्रल टेलिव्हिजन मुख्यालय, चीन  (२००९), डी रॉटरडम (२०१३), कतार नॅशनल लायब्ररी, (२०१७) हे रेम यांची काही प्रसिद्ध कामे. काही टिकाकारांच्या मते रेम यांचे काम विसंरचना (डिसकस्ट्रक्शन) चळवळीतील आहे, तर काहींच्या मते ते उत्तरआधुनिक आहे.  रेम यांचे काम वादग्रस्त असले तरीही ते अद्वितीय आहे.

सिएटल सेंट्रल लायब्ररी, यूएसए.

 

संदर्भ :

ग्रंथ –

  • Peltason R. , Ong-Yan G. , P. ( 2010) The Pritzker Prize Laureates In Their Own Words London: Thames and Hudson

वेबसाईट –

समीक्षक:  श्रीपाद भालेराव