वास्तुशास्त्रज्ञ अधिनियम, १९७२ (१९७२ चा अधिनियम क्रमांक २०) [The Architects Act, 1972 (Act no. 20 of 1972]
उद्दिष्ट : देशातील वास्तुशास्त्रज्ञांच्या नोंदणीसाठी आणि त्याविषयक संबंधित अन्य बाबींच्या हाताळणीसाठी हा कायदा विधिमंडळाने प्रजासत्ताकाच्या तेविसाव्या वर्षात संमत केला.
प्रकरण १: औपचारिक सर्व : विविध संज्ञा आणि या कायद्याचे नाव आणि लागू असण्याच्या व्याप्तीचे क्षेत्र इत्यादी बाबी समाविष्ट आहेत.
प्रकरण २: कौंसिल ऑफ आर्किटेक्टचर (वास्तुशास्त्र परिषद) या प्रकरणात ‘भारतीय वास्तुशास्त्रज्ञ संस्था’ या संस्थेच्या स्थापनेबाबत आणि संस्थापनेबाबत सर्व तपशील जसे की सदस्यांचे विभाग, पदसिद्ध सदस्य आणि त्यांचा कार्यकाल, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीची पद्धत आणि त्यांचे अधिकार आणि कार्यकाल, त्या संस्थेचे कार्यालय आणि कामे इत्यादी तपशील नमूद करण्यात आला आहे. यामध्ये प्रमुख काम म्हणजे देशातील विविध शैक्षणिक संस्थांनी दिलेल्या पदव्या आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक पात्रता निश्चित करून त्यानुसार व्यावसायिक वास्तुशास्त्रज्ञांच्या नोंदणीच्या दृष्टीने मानक निश्चित करणे आणि त्यानुसार नोंदणी करणे हे असते. प्रकल्पांसाठी इमारतीच्या संकल्पनेची स्पर्धा ठेवावयाची झाल्यास त्यासाठी मार्गदर्शक सूत्रे आणि त्यामध्ये वास्तुशास्त्र परिषदेचा सहभाग याबाबतचा तपशीलही देण्यात आला आहे.
यामध्ये काही अधिकार केंद्र शासनाकडेही ठेवण्यात आले आहेत.
प्रकरण ३: वास्तुशास्त्रज्ञांची नोंदणी – या प्रकरणात कायदा अंमलात आल्यानंतर प्रथमतः आणि त्यानंतर कशी नोंदणी करावी याबाबतची पद्धत, शुल्क लागणारी कागदपत्रे, इत्यादी बाबी सविस्तरपणे नमूद केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे नोंदणीच्या मुदतीत वाढ आणि तत्सम बाबीही नमूद आहेत.
प्रकरण ५: संकीर्ण – संस्थेच्या कार्यवाहीसाठी विविध बाबी आणि संबंधित मात्र स्वतंत्र असणाऱ्या बाबी या प्रकरणात नमूद आहेत. यामध्ये प्रामुख्याने नियम आणि विनियम तयार करण्याचे अधिकार आणि अनुषंगिक व्यावसायिक क्षेत्र याबाबत तरतुदी आहेत.
परिशिष्ट : या मध्ये कायदा संमत करीत असता विचारात घेण्यात आलेल्या शैक्षणिक पात्रतेचा तपशील देण्यात आला आहे. यामध्ये काही आंतरराष्ट्रीय शैक्षणिक पात्रता ही नमूद आहेत.
संदर्भ :
- वास्तुशास्त्रज्ञ अधिनियम, १९७२ (सन १९७२ चा अधिनियम क्र.२०), संचालक, शासनमुद्रण व लेखनसामग्री, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००७.
समीक्षक : श्रीपाद भालेराव