एकात्मिक वसाहत
परवानाधारक विकासकाने अथवा कंपनीने रचलेली व विकसित केलेली स्वयंपूर्ण वसाहत म्हणजेच एकात्मिक वसाहत. अशी वसाहत बांधकामाच्या सर्व नियम व अटींनुसार निर्माण केलेल्या असून त्यामध्ये कामाचे व राहण्याचे ठिकाण सर्व सोई-सुविधायुक्त असतात. एकात्मिक वसाहत सामुदायिकरित्या राहण्याचे ठिकाण असून येथे ‘कामासाठी कार्यालयात चालत जाणे’ ही मुख्य संकल्पना राबवली जाते. ह्या वसाहतीमध्ये कुटुंबाला लागणारी दैनंदिन गरजेची ठिकाणे जसे दुकाने, दवाखाने, शाळा, कार्यालये, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घरांच्या आजुबाजूला विकसित केलेली असतात. एकात्मिक वसाहतीमध्ये घरे, व्यावसायिक जागा, रस्ते, पूल, दळणवळणाची साधने अशा शहरी व प्रादेशिक पायाभूत सुविधा एकत्रितरित्या विकसित केलेल्या असतात. ‘संबंधित पायाभूत सुविधा ‘ ह्या एकात्मिक वसाहतीचा महत्वाचा भाग असतो.
एकात्मिक वसाहतीला शाश्वत शहरी विकासाकडे नेणारी काही वैशिष्टे –
- पर्यावरणपूरक बांधकाम, अल्प बांधकाम खर्च, पाण्याची साठवण करून त्याचा पुनर्वापर, कचरा वर्गीकरण.
- ऊर्जा कार्यक्षम घरे, पुनर्वापर योग्य ऊर्जा स्रोत, हवा व सौर ऊर्जा, ऊर्जेच्या वापरावर देखरेख करणारी प्रणाली, इंधन कार्यक्षम वाहतूक प्रणाली.
- एकात्मिक कचरा व्यवस्थापन, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर.
- वसाहतींच्या आजूबाजूला व वसाहतींमध्ये पायाभूत सुविधा, विकासकाने सार्वजनिक व खाजगी भागीदारीतून पुरवलेल्या सुविधांचे गुणवत्ता सुधारण व आधुनिकीकरण.
- चालणे, काम करणे व खेळणे संकल्पना, अल्प वाहतूक खर्च, कमी इंधनाची आवश्यकता, सार्वजनिक वाहतुकीस प्रोत्साहन, वाढीव मानवी कार्यक्षमता, वेळ वाचविणाऱ्या मानव संसाधनांचा वापर.
- खाजगी पुढाकार, स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिकांवरचे कमीत कमी अवलंबित्व.
- बांधकाम खर्च नियंत्रित करण्याकरता वसाहतींच्या विविध पायाभूत सुविधांचे एकत्रितपणे बांधकाम.
- संपूर्ण जागेसाठी एकाच प्रकारच्या बांधकाम साहित्याचा वापर, एकच कामगार गट व त्यांचे एकत्रित प्रशिक्षण कार्यक्रम
- घरे व कार्यालये विकण्यास वापरण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी नियोजनपूर्ण व योग्य तंत्रज्ञानाचा वापर.
अशाप्रकारे शहरी रहिवाशांना जागतिक दर्जाचे गुणवत्तापूर्ण जीवन देण्यासाठी विकसित केलेल्या एकात्मिक वसाहत ह्या संकल्पनेची व्याप्ती अफाट आहे. शिक्षणापासून ते रोजगार व मनोरंजनापर्यंत सर्व संधी एकाच एकात्मिक वसाहतींसारख्या प्रकल्पात असल्याने इतर शहरांच्या तुलनेत शाश्वत विकास धोरणांमध्ये या वसाहती उल्लेखनीय ठरतात. अशा वसाहतींमध्ये नैसर्गिक व कृत्रिम वातावरणाचा योग्य समन्वय असतो. भारतात पुष्कळशा राज्यांमध्ये एकात्मिक वसाहत धोरणे अंमलात आणलेली दिसून येतात. राज्य सरकार खाजगी बांधकाम क्षेत्राला एकात्मिक वसाहत विकसित करण्यास प्रोत्साहन देते. ज्यामधे सुरक्षा, रस्ते देखभाल व प्रशासन हे सर्व विकासकांकडून व्यवस्थापित केले जातात. अशा प्रकारच्या वसाहती ह्या स्मार्ट व आधुनिक शहरी केंद्रे म्हणून विकसित होऊ शकतात, ज्यामध्ये तंत्रज्ञान, संशोधन व पर्यावरण ह्यावर प्रामुख्याने भर दिला जातो.
समीक्षक : श्रीपाद भालेराव