व्हर्सायचे उद्यान, फ्रांस
व्हर्सायच्या राजमहालाच्या पश्चिम दिशेला जवळजवळ आठशे हेक्टर जमिनीवर पसरलेला हा विस्तीर्ण उद्यान फ्रेंच बरोक गार्डन शैलीचा एक उत्तम नमुना आहे. दरवर्षी सुमारे सहा दशलक्ष पर्यटक या स्थळाला भेट देतात. फ्रान्सचा राजा लुई (तेरावा) याने १६३० साली सुरू केलेल्या या महाल व उद्यानाच्या कामाचा विस्तार राजा लुई (चौदावा) याच्या राजवटीत झाला. १६६१ साली आंद्रे ल नोत्र या उद्यान रचनाकाराने या उद्यानाची संकल्पना मांडली. वास्तु रचनाकार लुई ल वू आणि चित्रकार चार्ल्स ल ब्रून यांचेही योगदान या उद्यानाच्या निर्मितीस लाभले.
राजमहालातून पश्चिम दिशेला बघितल्यास नजर पोहोचेल तिथवर या उद्यानाचा विस्तार आहे. त्याची रचना अतिशय प्रमाणबद्ध व सममितिक पद्धतीने केली असून त्यात अनेक प्रकारची तळी व कारंजी, शोभिवंत फुलांचे भरतकाम केल्याप्रमाणे जमिनीवर रचलेले ताटवे, वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित शिल्पे, वेली व झुडपे यांनी झाकलेल्या लहानमोठ्या बागा इ. घटकांचा समावेश केला आहे.
या उद्यानाची रचना पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण अशा दोन प्रमुख अक्षांभोवती केली गेली आहे. महालाला लागून लगेच खालच्या स्तरावर उत्तर पादचारी (शोभिवंत ताटव्यांची विशिष्ट मांडणी), दक्षिण पादचारी व जल पादचारी आपल्या गुंतागुंतीच्या अशा नक्षीदार रचनेमुळे लक्ष वेधून घेतात. ही नक्षी प्रामुख्याने वनस्पतींना वेगवेगळे आकार देऊन निर्माण केली आहे. महालापासून पश्चिमेकडे जाणारा प्रमुख मार्ग व त्याला काटकोनात तसेच तिरके छेद देणारे अनेक लहान मोठे पथ, नेमक्या भौमितिक नियमांनी बद्ध आहेत. या सर्व मांडणीमध्ये फ्रेंच रचनाशैलीचे वैशिष्ट्य असणारी शिस्तबद्धता व औपचारिकता प्रकर्षाने जाणवते.
आंद्रे ल नोत्रच्या आराखड्याप्रमाणे राजमहालाच्या पश्चिमेकडे वेगवेगळ्या स्तरांवर बागकामासाठी सपाट भूभागाची निर्मिती केली गेली. त्यासाठी प्रचंड प्रमाणात मातीचे उत्खनन व पुनर्रचना करण्यात आली. सगळ्यात सखल भागात क्रुसाच्या आकाराचा भव्य कालवा (पूर्व-पश्चिम अक्षाची लांबी १.६ किलोमीटर व रुंदी ६२ मीटर) निर्माण करण्यात आला. या जलाशयात व त्याच्या काठावर अनेक राजसोहळे पार पडत असत. तसेच घनदाट झाडी असलेल्या वनांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून खास शिकारीसाठी काही मार्ग व वाटिका तयार करण्यात आल्या. दुतर्फा विविध झाडे, शिल्पे आणि शोभिवंत फुलांचे ताटवे असलेले रुंद पथ या उद्यानाचे वैशिष्ट्य आहे. फ्रेंच राजांच्या राजवटीत या बागेत अनेक सोहळे व्हायचे तेव्हा राजा, सरदार मंडळी आणि इतर पाहुणे याच मार्गांवरून फिरता फिरता बागेतील विविध देखाव्यांचा आनंद घेत असत. सुशोभीकरणासाठी देशाच्या निरनिराळ्या भागांमधून वृक्ष आणण्यात आले. महालाला लागूनच निर्माण केलेल्या ‘ऑरेन्जरी’ बागेत तर पोर्तुगाल, स्पेन व इटली या देशांमधूनही विविध वनस्पती मागवण्यात आल्या.
निरनिराळ्या संकल्पनांवर आधारलेले व पाण्याची विविध रूपे साकारणारे जलाशयसुद्धा ह्या उद्यानाचे वैशिष्ट्य आहे. आकाशाला प्रतिबिंबित करणारी शांत तळी, हिरवाईने वेढलेल्या रायांमध्ये खळाळून वाहणारे धबधबे व वैज्ञानिक रीतीने गुरुत्वाकर्षणाचा वापर करून पाणी पुरवठा केलेली असंख्य कारंजी संगमरवरी शिल्पांनी सुशोभित केली आहेत. यात चार ऋतूंची कारंजी व लॅटोनाचे कारंजे, अपोलोचे कारंजे इत्यादी पौराणिक संकल्पनांवर आधारित रचनांचा समावेश आहे.
ऐतिहासिक कालखंडाच्या सामाजिक, राजनैतिक तसेच सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब त्या काळात निर्माण झालेल्या वास्तुकलेमध्ये आणि भूदृश्यकलेमध्ये दिसते. प्रचंड पैसा आणि मनुष्यबळ खर्च करून निर्माण केलेला व्हर्सायचा विस्तीर्ण राजमहाल व उद्यान हे त्या काळच्या फ्रेंच राजांचे सामर्थ्य आणि रुतबा यांचे प्रतीक मानता येईल.
संदर्भ :
ग्रंथ –
- द लँडस्केप ऑफ मॅन – सर जेफ्री जेलिको व सुसन जेलिको
संकेतस्थळ –
समीक्षक : श्रीपाद भालेराव