विद्युत अपारक (विद्युत असंवाहक वा निरोधक; Dielectric) पदार्थ विद्युत क्षेत्रात ठेवल्यास त्याच्या आकारमानात किंचित बदल (यांत्रिक विरूपण) होतो. या आविष्काराला विद्युत् आकारांतर म्हणतात. गेओर्ख एच. क्व्हिंके (१८३४ — १९२४) व इतर वैज्ञाविकांनी प्रयोगांद्वारे याचे अनुसंधान केले होते. सामान्यतः विद्युत अपारक पदार्थ, ज्यांचा विद्युत अपार्यता स्थिरांक एकपेक्षा अधिक असतो अशा पदार्थांमध्ये हा गुणधर्म आढळतो, उदा., बेरियम टिटॅनेट (BaTio3).

विद्युत अपारक पदार्थांच्या स्फटिकावर (उदा., क्वॉर्ट्‌झ) विशिष्ट दिशांनी प्रतिबल (एकक क्षेत्रावरील बल) लावल्यास त्याच्या एका पृष्ठभागावर धन व दुसऱ्या पृष्ठभागावर ऋण विद्युत् भाग निर्माण होतो. यालाच स्फटिकाचे विद्युत ध्रुवण झाले असे म्हणतात आणि या आविष्काराला (सरळ) दाबविद्युत परिणाम म्हणतात. निर्माण होणारा हा विद्युत भार लावलेल्या प्रतिबलाच्या प्रमाणात असतो आणि प्रतिबल काढून घेतल्यास विद्युत भार नाहीसा होतो. याउलट विद्युत प्रतिबल काढून घेतल्यास विद्युत भार नाहीसा होतो. याउलट विद्युत असंवाहक अशा काही विशिष्ट स्फटिकांच्या विशिष्ट फलकांच्या दरम्यान विद्युत भार लावल्यास स्फटिकांत यांत्रिक विकृती (आकारमानात फेरफार) निर्माण होते. या आविष्काराला विरुध्द दाबविद्युत परिणाम म्हणतात.

विद्युत आकारांतर हे वरवर पाहता विरुध्द दाबविद्युत परिणामासारखे भासते. मात्र या दोन्हींत पुढील फरक आहेत. विद्युत आकारांतराने पदार्थाच्या आकारामानात अतिशय थोडा बदल होतो. हा फरक व्युत्क्रमी नसतो, याचा अर्थ लावलेल्या विद्युत क्षेत्राची दिशा उलट केल्यास विरूपणाची दिशा उलट होत नाही म्हणजे मूळ आकुंचनाऐवजी प्रसरण (किंवा प्रसरणाऐवजी आकुंचन) होत नाही. हा बदल जवळजवळ विद्युत क्षेत्राच्या तीव्रतेच्या वर्गाच्या सम प्रमाणात असतो आणि अशा पदार्थांचे यांत्रिक बल लावून आकारांतर केल्यास त्यावर विद्युत भार निर्माण होत नाही. याउलट विरुध्द दाबविद्युत परिणामात तेवढ्याच विद्युत क्षेत्राने पदार्थांच्या आकारामानात सामान्यपणे पुष्कळच जास्त बदल होत नाही. हा परिणाम व्युत्क्रमी असतो म्हणजे विद्युत क्षेत्राची दिशा उलट केल्यास आकुंचनाऐवजी प्रसरण (किंवा प्रसरणाऐवजी आकुंचन) होते. आकारमानात होणारा बदल हा विद्युत क्षेत्राच्या तीव्रतेच्या प्रमाणात होतो आणि यांत्रिक बलाने आकारांतर केल्यास पदार्थांच्या पृष्ठभागांवर विद्युत भार निर्माण होतात. थोडक्यात विद्युत आकारांतराचा गुणधर्म असलेले पदार्थ विद्युत क्षेत्रात ठेवल्यास आकारमान बदलतात. परंतु त्यांच्यावर दाब देऊन त्यांच्या आकारमानात जो बदल होतो त्यामुळे विद्युत भार निर्मिती होऊ शकत नाही.

विशिष्ट मृत्तिका द्रव्यांत विद्युत आकारांतराचा गुणधर्म आढळतो. श्राव्य व श्राव्यतीत [माणसाला ऐकू येऊ शकणाऱ्या कंप्रतांच्या (एका सेकंदात होणाऱ्या कंपन्यांच्या संख्यांच्या) पलीकडील] अनुप्रयुक्तीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विद्युत ऊर्जापरिवर्तकामध्ये [एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसऱ्या ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या साधनामध्ये;  विद्युत पारणी; Electric transducer] या द्रव्यांचा उपयोग करतात.

कळीचे शब्द : #दाबविद्युत #उच्चध्वनी-कंप्रता

पहा : चुंबकीय आकारांतर (Magneto-striction)

समीक्षक : माधव राजवाडे

 


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.