हॉपकिन्स, फ्रेडरिक गॉलंड (२० जून, १८६१- १६ मे, १९४७)

हॉपकिन्स यांचा जन्म इंग्लंडमधील ससेक्स (Sussex) प्रांताच्या इस्टबर्न (Eastbourne) या शहरात झाला. लंडनमधील सिटी ऑफ लंडन स्कूल येथून शिक्षणाची सुरुवात करून पुढे लंडन विद्यापीठ आणि गाईज (Guy’s) हॉस्पिटलच्या मेडिकल स्कूलमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. सध्या हे किंग्ज कॉलेज लंडन स्कूल ऑफ मेडीसिनचा एक भाग आहे). त्यानंतर १८९४ ते १८९८ या काळात त्यांनी गाईज हॉस्पिटलमध्ये शरीरक्रियाशास्त्र (physiology) आणि विषशास्त्र (Toxicology) हे विषय शिकवले.

१८९८ मध्येच, शरीरक्रियाशास्त्र संघटनेच्या बैठकीसाठी उपस्थित असताना त्यांना सर मायकेल फॉस्टर (Michael Foster) यांनी शरीरक्रियेचा रासायनिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी केंब्रिजमधील शरीरक्रियाशास्त्राच्या प्रयोगशाळेत रुजू होण्यासाठी बोलावले. त्याकाळी जीवरसायनशास्त्र ही विज्ञानाची वेगळी शाखा म्हणून ओळखली जात नव्हती. त्यांनी जुलै १९०२ मध्ये लंडन विद्यापीठातून शरीरक्रियाशास्त्रातील डॉक्टरेट (डी.एससी.) मिळवली आणि त्याचवेळी त्यांना ट्रिनिटी (Trinity) कॉलेजमध्ये जीवरसायनशास्त्राचे प्रपाठक हे पद देण्यात आले. १९१० मध्ये ते ट्रिनिटी कॉलेजचे फेलो आणि ईमॅन्युअल (Emmanuel) महाविद्यालयाचे सन्माननीय फेलो झाले. १९१४ मध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या या ज्ञानशाखेचे ते पहिले प्राध्यापक ठरले. मज्जा रसायनशास्त्रामध्ये (न्युरोकेमिस्ट्री) अग्रेसर असलेले वैज्ञानिक ज्युडाह हर्श क्वास्टेल ( Judah Hirsch Quastel)  आणि पिंडशास्त्रामध्ये (एम्ब्रायॉलॉजी)  अग्रेसर असलेले वैज्ञानिक जोसेफ  निडहॅम (Joseph Nidham)  हे त्यांचे केंब्रिजमधील विद्यार्थी होते.

सजीव पेशी त्यांच्या जटील अशाच या पचयप्रक्रियेतील ऑक्सिडेशन आणि क्षपण (रिडक्शन) क्रियेतून ऊर्जानिर्मिती कशी करतात याचा त्यांनी खूप काळ अभ्यास केला. त्यांनी १९०७ साली, वाल्टर मोर्ली फ्लेचर (Walter Morley Fletcher) यांच्या बरोबर लॅक्टिक अॅसिड (आम्ल) आणि स्नायूंचे आकुंचन यांच्यातील संबंधाचा केलेला अभ्यासही जीवरसायनशास्त्रातील एक उल्लेखनीय कामगिरी होती. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे स्नायुंमध्ये लॅक्टिक अॅसिड जमा होते हे या दोघांनी दाखवून दिले. त्यांच्या कामामुळे पुढे आर्चिबाल्ड हिल (Archibald Hill) व ऑटो फ्रिटझ मायेरहॉफ (Otto Fritz Meyerhoff) यांच्या संशोधनास चालना मिळाली. स्नायूंच्या आकुंचनासाठी लागणारी ऊर्जा ही कर्बोदक पदार्थांच्या चयापचय क्रियेतून मिळते हे त्यांनी सिद्ध केले.

हॉपकिन्स यांनी १९१२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधामुळे जास्त सुप्रसिद्ध झाले. प्राण्यांच्या खाद्यामध्ये जर केवळ शुद्ध प्रथिने, कर्बोदके, मेद, खनिजे आणि पाणी असेल तर ते प्राण्यांच्या वाढीसाठी पुरेसे नाही हे त्यांनी वेगवेगळ्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवले. नेहमीच्या सामान्य आहारामध्ये अत्यल्प प्रमाणात काही घटक असतात की जे प्राण्यांच्या वाढीसाठी आणि  अस्तित्वासाठी अत्यावश्यक असतात हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अशा काल्पनिक घटकांना सुरवातीला त्यांनी अक्सेसरी फूड फॅक्टर्स आणि नंतर व्हिटॅमिन्स असे नाव दिले. त्यांच्या याच कामाची नोंद घेऊन त्यांना ख्रिश्चन आइकमन (Christian Eijkman) यांच्याबरोबर १९२९ साली शरीरक्रियाशास्त्र व वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पहिल्या महायुद्धाच्यावेळी हॉपकिन्सनी जीवनसत्त्वांच्या पोषणमूल्यांबाबतचा  अभ्यास चालूच ठेवला होता. खाद्यपदार्थांच्या तुटवड्याच्यावेळी त्यांचे संशोधन खूपच उपयोगी ठरले. त्यांनी मार्गारीन (margarine) या कृत्रिम लोण्याच्या पोषणमूल्यांचा अभ्यास केला. यामध्ये जीवनसत्व अ आणि ड चा अभाव असल्याने ते नैसर्गिक लोण्यापेक्षा कमी पोषक असते हे त्यांनी दाखविले. यामुळेच १९२६ साली जीवनसत्वयुक्त मार्गारीनची निर्मिती झाली.

हॉपकिन्स यांनी १९२१ साली विविध प्राण्यांच्या पेशीमधील ग्लुटाथायोन हा घटक शोधून वेगळा केला आणि त्याचे विविध गुणधर्म अभ्यासले. ग्लुटाथायोन हे ग्लुटामिक अॅसिड आणि सिस्टीन या दोन अमिनो आम्लापासून बनलेले एक छोटे प्रथिन (dipeptide) आहे असे त्यांनी सांगितले. परंतु त्यांच्या या मताबाबत बरीच वर्षे एकमत नव्हते. परंतु १९२९ साली त्यांनी ग्लुटाथायोन हे ग्लुटामिक अॅसिड, सिस्टीन आणि ग्लायसिन या तीन अमिनो अम्लांपासून बनलेले असते हे सिद्ध केले. हॉपकिन्सचे काम आणि त्याचवेळी एडवर्ड केल्विन केंडाल (Edward Calvin Kendall) यांनी स्वतंत्रपणे केलेले काम यांच्यामध्ये बरेच साम्य होते.

नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त त्यांना रॉयल मेडल ऑफ रॉयल सोसायटी आणि कॉप्ले मेडल ऑफ रॉयल सोसायटी बहाल करण्यात आले. तसेच त्यांची  रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली होती तर ऑर्डर ऑफ मेरीट हा ग्रेट ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट नागरी पुरस्कार मिळाला. ते पाच वर्षे रॉयल सोसायटीचे अध्यक्ष होते. तसेच ते ब्रिटीश असोसिएशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्सचे अध्यक्ष झाले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचे केंब्रिज येथे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे