लाईशमान, विल्यम बूग : ( ६ नोव्हेंबर, १८६५ – २ जून, १९२६ )
विल्यम यांचा जन्म ग्लासगो येथे झाला व ते अतिशय उच्चशिक्षित कुटुंबात वाढले. त्यांचे वडिल डॉक्टर होते. त्यांचे शालेय शिक्षण वेस्टमिन्सटर स्कूल व डॉक्टरकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो येथून झाले.
लाईशमान लहान वयातच ग्रीक, लॅटिन व गणितात पारंगत झाले. सोळाव्या वर्षी त्यांनी शरीरशास्त्र, प्राणीशास्त्र व रसायनशास्त्रातील धडे घ्यावयास सुरुवात केली. त्या काळात २१ वय पूर्ण होईपर्यंत मेडिकलची पदवी दिली जात नसे. त्यामुळे परिक्षेत अव्वल येऊनही वय पूर्ण होईपर्यंत पदवी हातात मिळू शकली नाही.
डॉक्टर झाल्यानंतर ते सैन्यदलाच्या वैद्यकिय विभागात दाखल झाले व तीन वर्षांनी त्यांची बदली भारतात झाली. त्या काळी वझिरिस्तानमध्ये (आता पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेअंतर्गत) दौरा करायची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. स्वतः बरोबर ते सूक्ष्मदर्शक यंत्र घेऊन गेले. याच सुमारास सूक्ष्मजीवशास्त्रात संशोधन करायचा ध्यास त्यांनी घेतला व आजन्म लोककल्याणासाठी व जनमानसात आरोग्य सुधारण्यासाठी ते झटले.
आपली काही वर्षांची संशोधनाची पुंजी व वैद्यकशास्त्रातील अनुभव गाठीला बांधून ते इंग्लंडला सैन्यदलाच्या वैद्यकिय संस्थेत परतले. तेथे ते विकृतीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम पाहू लागले. १९०० साली त्यांनी काला आजार किंवा लाइशमानियॅसिस (Leishmaniasis) या जंतूंचा शोध लावला. हा आजार सॅन्डफ्लाईज (sandflies) जातीच्या माशीद्वारे फैलावतो. या माशीमध्ये लाइशमानिया डोनोवानी (Leishmania donovani) नावाचे जंतु (protozoa) परोपजीवी (parasites) म्हणून जगतात. मनुष्याला ह्या माशा चावल्या की रक्ताद्वारे हा रोग इतर लोकांमध्ये पसरतो. विल्यम लाईशमान ह्यांनी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली रक्तातील हे जंतु तपासले. डोनोवान या शास्त्रज्ञाने त्याच सुमारात लाईशमानसारखेच संशोधन केले, त्यामुळे जंतूंचे नामकरण लाइशमानिया डोनोवानी असे करण्यात आले.
लाईशमान यांनी (Leishman’s staining procedure) रंग वापरून रक्ताची तपासणी सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे करण्याचे तंत्र विकसित केले. रक्तातील लाइशमानियॅसिसचे जंतु प्रत्यक्ष बघून निदान करण्याचे हे तंत्र फारच उपयोगी ठरले. आजही मलेरियाच्या निदानासाठी ही चाचणी वापरली जाते. सैनादलाच्या आर्मी मेडिकल स्कूलमध्ये अनेक वर्षे डॉक्टरकी केल्यानंतर लाईशमान हे अत्यंत प्रतिष्ठित डॉक्टर म्हणून ओळखले जाऊ लागले. टायफॉइडची लसही त्यांनी विकसित केली. या लसीमुळे युद्धकाळात लाखो लोकांचे प्राण वाचले. लष्करात असल्यामुळे, जवानांना प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या सांसर्गिक रोगांवर लाईशमान यांनी खूप संशोधन केले. त्या काळात खंदक खणून समोरासमोर लढाई होत असे. उष्ण कटिबंध प्रदेशात लढाया होत असत, ते देखील दमट हवामानात. मलेरिया, काला आजार, ट्रेंच फीवर यासारखे आजार डास, माश्या, अस्वच्छता व कुपोषणामुळे लष्करात पसरत. आजारांचा अभ्यास करणे, सैनिकांना औषध-पाणी देणे, लसीकरण करून फैलाव थांबवणे यासाठी ते अनेक वर्षे झटले. त्यांच्या या अद्वितीय कामगिरीबद्दल त्यांना १९१९ मध्ये मेजर जनरल ही पदवी बहाल करण्यात आली.
लष्करात कर्नल, नाईट ऑफ द रेल्म (Knight of the Realm) ही पदवी, सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन ॲन्ड हायजीनचे अध्यक्ष, रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिनचे फेलो व निष्णात डॉक्टर असा त्यांचा लौकिक होता.
लाईशमान यांना मिळालेल्या अनेक सन्मानांमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोची मानद एल. एल. डी., कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ बाथ, नाईट कमांडर ऑफ द मोस्ट ऑनरेबल ऑर्डर ऑफ बाथ, नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर सेंट मायकेल ॲन्ड सेंट जॉर्ज यांचा समावेश आहे.
वयाच्या साठाव्या वर्षी लंडन, इंग्लंड येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- http://www.hharp.org/library/glasgow/doctors/william-leishman.html
- http://onlinelibrary.wiley.com/doi/10.1002/path.1700290417/pdf
- http://www.universitystory.gla.ac.uk/biography/?id=WH12916&type=P
- http://worldchanging.gla.ac.uk/article/?id=76
समीक्षक : रंजन गर्गे