लिपमन, फ्रित्झ अल्बर्ट : ( १२ जून १८९९ – २४ जुलै १९८६ )

फ्रित्झ अल्बर्ट लिपमन यांचा जन्म जर्मनीतील कोनिग्झबर्ग येथे झाला. त्यांचे वडील लिओपोल लिपमन वकिल होते. तर आई गेस्ट्रड लाचमनस्की. हे जर्मन ज्यू कुटुंब होते. लिपमनने १९१७-१९२२ या दरम्यान बर्लिनच्या कोनिग्झबर्ग विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेतले. तेथून एम.डी. ही पदवी संपादन केली. कोनिग्झबर्ग येथे शिकत असताना प्राध्यापक क्लिंगर यांच्या रसायनशास्त्राने लिपमन प्रभावित झाले. प्राध्यापक रोना यांच्या मार्गदर्शनाखाली जीवरसायनशास्त्राचा अभ्यास आमस्टडेम विद्यापीठाच्या  औषधनिर्माणशास्त्र विभागात सुरू केला. लिपमन रसायनशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी कोनिग्सबर्ग येथे परतले. १९२६ मध्ये ते ऑटोमेअरॉफ प्रयोगशाळेत सहाय्यक म्हणून रूजू झाले. नंतर ते बर्लिन येथील कैसर विल्हेल्म संस्थेत पीएच.डी. साठी काम करू लागले. याच प्रयोगशाळेत त्यांनी स्नायूमध्ये होणाऱ्या जीवरासायनिक प्रतिक्रियांवर संशोधनकेले.

लिपमन यांना रॉकफेलर शिष्यवृत्ती मिळाली आणि न्यूयार्कयेथील रॉकफेलर संस्थेत त्यांनी संशोधन केले. येथेच त्यांनी सेरिन फॉस्फेट हा फॉस्फोप्रोटिनचा घटक असतो हे शोधून काढले. नंतर ते कोपनहेगन येथील कार्लसबर्ग फौंडेशनच्या जैविकसंस्थेत संशोधन अधिकारी झाले. फायब्रोब्लास्टच्या चयापचय क्रियेचा अभ्यास करण्यात त्यांना रूची निर्माण झाली. याच काळात लिपमनने चयापच याच्या क्रियेत शर्करालयनाचे (glycolysis) महत्त्व व पाश्चर परिणाम (फर्मेंटेशन प्रक्रियेत बाधा आणणाऱ्या ऑक्सिजनचा परिणाम) यांचा संबंध दर्शविणारा महत्त्वपूर्ण शोधनिबंध प्रसिद्ध केला.

लिपमन १९३९ मध्ये न्यूयार्क येथील कॉरनेल मेडिकल स्कूल येथील जीवरसायनशास्त्र विभागात संशोधन सहकारी झाले. बॉस्टन येथील मॅसॅच्युसेट्म जनरल हॉस्पिटलमध्ये जैवरासायनिक प्रयोगशाळेत स्वत:च्या गटाचे त्यांनी नेतृत्व केले. १९४९ मध्ये बॉस्टन येथील हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये जैवरसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले.

लिपमन यांचे संशोधन शरीरातील चयापचय क्रियेतील अँसिटीलीकरण प्रक्रियेशी संबंधित आहे. एखाद्या पदार्थाची ॲसिटिक आम्लाशी किंवा त्याच्या व्युत्पन्नाशी (derivative) झालेल्या रासायनिक प्रक्रियेत ज्याद्वारा ॲसिटील समूह त्या पदार्थाशी संयोग पावतो त्याला ॲसिटीलीकरण असे म्हणतात. १९५० साली लंडनच्या लिस्टर संस्थेमध्ये त्यांनी प्राण्यांमध्ये ॲसिटील या रासायनिक समूहाचे हस्तांतरण कसे होते आणि तयार झालेले ॲसिटील फॉस्फेट हे कसे क्रियाशील ॲसिटेट आहे यासंबंधी अभ्यास केला. त्यांनी कबुतराच्या यकृतात ॲसिटीलीकरण प्रक्रिया कशी होते हे तपासून बघितले. सल्फोनामाइड ड्रगच्या अमिनो ग्रुपचे ॲसिटीलीकरण करत असतांना त्यांच्या असे लक्षात आले की विकराच्या अर्कामध्ये उच्च तापमानाला स्थिर राहणारा अत्यावश्यक असा एक घटक मिळत नव्हता जो प्राण्याच्या प्रत्येक अवयवात असतो. विकराच्या गाळण (dialysis) प्रक्रियेत  तो वगळला गेला असावा असे त्यांना वाटले.  नंतर डुकराच्या यकृतातून त्यांनी तो घटक वेगळा करण्यात यश मिळवले. हा घटक म्हणजेच कोएंझाइम-ए. कोएंझाइम-ए नावात ए चा अर्थ ॲक्टिवेशन ऑफ ॲसिटेट (activation of acetate) असा होतो.

कोएंझाइम-ए हा एक प्रथिनेतर सेंद्रिय पदार्थ आहे. तो विकराशी बांधला (Bond) गेल्या शिवाय ती रासायनिक प्रक्रिया पूर्ण होत नाही. याला सहघटक (Cofactor) असेही म्हणतात. हे सहघटक स्वतंत्रपणे रासायनिक क्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत. परंतु हा सहघटक अनेक वेळा विकराशी जोडला जाऊन वेगवेगळ्या रासायनिक क्रिया पूर्ण करू शकतो. ॲसिटील कोएंझाइम-ए हा चयापचय प्रक्रियेत अतिशय महत्वाचा सहघटक आहे. मेदाम्लांचे ऑक्सिडीकारण आणि संश्लेषण प्रक्रियेत तसेच सायट्रिक आम्ल चयापचय चक्रात पायरुवेटचे ऑक्सिडीकरण करण्याच्या प्रक्रियेत या सहघटकाचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. कोएंझाइम-एच्या संश्लेषण प्रक्रियेसाठी सिस्टीन आणि एटीपी यांची गरज भासते. या अभ्यासातून लिपमनने कोएंझाइम-ए ची रचना देखील निश्चित केली.

सजीवांच्या पेशीतील ४% विकरांना सक्रीय होण्यासाठी कोएंझाइम-ए या सहघटकाची आवश्यकता असल्याचे सध्याच्या जनुकीय अभ्यासात आढळून आले आहे.

एडॉल्फ क्रेब्ज व लिपमन यांना विभागून १९५३ मध्ये नोबेल पारितोषिक प्राप्त झाले. लिपमन यांना त्यांच्या कोएंझाइम-ए व त्याचे चयापचायसाठी महत्त्व या संशोधनास नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. या संशोधनाने कोएंझाइम–ए च्या संबंधित संशोधनाची द्वारे खुली झाली. पुढे लिपमनन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पूर्ण लक्ष कारबामिलफॉस्फेट (CMP) च्या संशोधनावर केंद्रित केले. तसेच पेप्टाइड व प्रथिनांच्या जैविक यंत्रणा व संश्लेषण यावर मुख्यत्वे संशोधन करण्याचे ठरवले. लिपमन अमेरिकेतील फॅरेडे सोसायटी, डॅनिशरॉयल अकादमी ऑफ सायंसेस व रॉयल सोसायटी इंग्लंड या संस्थांचे ते सभासद होते. ब्रान्डीस विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ लेटर्स हा बहुमान त्यांना मिळाला.

त्यांनी १९५७ नंतर न्यूयॉर्क येथील रॉकफेलर विद्यापीठात अध्यापनाचे व संशोधनाचे काम केले. १९६६ मध्ये विज्ञानाचे राष्ट्रीय पदक त्यांना प्राप्त झाले. लिपमन यांचे न्यूयार्कमध्ये निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे