शोपे, रिचर्ड एडवीन : ( १९०१ – २ ऑक्टोबर, १९६६)
शोपे यांचा जन्म डिमॉईन आयोवा (Des Moines , Iowa) मध्ये झाला. शोपे यांनी १९२४ मध्ये वैद्यकीय पदवी प्राप्त केली आणि ते आयोवा विद्यापीठात औषध निर्माणशास्त्राचे प्रोफेसर बनले. १९२८ मध्ये ते रॉकफेलर संस्थेत रुजू झालेत. त्यांनी त्यांचे क्षयरोगावरील संशोधनाच्या कामावरचे लक्ष काढून घेऊन पूर्णपणे डुकरांच्या कॉलऱ्यावर (hog Cholera) केंद्रित केले आणि त्यांची संशोधनाची कारकीर्द विषाणूशास्त्रज्ञ म्हणुन सुरू झाली. १९३१ साली रिचर्ड शोपे यांनी आजारी डुकरांमधून इन्फ्लुएन्झाचा विषाणू (Influenza virus A) शोधून काढला. १९३३ साली इंग्लडच्या वैद्यकीय संशोधन परिषदेत शोपेंच्या तंत्रज्ञानाचा वापर करून माणसापासून त्याचे कल्चर तयार केले.
जरी विषाणूच्या अस्तित्वाचा शोध अगोदर लागला होता तरी त्याची रोग निर्मिण्याची क्षमता हे शास्त्रज्ञांना कोडेच होते. शोपे यांनी जेव्हा इन्फ़्लुएन्झा हा रोग विषाणूमुळे होतो हे सिद्ध केले, तेव्हा त्यांच्या कामाचा गौरव म्हणून त्यांना १९५७ सालचा अल्बर्ट लास्कर क्लिनिकल मेडिकल रिसर्च पुरस्कार देण्यात आला.
इन्फ़्लुएन्झा या साथीच्या रोगाने १९१८ मध्ये सर्व देशभर थैमान घातले हेाते. त्याचवेळी अमेरिकेच्या मध्यवर्ती भागातील मिडवेस्टनमध्ये (Midwestern United States) डुकरांमुळे रोग पसरत होता असे निदर्शनास आले व आजारपणाचे लक्षण जीवाणू आहे असे मानण्यात आले. त्याचवेळी शोपे स्वाईन फ्लू या रोगाला कारणीभूत असलेल्या जीवाणूचा शोध घेत होते. तेव्हा त्यांना हिमोफिलस इन्फ्लुएन्झा सुइस (Hemophilus Influenzae Suis) हा जीवाणू त्यात आढळला. परंतु त्यांना असेही आढळून आले की निरोगी डुकरामध्ये या जंतुमुळे पुन्हा रोगनिर्मिती करता येत नाही. पुढे त्यांना आढळले की विषाणूसुद्धा डुकराच्या ऊतीमध्ये (tissue) वास करतो. हा जीवाणू जर डुकरात टोचला तर कमी तीव्रतेचा फ्लू निर्माण होतो. त्यानंतर शोपे यांनी जीवाणू आणि विषाणू एकत्र करून जेव्हा सशक्त डुकरात हे मिश्रण टोचले तेव्हा गंभीर रोगाची लक्षणे आढळून आली. या प्रयोगाअंती इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे होतो हे तर सिद्ध झालेच परंतु रोगनिर्मितीत विषाणू-जीवाणू हे मिश्रण कसे कारणीभूत असते हे देखील सिद्ध झाले. त्यांनी प्रयोगाद्वारे हेही सिद्ध केले की १९१८ साली बळी पडलेल्या मात्र त्यातून वाचलेल्या व्यक्तींमध्ये फ्लू आणि स्वाइन फ्लूची प्रतिपिंडे अस्तित्वात होती. परंतु १९२० नंतर जन्मलेल्या पिढीत तशी प्रतिपिंडे आढळून आली नाहीत.
त्यांना १९३२ साली सशाच्या डोक्यावर व चेहऱ्यावर लांब शिगासारखी पेशींची वाढ आढळून आली. ती देखील विषाणूची असल्याचे आढळून आले. शोपे यांनी हे निरीक्षण पेटन राउस (Peyton Rous) यांना कळवली. राउस यांनी २० वर्षापूर्वीच विषाणूमुळे कर्करोग होतो हे भाकीत केले होते.
१९३३ मध्ये शोपे यांना ससा या प्राण्यामध्ये पापिलोमा विषाणू (Papilloma virus) आढळला. तो सर्वप्रथम मानवी विषाणू म्हणून ओळखला गेला. शोपेंचे संशोधन इतरही संशोधकाच्या कार्याला सहाय्यभूत ठरणारे होते.
शोपे यांनी विषाणूजन्य रोगावर उपचारदेखील शोधून काढला. १९४२ साली त्यांनी यूरोपातील गायींना होणाऱ्या रीन्डेरपेस्ट या विषाणूजन्य रोगावर लस शोधून काढली. या विषाणूचा वापर जैविक अस्त्र म्हणून दुसऱ्या महायुद्धात वापरले जाण्याची शक्यता होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी अमेरिकेचे भूदल आणि नाविकदल यांच्यासाठी मौलिक संशोधन केले. १९४७ साली रॉकफेलरची प्रिस्टन प्रयोगशाळा बंद झाल्यानंतर शोपेमर्क संस्थेमध्ये सहाय्यक संशोधक म्हणुन रुजू झाले त्यानंतर रॉकफेलर संस्थेच्या न्यूयार्क कार्यालयात काम करण्यासाठी परत आले. शोपे हे नॅशनल ॲकडमी व अमेरीकन फिलॉसॉफिकल सोसायटीचे (National Academy of Sciences and the American Philosophical Society) सदस्य होते. असोसिएशन ऑफ अमेरीकन फिजीशियन आणि अमेरिकन सैन्याचे कोबर पदक देऊन गौरविण्यात आले.
संदर्भ :
- http://centennial.rucares.org/index.php?page=influenza
- https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2118275/
- https://www.linkedin.com/in/richardshope
समीक्षक : रंजन गर्गे