भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे :  (स्थापना – २००६)

भारतात उत्तम शिक्षण देणाऱ्या आय.आय.टी. संस्था आहेत. त्या संस्थात अनेक विषयांचे शिक्षण घेता येते. तितक्याच उत्तम दर्जाच्या परंतु केवळ विज्ञान विषयात शिक्षण देणाऱ्या आणखी काही संस्था काढाव्यात असे भारत सरकारला वाटले आणि भोपाळ, मोहाली, कोलकाता, पुणे, बेहरामपूर, तिरुपती, नागालॅन्ड आणि तिरूवनंतपूरम या सात ठिकाणी या संस्था सुरू झाल्या. विज्ञानाचे पायाभूत शिक्षण देणाऱ्या आणि संशोधन करणाऱ्या या भारतातील अग्रेसर संस्था आहेत. या संस्थांची स्थापना भारत सरकारच्या मनुष्यबळ संसाधन मंत्रालयाने केली आणि २०१२ मध्ये या महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्था म्हणून घोषित करण्यात आल्या. भारतातील विज्ञानविषयक अभ्यासाची एका वेगळ्या प्रकाराने सुरुवात करण्याच्या हेतूने ह्या संस्था स्थापन झाल्या. संशोधन व विज्ञानाचे पायाभूत शिक्षण देणे हे आयसर संस्थांचे मुख्य उद्दिष्ट आहे. ह्या सर्व स्वायत्त संस्था असून त्या स्वतःची पदव्युत्तर आणि पीएच.डी. पदवी प्रदान करतात.

त्यातील एक म्हणजे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, (आयसर) पुणे आहे. सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय केमिकल प्रयोगशाळेच्या, इनोव्हेटीव पार्कमध्ये १००० चौ. मीटर क्षेत्रफळ जागेमध्ये वसलेल्या या संस्थेमध्ये फक्त ५ अभ्यागत प्राध्यापक आणि ४४ विद्यार्थी होते. त्या वेळच्या या लहानशा रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. सध्या या संस्थेमध्ये १२०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असून, १०६ अध्यापक व ६० कर्मचारी कार्यरत आहेत. संस्था आता स्वत:च्या ३९ हेक्टरच्या परिसरात स्थलांतरित झाली आहे. संस्थेच्या सध्याच्या परिसरात ८०,००० चौ. मी. जागा वसतीगृहासाठी असून १,१७,००० चौ. मी. जागा वेगवेगळ्या शैक्षणिक विभागांसाठी आहे. संस्थेच्या परिसरात संशोधनासाठी व वसतीगृहात राहून शिकणाऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक सोयी उपलब्ध आहेत. आयसरमध्ये वेगवेगळे अभ्यासक्रम राबवले जातात. यामध्ये विज्ञान शाखेतील पदवी व पदव्युतर शिक्षण दिले जाते. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, पृथ्वी आणि वातावरण विज्ञान, गणितातील इंटीग्रेटेड पीएच.डी. व इतर पीएच.डी. कार्यक्रम देखील येथे राबवले जातात. आयसरमध्ये पोस्ट डॉक्टरल शिक्षण देखील उपलब्ध आहे. नेचर इंडेक्स २०१६ नुसार संस्था स्तरावरील संशोधनामध्ये, आयसर देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर आहे तर जागतिक पातळीवर १३७ व्या क्रमांकावर आहे. संस्थेने एकूण १० अमेरिकन एकस्वांसाठी अर्ज केले असून त्यापैकी एक एकस्व मंजूर झाले आहे. आतापर्यंत १००० हून जास्त संशोधन आलेख प्रसिद्ध झाले आहेत. संस्थेमध्ये शिकणाऱ्या ९०% पेक्षा जास्त विद्यार्थी देश पातळीवरील व जागतिक पातळीवरील नामांकित संशोधन संस्थांमध्ये कार्यरत आहेत. संशोधनातील अनेक मानाचे पुरस्कार संस्थेने व संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थांनी मिळवले आहेत.

संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये शालेय शिक्षण आणि लोकांपर्यंत विज्ञान पोहोचवणे या गोष्टीही असून त्यासाठी संस्था सतत प्रयत्नशील आहे.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे