ब्लोएमबर्गन, निकोलस उर्फ निको : ( ११ मार्च, १९२० – ५ सप्टेंबर, २०१७ )

निकोलस ब्लोएमबर्गन या डच-अमेरिकन भौतिकीशास्त्रज्ञाने अरेषीय प्रकाशशास्त्र (Nonlinear Optics) आणि लेसर वर्णपटशास्त्र (LASER Spectroscopy) या विषयात सर्वप्रथम व मूलभूत स्वरूपाचे काम केले आहे.

निकोलस ब्लोएमबर्गन यांचा जन्म नेदरलँडमधील डॉरड्रेश (Dordrecht) येथे झाला. निको या टोपण नावाने ओळखले जाणारे निकोलस यांचे वडील रसायन अभियंता होते तर त्यांच्या आईला फ्रेंच भाषा उत्तम प्रकारे अवगत होती. त्यांच्या आईचे वडील हे गणितीय भौतिकी शास्त्रामधील पीएच्.डी. होते. घरातूनच मिळालेल्या या शैक्षणिक वारशाचा उल्लेख निको वारंवार करत. भौतिकी हा विषय अवघड आणि आव्हानात्मक असूनही तो शालेय जीवनापासूनच आवडू लागल्याचे ते सांगत.

निको यांनी उट्रेश (Utrecht) विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे भौतिकी शिकविणार्‍या ऑर्नस्टाईन (Ornstein) यांच्यामुळे एका संशोधनात मदत करण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यांचा पहिला संशोधन निबंध प्रकाशित झाला.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मन सैन्याने हॉलंडचा ताबा घेतल्यामुळे त्यांच्या अभ्यासात खंड पडला, परंतु यामुळेच निको यांना स्वयंअध्ययनाची सवय लागली. याच काळात त्यांनी प्रकाश विद्युत संसूचकातील आवाज (कुरव) (Noise in photoelectric Detectors) संबंधी काही प्रयोग केले. नाझींनी १९४३ साली उट्रेश विद्यापीठ पूर्णपणे बंद केले; त्यापूर्वी निको यांनी एम.एस्सी. समकक्ष पदवी मिळवली होती. यापुढील दोन वर्षे मात्र त्यांना घरात राहून लपतछपतच काढावी लागली.

दुस‍र्‍या महायुद्धातील यूरोपच्या पाडावानंतर अभ्यासासाठी योग्य वातावरण फक्त अमेरिकेत असल्याने १९४५ साली त्यांनी डच सरकारच्या मदतीने हॉर्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे एडवर्ड मिल्स पर्सयांचा सहाय्यक म्हणून पहिले केंद्रचुंबकीय संस्पंदन (Nuclear Magnetic Resonance) संयंत्र बनविण्याची संधी मिळाली. त्याच विद्यापीठात दोन वर्षे काम केल्यावर मायदेशातील लीडेन  विद्यापीठातून त्यांनी ‘केंद्रचुंबकीय शिथिलन’ (Nuclear Magnetic Relaxation) या विषयात पीएच्.डी. पदवी मिळवली.

पुन्हा हॉर्वर्ड विद्यापीठात येऊन निको यांनी संशोधक म्हणून काम सुरू केले. लेसर किरणांचा वापर करून अणुंतील ऊर्जा कक्षांचा अचूकतेने अभ्यास केला आणि हीच लेसर वर्णपटशास्त्र (LASER Spectroscopy) या भौतिकीमधील नव्या तंत्राची सुरुवात म्हणता येईल. तसेच तीन लेसर किरणांचा वापर करून चौथा लेसर किरण निर्माण करण्याचे तंत्र त्यांनी शोधून काढले. हाच अरेषीय प्रकाशशास्त्र (Nonlinear Optics) या नव्या संकल्पनेचा प्रारंभ होय. या संशोधनासाठी निकोलस यांना १९८१ चा नोबेल पुरस्कार आर्थर शावलोव (Arthur L. Schawlow) आणि काई सिगबान (Kai M. Siegbahn) यांच्यासह विभागून देण्यात आला.

अमेरिकन नागरिकत्व देऊ केलेल्या ब्लोएमबर्गन यांना नोबेल पुरस्काराच्या व्यतिरिक्त अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात स्टुअर्ट बॅलन्टाईन मेडल, नॅशनल मेडल ऑफ सायन्स, लॉरेन्ट्झ मेडल, डिरॅक मेडल हे प्रमुख सन्मान आहेत. बंगळुरुच्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे परदेशी व्यक्तिंसाठी असलेले सन्माननीय सदस्यत्व त्यांना बहाल केलेले आहे.

निकोलस यांनी अरेषीय प्रकाशशास्त्र आणि केंद्रचुंबकीय संस्पंदन यासंबंधी तीन पुस्तके लिहीली असून काही संशोधन पत्रिकांचे मानद संपादक म्हणून त्यांनी काम केले.

अमेरिकेतील अरिझोना येथे वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : हेमंत लागवणकर