रामन, चंद्रशेखर वेंकट : ( ७ नोव्हेंबर १८८८ – २१ नोव्हेंबर १९७० ) रामन यांचा जन्म ब्रिटिशांच्या अंमलाखाली असलेल्या मद्रास परगण्यातील (सध्याच्या तामिळनाडू राज्यातील) तिरुचिरापल्ली येथे झाला. रामन यांना प्रखर बुद्धिमत्ता लाभल्याने अवघ्या अकराव्या वर्षी त्यांनी विशाखापट्टणम येथून आपली मॅट्रीकची परीक्षा पास केली. त्यांनी मद्रास (आताचे चेन्नई) येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजमध्ये रामन यांचे वडिल  गणित व भौतिकशास्त्र या विषयांचे प्राध्यापक होते. रामन यांनी मद्रास प्रेसिडेन्सी महाविद्यालयामधून भौतिकशास्त्रात सुवर्णपदक मिळवून प्रथम क्रमांकाने बी.ए. पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी उच्चश्रेणीत मद्रास विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी संपादन केली. त्यांचे प्रकाशविषयक पहिले संशोधन विद्यार्थी दशेत असतानाच फिलॉसॉफिकल  मॅगेझीनमध्ये प्रसिद्ध झाले.

मोठ्या हुद्द्याची नोकरी सोडून ते कलकत्ता विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. संशोधनाची आवड असल्याने अध्यापनाबरोबरच विविध तंतुवाद्यांवर संशोधन केले व ब्रिटनमधील रॅायल सोसायटीला त्यावर शोधनिबंध सादर केला. ब्रिटनहून परत येताना समुद्राच्या पाण्याच्या निळ्या रंगाचे व आकाशाच्या निळ्या रंगाचे कुतूहल त्यांच्या मनात जागे झाले. भारतात परत आल्यानंतर या निळ्या रंगावर संशोधन करुन प्रकाशाचे विकिरण (स्कॅटरींग) यावर कार्य केले व आकाश निळे का दिसते याचे शास्त्रीय स्पष्टीकरण दिले.

त्याच काळात त्यांनी पारदर्शक पदार्थातून एकवर्णी प्रकाशाचे प्रखर किरण गेले तर काय घडेल याविषयी संशोधन केले. या संशोधनात त्यांना एकच तरंगलांबी असलेले प्रकाशकिरण काही पदार्थांवर पडल्यास पदार्थातील रेणूंमुळे प्रकाशकिरणांचे विकिरण होते आणि मूळ प्रकाशाच्या तरंगलांबी इतक्या किरणांबरोबरच वेगळ्या तरंगलांबी असलेले प्रकाशकिरण दिसतात, असे आढळले. त्यावरुन पारदर्शक पदार्थातून प्रकाशकिरण जाताना त्याचे विकिरण होते, हे सिद्ध झाले. त्यालाच ‘रामन परिणाम’ (रामन इफेक्ट) म्हणतात. सन १९२८ मध्ये त्यांनी आपले हे संशोधन नेचर  मासिकाला पाठवले.

रामन यांच्या संशोधनामुळे विकिरणाच्या आण्विक प्रक्रियेसंबंधीचे, रचनेसंबंधीचे जणू भांडारच खुले झाले. रामन यांच्या संशोधनानंतर केवळ दहा वर्षांमध्ये दोन हजारांहून जास्त रासायनिक संयुगांची रचना रामन परिणामाच्या मदतीने निश्चित केली गेली. लेसर किरणांच्या शोधानंतर रामन परिणाम हे शास्त्रज्ञांच्या हातातील एक महत्त्वपूर्ण साधन ठरले. या परिणामामुळे द्राव आणि वायुरूप पदार्थांमध्ये होणाऱ्या विकिरणाचा अभ्यास करणे सोपे झाले. या शोधाबद्दल रामन यांना १९३० सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.

सन १९४८ मध्ये रामन यांनी बंगळूरु येथे रामन इन्स्टिटयूटही विज्ञान संशोधन संस्था स्थापन केली. १९४३ साली डॉ. कृष्णमूर्ती यांच्या सहाय्याने त्यांनी त्रावणकोर केमिकल कंपनीची उभारणी केली. काडेपेट्यांसाठी आवश्यक असणाऱ्या पोटॅशियम क्लोरेटचे उत्पादन या कंपनीमार्फत केले जाते. ही कंपनी आता टीसीएम लिमिटेड या नावाने ओळखली जाते.

रामन यांना रॉयल सोसायटीने सदस्यत्व देऊन सन्मानित केले. त्याचप्रमाणे त्यांना सर हा किताब देण्यात आला. नोबेल पुरस्काराबरोबरच त्यांना फ्रँकलिन पदक, भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च किताब, लेनिन शांतता पारितोषिक असे अनेक सन्मान प्राप्त झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी बंगळूरूमध्ये त्यांचा मृत्यू झाला.

 संदर्भ :

समीक्षक : हेमंत लागवणकर