लेनॉर्ड, फिलिप एडुअर्ड अँटॉन व्हान : ( ७ जून, १८६२ – २० मे, १९४७ )

फिलिप लेनॉर्ड यांचा जन्म हंगेरीतील पॅाझसॉनी (प्रेसबर्ग) गावी झाला. व्हर्जील क्लॅट या शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे हंगेरीतच शालेय शिक्षण झाले. बुडापेस्ट व व्हिएन्ना येथे भौतिकशास्त्र पदवी शिक्षण आणि बर्लिन विद्यापीठात हर्मन हेल्महोल्टझ या प्रसिद्ध वैज्ञानिकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पदव्युत्तर अभ्यास केला व त्यापुढील शिक्षण त्यांनी हायडेलबर्ग विद्यापीठात जॉर्ज क्विन्के व रॉबर्ट बुन्सेन यांच्या मार्गदर्शनाखाली केले आणि तेथेच पीएच्.डी. पदवी संपादन केली. ब्रेस्लॅा विद्यापीठ, आकेन विद्यापीठ आणि हायडेलबर्ग विद्यापीठ येथे त्यांनी भौतिकशास्त्राचे अध्यापन करावयास सुरुवात केली. त्यानंतर कील विद्यापीठाने त्यांना बोलावून घेतले. तेथेही त्यांनी काम केले. त्यानंतर पुन्हा हायडेलबर्ग विद्यापीठात निवृत्त होईपर्यंत काम केले. येथे त्यांनी अध्यापन व संशोधन कार्य केले. हायडेलबर्ग येथे रेडिऑलॉजिकल इन्स्टिट्यूटची स्थापना करुन त्याचे संचालकपद फिलिप लेनॅार्डनी भूषविले.

फिलिप लेनॅार्ड यांचे पहिले संशोधन पावसाच्या रुपाने खाली पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांतील कंपने या विषयावर होते. त्यानंतर त्यांनी घनपदार्थांवर अतिनीलकिरणांचा होणारा परिणाम तसेच अतिनील-किरणांचा वायूवर होणारा परिणाम याविषयी संशोधन केले. त्याचबरोबर खाली पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांमुळे होणारी विद्युतनिर्मिती, प्रकाशामुळे होणारी विद्युतनिर्मिती (फोटो इलेक्ट्रीक परिणाम) व ज्योतींची विद्युत वाहकक्षमता यावरही त्यांनी संशोधन केले. त्याशिवाय लेनॅार्डने स्फुरदीप्ती विषयावर एक संशोधन आपले एकेकाळचे शिक्षक क्लॅट यांच्या सहकार्याने केले. कॅल्शियम सल्फाईडसारख्या स्फुरदीप्ती दाखविणाऱ्या पदार्थामध्ये अतिसूक्ष्मप्रमाणात तांबे, बिस्मथ, मँगेनीजसारखी अशुद्धी मिसळल्यास त्यांच्या प्रमाणानुसार स्फुरदीप्तीची तीव्रता बदलते हे क्लॅट-लेनॅार्ड यांनी सिद्ध केले. कॅल्शियम सल्फाईड, स्ट्राँशियम सल्फाईड व बेरियम सल्फाईड या मृदधातूंच्या सल्फाईडवरील दाब वाढवित गेल्यास त्यांचा स्फुरदीप्ती गुणधर्म कमीकमी होत जाऊन नष्ट होतो, असे संशोधन लेनॅार्ड यांनी प्रसिद्ध केले. त्यानंतर लेनॅार्डने स्फुरदीप्ती पदार्थांवर प्रकाश पडल्यास त्या पदार्थात सूक्ष्म अशुद्धींच्या रुपात असणाऱ्या अणुतून ऋणकण बाहेर पडतात आणि तो पदार्थ अंधारात ठेवल्यावर बाहेर पडलेले ऋणकण परत त्या पदार्थाकडे जातात. त्यामुळे तो पदार्थ अंधारात प्रकाशमान होतो, अशी उपपत्ती मांडली.

लेनॉर्ड यांचे प्रमुख संशोधन कॅथोड किरणांच्या संदर्भातील आहे.  ते त्यांनी सन १८८८ मध्येच चालू केले आणि त्याबद्दलच त्यांना १९०५ सालचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला. लेनॅार्डच्या संशोधनापूर्वी कॅथोड किरण प्रामुख्याने अंशत: निर्वात काचेच्या नळीत दोन्हीकडे धातूंचे दोन ध्रुव (इलेक्ट्रोड) बसवून त्यांच्या दरम्यान उच्चविभव (व्होल्टेज) ठेवल्यास कॅथोड रे निर्माण केले जात असत. अशा बंदीस्त काचेच्या नळीत, हवेच्या रेणूंच्या संपर्कात कॅथोड किरणांपर्यंत पोहोचणे अतिशय कठीण होते. त्यामुळे कॅथोड किरणांचा अभ्यास करणे अडचणीचे ठरत होते. लेनॉर्डन यांनी या अडचणीवर मात करावयाचे ठरविले. त्यासाठी त्यांनी काचेच्या नलिकेत धातूच्या खिडक्या तयार केल्या. या धातूच्या खिडक्या काचेच्या नळीच्या आतील व बाहेरील हवेच्या दाबातील फरक सोसण्या एव्हढ्या जाड तर कॅथोड किरण आरपार जाऊ शकतील एवढ्या पातळ पत्र्यापासून तयार केल्या होत्या. या खिडक्यांना लेनॅार्ड विंडोज असे म्हणतात. यातून बाहेर पडणारे कॅथोड किरण आता प्रयोगशाळेत कोठेही फिरवता येत असून त्याचा शोध आणि तीव्रता स्फुरदीप्ती रसायनांचा लेप लावलेल्या कागदाच्या सहाय्याने मोजता येत असे.

लेनॅार्डने आपल्या प्रयोगाने असेही दाखवून दिले की कॅथोड किरण ज्या माध्यमातून जातात त्या माध्यमाच्या घनतेवर कॅथोड किरणांचे शोषण अवलंबून असते. तसेच सर्वसामान्य तापमानाच्या व घनतेच्या हवेतूनही कॅथोड किरण काही सेंटीमीटरपर्यंत जाऊ शकतात आणि विखुरतात. त्यामुळे कॅथोड किरणातील कण, हवेतील कणरुपी पदार्थापेक्षा आकाराने लहान असावेत, असेही लेनॅार्ड यांनी मांडले. अतिनील किरण बाहेर पडल्यास त्या धातूंच्या अणूमध्ये असलेल्या क्वांटची (ऋणकण किंवा इलेक्ट्रॅान यांना लेनॅार्ड यांनी क्वांट हा शब्द योजला आहे.) कंपने वाढू लागतात व कंपने अधिक तीव्र स्वरुपाची झाल्यास अणूमधून क्वांट बाहेर पडू लागतात. बाहेर वेगाने येणाऱ्या क्वांटचे समजून येणारे स्वरुप म्हणजे कॅथोड किरण होय हे लेनॅार्ड यांनी दाखवून दिले.

अणूला विशिष्ट अंतर्गत रचना असली पाहिजे, अणूमध्ये मोकळी जागा असली पाहिजे असे विचार प्रथम मांडणारे शास्त्रज्ञ म्हणजे लेनॅार्ड होय. लेनॅार्डनी फोटो इलेक्ट्रीक परिणाम कसा घडून येतो याचे स्पष्टीकरण दिले व ते मान्यही झाले आहे.

लेनॅार्ड यांनी अनेक विषयात संशोधन केले असले तरी लेनॅार्ड कॅथोड किरणांच्या संशोधनामुळेच विशेष ओळखले जातात. लेनॅार्ड यांना इटली सायन्स सोसायटीचे मॅट्युसाय पदक, रॉयल सोसायटीचे रॅमफर्ड पदक, नोबेल पुरस्कार आणि फ्रँकलिन पदक अशी मानाची पारितोषिके मिळाली.

वयाच्या ८४ व्या वर्षी जर्मनीमधील मॅसॅसुएट येथे फिलिप लेनॅार्ड यांचे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : हेमंत लागवणकर