बेन्थम, जॉर्ज : ( २२ सप्टेंबर १८०० – १० सप्टेंबर १८८४ ) 

जॉर्ज बेन्थम यांचा जन्म इंग्लंडमधील प्लेमाऊथ डिस्ट्रिक्टमधील स्टॉक या ठिकाणी झाला. त्यांचे वडील सॅम्युअल बेन्थम जहाज बांधणीतज्ञ होते. जॉर्ज यांना रीतसर शालेय शिक्षण घेता आले नाही. भाषा शिकण्यात मात्र त्यांची उत्तम गती होती. वयाच्या सातव्या वर्षी जॉर्ज फ्रेंच, जर्मन, रशियन बोलू शकत होते. स्वीडनमधील अल्प वास्तव्यात त्यांनी स्विडीश भाषाही आत्मसात केली. फ्रान्समधील दीर्घ वास्तव्यात तिथल्या प्रोटेस्टंट थिऑलॉजीकल शाळेत ते हिब्रू आणि गणित शिकले. शिकत असताना वनस्पती अभ्यासक ए. पी. दे. कॅन्डॉल (A.P.de. Candolle) यांचे ‘फ्लोरा फ्रान्सकाइज’ नावाचे फ्रान्समधील वनस्पती वर्णनाचे पुस्तक त्यांच्या वाचण्यात आले. त्यातील वनस्पती ओळखण्याच्या विश्लेषणात्मक कोष्टकामध्ये बेन्थम यांना विशेष आवड निर्माण झाली. त्यांनी पाहिलेल्या पहिल्याच झाडावर त्या कोष्टकाचा उपयोग करुन पाहिला. त्यांना त्या झाडाची नेमकी ओळख मिळाली. त्यानंतर ते उत्साहाने दिसेल त्या प्रत्येक झाडाला कोष्टकातील कसोट्या लावू लागले. त्यांच्या शंका निरसनासाठी ते  इंग्रजी वनस्पतीतज्ञांना भेटत.  त्यांच्या काकांनी मात्र त्यांना कायद्याचा अभ्यास करण्यास भाग पाडले. १८३२ मध्ये एकदाच वकिलीचे काही काम पाहिल्यानंतर ते आवडीच्या वनस्पतीशास्त्राकडे वळले. केवळ आवडीमुळे हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ लंडन संस्थेचे सचिव म्हणून त्यांनी बारा वर्षे १८२९ पासून १८४० पर्यंत काम पाहिले. वयाच्या ४० व्या वर्षी बेन्थम यांनी वारसा हक्काने मिळालेली वडिलांची आणि काकांची मालमत्ता विकून पैसे मिळवले. पैशांची सोय झाल्यावर वनस्पतीशास्त्र, न्यायततत्त्वशास्त्र आणि तर्कशास्त्र या विषयांमध्ये मनाजोगते काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

बेन्थम यांचे तरुण सहकारी जोसेफ डाल्टन हूकर हे निसर्ग अभ्यासक डार्विन यांचे जवळचे मित्र होते. डार्विनच्या उत्क्रांतीच्या कल्पना मान्य करणाऱ्या पहिल्या काही व्यक्तींमध्ये ते होते. बेन्थम यांच्यावरही डार्विन यांच्या उत्क्रांती सिद्धांताचा पूर्ण प्रभाव पडला होता. यापूर्वी वनस्पतींच्या जाती निसर्गत:च ठरलेल्या असतात असा विश्वास बेंथम यांना होता. डार्विनच्या सिद्धांतामुळे त्यांचे मतपरिवर्तन झाले. एकच वनस्पती किंवा प्राणी पाहून त्याच्या जातीविषयी आपण नक्की कल्पना करू शकत नाही किंवा त्याच्या एकाच जातीवरुन त्यांच्या प्रजाती ठरवता येत नाहीत. त्यांना आपण विशिष्ट जातीचे संबोधू शकत नाही, तर केवळ विशिष्ट सजीव म्हणून ओळखू शकतो. या नव्या दृष्टीकोनामुळे ते वनस्पती वर्गीकरणाच्या शास्त्रोक्त पद्धतीच्या जवळ जाऊन पोहोचले.

बेन्थम हे स्वशिक्षित वनस्पतीतज्ञ होते. त्यांनी फ्रान्स, स्पेन, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग इ. ठिकाणी जाऊन वनस्पती प्रत्यक्ष पाहून त्यांचे वर्गीकरण केले. शुष्क वनस्पती संग्रहालय (हर्बेरियम), त्याची काळजी आणि देखभाल हे खूप खर्चिक काम आहे, असे बेन्थम यांच्या लक्षात आले. त्याचे जतन व संशोधन करण्यासाठी रॉयल बोटॅनिकल सोसायटीला पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी बेन्थम यांनी अपेक्षा व्यक्त केली आणि स्वत:चा संग्रह सरकारकडे सुपूर्द केला.

वनस्पती वर्गीकरणावरील त्यांनी लिहिलेले ग्रंथ : फ्रान्स आणि स्पेन पर्वतावरील वनस्पतींची सूची, (१८२६), सहलेखक जी. ए. वॉकर, फ्रान्स आणि स्पेन यांच्यामधील पर्वतरांगावरील वनस्पतींचा कॅटलॉग आऊटलाईन ऑफ न्यू सिस्टीम ऑफ लॉजिक (१८२७), यूरोपमधील प्रत्येक शुष्क वनस्पतीसंग्रहाला भेट देऊन तयार केलेला ग्रंथ लॅबिटोरियम जेनेरा स्पेशिज (‘Labitorium Genera species, १८३६), फ्लोरा हाँगकाँग जेनेसिस (Flora Hong Kong genesis, १८६१), फ्लोरा ऑस्ट्रेलियानसिस (‘Flora Australiensis A Description Of The Plants Of The Australian Territory’)  (१८६३-१८७८) ७ खंड, हॅन्डबुक ऑफ ब्रिटीश फ्लोरा (Handbook of the British flora:) (१८५३ – ५८) जवळ जवळ शंभर वर्ष हा ग्रंथ वनस्पती वर्गीकरणाच्या अभ्यासासाठी विद्यार्थी वापरत होते. त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. बेन्थम यांच्या निधनानंतर जोसेफ हूकर यांनी तो संपादित केला. ‘बेन्थम अँड हूकर’ या नावाने ह्या ग्रंथाला अमाप प्रसिद्धी मिळाली. पीआरओडीआर (PRODR) (Prodromus Systematis Naturalis Regni Vegetabilis (DC) या नावाने प्रसिद्ध असलेल्या वनस्पती वर्गीकरणाच्या ए. पी. कॅन्डॉल (A. P. Candolle) यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या १७ खंडांच्या कामामध्ये बेन्थम यांचा बराच सहभाग होता. यामध्ये ४७३० जातींच्या वनस्पतींचे वर्गीकरण केलेले आहे.

जॉर्ज बेन्थम यांना रॉयल मेडल, रॉयल बोटॅनिकल सोसायटीचे फेलो, लिनिअन सोसायटी ऑफ लंडनचे अध्यक्षपद, क्लर्क मेडल ऑफ रॉयल सोसायटी ऑफ न्यू साऊथ वेल्स इ. मानसन्मान मिळाले. लंडनमध्ये त्यांचे निधन झाले.

 संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा