‘त्राटक’ हे हठयोगातील षट्कर्मांपैकी एक कर्म असून ते अत्यंत मौलिक आहे असे हठप्रदीपिकेत म्हटले आहे (२.३३ ). दृष्टिदोषांनी पीडित लोकांसाठी ‘त्राटक’ ही क्रिया वरदान ठरते.
हठप्रदीपिका (२.३१) तसेच घेरण्डसंहिता (१.५३) या दोन्ही ग्रंथांमध्ये त्राटकाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे — ‘त्राटक म्हणजे एखादया सूक्ष्म वस्तूकडे, एकटक, अनिमिष नेत्रांनी अश्रुपात होईपर्यंत पाहत रहाणे’.
ॐ सारखे एखादे चिह्न, चंद्र, सूर्य, तारा अथवा एखादे रत्न हे त्राटकक्रियेमध्ये दृष्टीची एकाग्रता साधण्याचे लक्ष्य म्हणून वापरता येते. प्रकाशमय वस्तूवर त्राटक करताना प्रकाशाची तीव्रता डोळ्यांना क्लेशकारक नसावी. म्हणून सूर्य-त्राटक हे उगवत्या किंवा मावळत्या सूर्यावरच करावे. सूर्याचे तेज वाढल्यावर सूर्य-त्राटक केल्यास ते डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते. असे त्राटक करतेवेळी सूर्याचा रंग लाल-नारिंगी असावा.
बह्वंशी योगसंस्थांमध्ये ‘ज्योति-त्राटक’ ही क्रिया शिकविली जाते. या क्रियेसाठी दिव्यामध्ये तिळाचे किंवा एरंडाचे तेल वापरणे श्रेयस्कर ठरते. पर्यायाने मेणबत्तीचा उपयोगही केला जातो. एखादया अंधाऱ्या खोलीत डोळ्यांना समांतर, ४ फूट अंतरावर, मंद व स्थिर ज्योतीवर त्राटक करावे. दृष्टिदोष असल्यास जितक्या अंतरावरून ज्योत स्पष्ट दिसते तितक्या अंतरावर ध्यानासनात बसावे. त्राटकक्रिया करीत असताना चेहऱ्याचे स्नायू शिथिल ठेवावेत, चेहरा तणावरहित असावा, डोळ्यांची उघडझाप होऊ देऊ नये. ज्योतीकडे अनिमिष नेत्रांनी अश्रुपात होईपर्यंत पाहत रहावे. प्रारंभी डोळ्यांची आग होऊ लागली किंवा डोके दुखू लागले तर त्राटकाचा कालावधी एक मिनिटापर्यंतच मर्यादित ठेवावा. हळूहळू त्राटकक्रियेचा वेळ वाढवीत न्यावा. ही क्रिया करताना श्वासोच्छ्वास संथ गतीने केल्यास अधिक लाभ होतो.
त्राटकक्रिया पूर्ण झाल्यावर डोळ्यांना आराम देणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी पुढील क्रिया करतात — डोळ्यांची १०-१५ वेळा उघडझाप करणे. हाताच्या तळव्यांनी डोळे झाकून त्यांवर हलका दाब देणे. बोटांनी डोळ्यांच्या पापण्या, भुवया व आजूबाजूच्या स्नायूंचे हळूवार मर्दन करणे. तसेच ‘आय वॉश कपा’ने डोळे धुणे आणि दिवसातून २-४ वेळा डोळ्यांवर पाण्याचा शिडकावा करणे इष्ट ठरेल. हठप्रदीपिका तसेच घेरण्डसंहितेमध्ये ‘त्राटक’ ही क्रिया दृष्टिदोष-निवारणासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले आहे.
त्राटकाचे प्रकार : (१) नासिकाग्र-त्राटक (२) भ्रूमध्य-त्राटक (३) दक्षिणजत्रु-त्राटक (गळपट्टीच्या उजव्या हाडावर त्राटक) (४) वाम जत्रु-त्राटक (गळपट्टीच्या डाव्या हाडावर त्राटक) (५) उभय जत्रु-त्राटक (गळपट्टीच्या दोन्ही हाडांवर त्राटक) (६) ऊर्ध्वमुख-त्राटक (७) अधोमुख- त्राटक (८) अतिदूर व अतिसमीप वस्तूंवर आलटून-पालटून नजर स्थिर करणे. (९) डोळ्यांच्या बाहुल्या पाच वेळा घड्याळाच्या सुईप्रमाणे तर पाच वेळा विरुद्ध दिशेने फिरविणे. (१०) ज्योति-त्राटक प्रथम उजव्या डोळ्याने नंतर डाव्या डोळ्याने व त्यानंतर दोन्ही डोळ्यांनी करणे. त्राटकाच्या प्रत्येक प्रकारानंतर वर सांगितल्याप्रमाणे डोळ्यांना आराम देणे आवश्यक आहे. अनुभवी योगशिक्षकांकडून हे सर्व प्रकार नीट शिकून घ्यावेत.
एकाग्रता-स्मृति संवर्धन : त्राटकक्रिया करताना एकाग्रचित्ताने ज्योतीचे निरीक्षण करावे, ज्योतीचा आकार, रंग, रूप इत्यादी वैशिष्ट्ये मनात आणावीत. त्यानंतर हलकेच डोळे मिटावेत. काही काळ ज्योतीची प्रतिमा डोळ्यासमोर टिकून राहते. ती दिसेनाशी झाली तर आपल्या मनश्चक्षूने ज्योत पाहण्याचा प्रयत्न करावा. अर्थात ज्योतीचे ध्यान करावे. त्यामुळे चित्ताची एकाग्रता वाढते व स्मृतिसंवर्धन होते.
त्राटकामुळे डोळ्यांच्या ‘सिलिअरी’ व ‘रेक्टाय’ या स्नायूंना उत्तम व्यायाम होतो व ऱ्हस्व तसेच दीर्घ दृष्टिदोषांपासून मुक्ती मिळते. घेरण्डसंहितेत त्राटकामुळे दिव्य दृष्टीचा लाभ होतो असे सांगितले आहे.
समीक्षक : साबीर शेख