प्रज्ञा या शब्दाचा अर्थ ‘प्रकृष्ट ज्ञान’ अर्थात् संपूर्ण ज्ञान असा होतो. ज्यावेळी व्यक्तीला एखाद्या विषयाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते, तेव्हा त्या संपूर्ण ज्ञानाला प्रज्ञा असे म्हणतात. ‘ज्ञान’ हा शब्द सर्वसामान्य अर्थ प्रकट करतो, परंतु ‘प्रज्ञा’ हा शब्द विशेष अर्थ प्रकट करतो. ज्ञान हे यथार्थही असू शकते व अयथार्थही असू शकते; ज्ञान थोडेही असू शकते व संपूर्णही असू शकते; ज्ञान प्रत्यक्षही असू शकते व परोक्षही असू शकते. परंतु, प्रज्ञा म्हणजे एखाद्या वस्तूचे यथार्थ, संपूर्ण आणि प्रत्यक्ष ज्ञान होय.
योगदर्शनानुसार संयमाद्वारे म्हणजेच धारणा, ध्यान आणि समाधी या तिन्हीच्या एकत्रित अभ्यासामुळे प्रज्ञा प्राप्त होऊ शकते (योगसूत्र ३.५). एखाद्या विषयाचे यथार्थ आणि संपूर्ण ज्ञान प्राप्त करण्यासाठी चित्त हे एकाग्र अवस्थेत असणे आवश्यक आहे. धारणा, ध्यान आणि समाधी हे तिन्ही मिळून चित्ताला एकाग्रतेकडे घेऊन जाणारी प्रक्रिया आहे. ज्यावेळी चित्त समाधीमध्ये दृढ आणि स्थिर होते, त्यावेळी ज्या विषयावर चित्त एकाग्र आहे त्या विषयाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते.
एखाद्या व्यक्तीला एका विषयाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले म्हणजे अन्यही विषयांचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते असे नाही. वेगवेगळ्या विषयांचे संपूर्ण ज्ञान म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची प्रज्ञा होय. उदाहरणार्थ, नाभिचक्रावर चित्त संपूर्ण एकाग्र झाल्यास योग्याला शरीराच्या रचनेचे ज्ञान होते. शरीररचनेचे ज्ञान ही एक विशिष्ट प्रकारची प्रज्ञा होय. त्या योग्याला अन्य विषयांचे ज्ञान होईलच असे नाही. परंतु, ज्या योग्याला ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त होते, त्या योग्याला तिच्या सामर्थ्याने सर्व विषयांचे ज्ञान अनायास प्राप्त होते.
पुरुष आणि प्रकृती (त्रिगुण) यांच्यातील भेदाचे ज्ञान म्हणजेच विवेकख्याति होय. विवेकख्यातीचे संपूर्ण ज्ञान म्हणजे ऋतंभरा प्रज्ञा होय. ऋत म्हणजे केवळ सत्य अर्थाचे बोधन करवून देणारी प्रज्ञा म्हणजे ऋतंभरा प्रज्ञा होय. ही प्रज्ञा प्राप्त झाली असता योग्याला स्वत:चे म्हणजेच आत्मरूप पुरुषाचे ज्ञान प्राप्त होते व तिच्या अनुषंगाने अन्य सर्व पदार्थ जे पुरुषापेक्षा भिन्न आहेत त्यांचेही ज्ञान अनायास होते. यालाच योगाच्या परिभाषेत प्रातिभ-ज्ञान असे म्हणतात. प्रातिभ म्हणजे विश्वात असणाऱ्या सर्व पदार्थांचे चित्ताच्या सामर्थ्याने होणारे ज्ञान होय.
पहा : ऋतंभरा प्रज्ञा, धारणा, प्रातिभ (ज्ञान), विवेकख्याति, समाधि.
समीक्षक : कला आचार्य