ब्रोकर, वॉलेस स्मिथ : (२९ नोव्हेंबर १९३१ ते १८ फेब्रुवारी २०१९) आपल्याला सर्वज्ञात असणाऱ्या ‘जागतिक तापमानवाढ’ म्हणजेच ‘ग्लोबल वॉर्मिंग’ या संज्ञेचे जनक वॉलेस स्मिथ ब्रोकर यांचा जन्म अमेरिकेतील शिकागो येथे झाला. त्यांचे बालपण ओक पार्कमध्ये गेले आणि त्यांचे शिक्षण व्हिटन महाविद्यालयात झाले. ते १९५९ मध्ये कोलंबिया विद्यापीठात रुजू झाले. पृथ्वीविज्ञान आणि पर्यावरणीय विज्ञान या विषयांचे अध्यापक म्हणून त्यांनी पदभार सांभाळला. या विद्यापीठाच्या न्यू यॉर्कमधील प्रयोगशाळेत त्यांच्या कामाची खरी सुरुवात झाली. त्यांनी जागतिक तापमानवाढ या विषयावर अभ्यास करून त्याचे परिणाम जगासमोर आणले.

त्यांनी १९७० मध्ये एक्सक्सन या ऑइल कंपनीसाठी  सल्लागार म्हणून काम केले. त्या काळात त्यांनी कार्बन डाय-ऑक्साईडच्या परिणामांबद्दल अनेक शोधनिबंध लिहिले.

सन १९७५ मध्ये सर ब्रोकर यांनी ‘Climate Change: Are we on the Brink of a Pronounced Global Warming?’ या विषयावर शोधनिबंध लिहिला होता. यामध्ये जगातील तापमानवाढीचा उल्लेख करताना त्यांनी ग्लोबल वॉर्मिंग ही संज्ञा प्रथम वापरली.

त्यांनी १९८४ मध्ये अमेरिकन संसदेच्या विशेष समितीसमोर बोलताना, खनिज इंधनाच्या ज्वलनातून हरितवायूच्या निर्मितीमुळे आपण करत असलेल्या कार्बन डाय-ऑक्साईड उत्सर्जनाचा वातावरण, समुद्र, बर्फ आणि स्थलीय जीवशास्त्र यांच्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो हे सूचित केले होते. त्यांच्या मते आपण एका चिडलेल्या पशूशी खेळतो आहोत. पर्यावरणीय व्यवस्थाही अत्यंत संवेदनशील झालेली आहे. त्यांचे हे सिद्धांत बऱ्याच काळानंतर सर्व जगातील वैज्ञानिकांनी स्वीकारले.

ग्लोबल कन्व्हेयर बेल्टची संकल्पना नावारूपाला आणण्यामध्ये ब्रोकर यांचा खूप मोठा हातभार आहे. ही समुद्रप्रवाहांची (Ocean currents) एक संरचना आहे, ज्याद्वारे पाणी एकाच जागी स्थिर न राहता सतत प्रवाही राहते. पाण्याचे तापमान आणि क्षारांचे प्रमाण यावर पाण्याची प्रवाहितता अवलंबून असते. हरितगृहवायूंमुळे वाढणाऱ्या तापमानाचा समुद्रातील प्रवाहावर परिणाम होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.

ब्रोकर आणि त्यांचे सहकारी लॅकनर जागतिक हवामान बदलाविरुद्धच्या युद्धातील आघाडीचे नेते मानले जात. या दोघांच्या मते मानवजातीच्या कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात घट आणि कार्बन स्थिरीकरणात (Carbon sequestration) वाढ हे जागतिक हवामान बदल रोखण्यावरील उपाय होत. फिक्सिंग क्लायमेट  नावाच्या ब्रोकर आणि विज्ञान लेखक रॉबर्ट कुझिंग यांनी लिहिलेल्या पुस्तकात वातावरणातील कार्बन प्रक्रिया करून पुन्हा जमिनीत साठवणे हा उपाय सुचवला आहे. त्यांच्या मते इंधनांचे ज्वलन वाईट नाही, तर त्यापासून तयार होणारे इतर घटक वातावरणात सोडणे वाईट आहे. यामुळे वातावरण बदलाला हातभार लागतो.

ब्रोकर यांना कॅनडा येथील रॉयल सोसायटीतर्फे हंटस्मन पुरस्कार, वेटल्सन अवॉर्ड, भूविज्ञानातील क्रफर्ड पुरस्कार, विज्ञानक्षेत्रातील नॅशनल मेडल, वोल्स्टन मेडल, कॅलिफोर्निया विद्यापीठातर्फे टायलर पुरस्कार, बेंजामिन फ्रँकलिन मेडल मिळाले. केंब्रिज, ऑक्सफर्ड व हार्वर्ड विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट बहाल केल्या. डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार स्टीवन बॅनन यांच्यासोबत ‘बायोस्पिअर–२’ या पर्यावरणीय प्रकल्पासाठी संशोधन संयोजक म्हणून त्यांनी काम पहिले.

वॉलेस स्मिथ ब्रोकर यांनी ५०० पेक्षा जास्त वैज्ञानिक शोधनिबंध, १७ पुस्तके अशी ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. हवामानबदलामधील समुद्राची भूमिका व कार्य या विषयावर त्यांनी मुख्यत्वे ग्रंथनिर्मिती केली. रासायनिक समुद्रविज्ञान (chemical oceanography) हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय होता.

संदर्भ :

समीक्षक : सुधाकर आगरकर