प्रस्तावना : ही संकल्पना गेली तीन-चार दशके आंतरराष्ट्रीय राजकारणाचे लक्ष वेधून घेत आहे. अणुयुगाचा आधार घेऊन सुरक्षाविषयक विचार मांडताना प्ररोधन ह्या संकल्पनेला असाधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते. अगदी प्राथमिक पातळीवर पाहिले तर दुसऱ्या राष्ट्राने आपल्या राष्ट्रहिताला धक्का देणारी पावले उचलली, तर त्या राष्ट्राला आपण आपल्या संभाव्य प्रतिहल्ल्याची जाणीव करून देणे आणि ह्या प्रतिहल्ल्याच्या दहशतीद्वारे त्याला त्याच्या मूळ धोरणांच्या अंमलबजावणीपासून परावृत्त करणे, हा प्ररोधनाचा अर्थ आहे.

संकल्पनेचा उगम आणि प्रगती : प्ररोधन ह्या संकल्पनेचा खऱ्या अर्थाने वापर हा दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात अण्वस्त्रांच्या प्रवेशानंतर झालेला दिसून येतो. आण्विक रणनीतीचा प्ररोधन हा केंद्रबिंदू आहे. ह्या संकल्पनेचे सामरिकशास्त्राच्या अभ्यासात तसेच राजनीतीच्या क्षेत्रात महत्त्वाचे कार्य आहे. लष्कराचे प्राथमिक कार्य हे संभाव्य किंवा प्रत्यक्षात होणाऱ्या आक्रमणाला प्रतिरोध करणे, हे असते. लष्कराचे हे एक पारंपारिक कार्य आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कार्यात लष्कराच्या कार्याचा वाटा मोठा असतो. मात्र त्या पारंपरिक कार्याच्या वाटचालीला अणुयुगामुळे एक नवीन वळण लागले आहे. अणुबाँबच्या द्वारे पारंपरिक राजनीती, रणनीती आणि सामरिकशास्त्र यांत मूलभूत बदल घडून आले. राष्ट्रीय सुरक्षिततेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून गेला.

पारंपरिक पद्धतीत सुरक्षा ही प्रामुख्याने लष्करी बाब मानली जात असे. त्यात आक्रमणाविरुद्ध असलेली लष्करी सज्जता, सुरक्षिततेसाठी केलेले युद्ध, युद्धसिद्धता ह्यांसारख्या गोष्टींकडे प्रामुख्याने पाहिले जात होते. राष्ट्रीय सुरक्षा ही संकल्पना युद्धाच्या चौकटीतील राजनीतीत बसविलेली होती. अणुयुगाच्या आगमनानंतर ह्या राष्ट्रीय सुरक्षिततेकडे युद्धाच्या नव्हे, तर शांततेच्या चौकटीतून पाहिले जाऊ लागले. आज राजनीतीचे प्रमुख कार्य हे क्लॉझविट्सटच्या सिद्धांताच्या पलीकडे जाऊन शांततेसाठी झटण्याचा प्रयत्न करणे, हे आहे. प्ररोधनाचे प्रमुख कार्य हे शांतता अबाधित ठेवणे आणि युद्ध टाळणे, हे आहे. रणनीतीचे स्वरूप आज युद्ध टाळण्याची कला असे झालेले दिसून येते. शेल्लिंगच्या मते प्ररोधन म्हणजे प्रत्यक्ष बळाचा वापर न करता त्या बळाच्या संभाव्य परिणामांची भीती दाखवून चतुराईने युद्ध टाळणे, हा आहे.

प्ररोधनाकडे केवळ ‘संकल्पना’ म्हणून नाही, तर एक राजनीतीची ‘कला’ म्हणून देखील पाहावे लागते.

प्ररोधनाची व्याख्या करताना प्रामुख्याने एक गोष्ट आधारभूत म्हणून मानली जाते. ही व्याख्या मुख्यत्वेकरून आण्विक जगातील अण्वस्त्रधारी राष्ट्रांच्या संदर्भात आहे; परंतु त्यांच्यापुरती सीमित नाही. जागतिक राजकारण सत्तासमतोलाच्या चौकटीच्या पलीकडे जाऊन दहशतसंतुलनाकडे (balance of terror) वळले आहे. प्ररोधनाचे प्रमुख कार्य हे दुसऱ्या राष्ट्राचे मन वळविण्याचे आहे. त्याने आखलेल्या धोरणांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आहे. प्ररोधनाच्या संकल्पनेत दोन राष्ट्रांच्या (किंवा समूहांच्या) संबंधांचे अवलोकन केले जाते. ह्यात एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला (प्ररोधित राष्ट्राला) त्याने योजलेल्या नव्या धोरणात बदल करण्यासाठी, ते नवीन धोरण सोडून देण्यासाठी परावृत्त करत असते. ही परावृत्त करण्याची प्रक्रिया धमकी/दहशतीद्वारे केली जाते. ही दहशत इतकी गंभीर स्वरूपाची असावी की, त्या दुसऱ्या राष्ट्राला त्यापासून खऱ्या अर्थी सर्वनाशाचा धोका जाणवला पाहिजे.

संदर्भ :

  • Baylis, John; Booth, Ken; Garnett, John; Williams, Fill, Contemporary Strategy : Theories and Concepts, vols. 1 and 2, London, 1987.
  •  Garnett, John, Theories of Peace and Security : A Reader in Contemporary Strategy Thought, Bristol, 1970.
  •  Paret, Peter, Makers of Modern Strategy : from Machiavelli to the Nuclear Age, Oxford, 1986.
  • परांजपे, श्रीकांत, सामरिकशास्त्र, पुणे, १९९४.

समीक्षक – शशिकांत पित्रे

प्रतिक्रिया व्यक्त करा