भारतीय विज्ञान शिक्षण संस्था : (स्थापना – २७ मे १९०९)
भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर ही प्रसिद्ध उद्योजक सर जमशेटजी टाटा यांच्या कल्पनेतून साकार झालेली संस्था आहे.
सर जमशेटजी टाटा १८८३ साली जपानहून शिकागोला जाणाऱ्या जहाजातून प्रवास करीत असता त्यांची स्वामी विवेकानंद या सहप्रवाशाशी गाठ पडली. भारतात पोलाद निर्मिती सुरू करण्याचा टाटा यांचा विचार होता. त्या वेळी भारतात विज्ञान संशोधनासाठी एक स्वतंत्र संस्था असावी असेही टाटा यांना वाटले. स्वामी विवेकानंद यांच्याशी प्रवासात याबद्दल चर्चाही झाली होती. सन १९०० मध्ये त्यांच्या कल्पनेतील संस्था आकार घेत असताना त्यांनी याचा प्रस्ताव शासनाकडे मांडला. तत्कालिन नोबेल परितोषिक विजेते विल्ल्यम रामसे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली. अनेक चर्चा व विचार विंनिमयातून संस्थेचा आराखडा तयार केला गेला. अनेक परवानग्या व चौथे कृष्णराज वोडियर यांनी दिलेल्या १.५ चौरस किलोमीटर ( १४८ हेक्टर ) जमिनीवर संस्थेच्या इमारती उभ्या राहिल्या. संस्थेचे नाव इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स असे ठरवण्यात आले.
मॉरिस ट्रॅव्हर्स व विल्यम रॅमसे या दोघांनी १९०९ मध्ये झेनॉन, निऑन व क्रिप्टॉन या अभिजात वायूंचा (noble gas) शोध लावला होता. यावरील आणखी संशोधन त्यांनी या संस्थेत चालू ठेवले होते. हे दोघे संस्थेचे संस्थापक संचालक ठरले. त्यावेळी सामान्य व उपयोजित रसायनशास्त्र आणि विद्युत तंत्रज्ञान हे दोनच विभाग कार्यरत होते. ए.जी. बोर्न, मार्टिन फॉस्टर या दोन विदेशी संचालकानंतर १९३३ साली सी. व्ही. रामन या भारतीय शास्त्रज्ञाची संचालक म्हणून नेमणूक झाली. २०१४ पासून अनुराग कुमार हे सध्या संचालक म्हणून काम पहात आहेत. भारतीय विज्ञान संस्थेमध्ये आता सहा मोठ्या विभागामधून संशोधन, अध्यापन, पदव्युत्तर आणि पीएच्.डी पर्यंतचे शिक्षण देण्यात येते. जैव विज्ञान, रसायनशास्त्र, विद्युत विज्ञान, आंतरविभागीय विज्ञान, यंत्रअभियांत्रिकी, भौतिक विज्ञान आणि गणित हे ते सहा प्रमुख विभाग आहेत. याशिवाय चाळीस विविध उपशाखांमधून विद्यार्थ्यांना संशोधन करता येते.
भारतातील अनेक प्रमुख क्षेत्रांना या संस्थेमधून संशोधन केलेले वैज्ञानिक मिळाले आहेत. त्यातील प्रमुख संस्था म्हणजे, आयुध निर्माण बोर्ड (Indian ordinance factory ), डिफेन्स रिसर्च अँड डिफेन्स ऑर्गनायझेशन (डीआरडीओ), इस्रो, भारत इलेक्ट्रॉनिक्स, विमान विकास, नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी वगैरे. याशिवाय जागतिक गूगल, मायक्रोसॉफ्ट, जनरल मोटर्स, बोइंग यासारख्या उद्योगामधून आवश्यक तंत्रज्ञ व तंत्रज्ञान विकसित करणे ही कामे संस्थेमध्ये केली जातात.
या संस्थेची दुसरी शाखा बंगलोरपासून २२० किलोमीटरवर चेल्लाकेरे येथे चित्रदुर्ग तालुक्यात ६०० हेक्टर जमिनीवर वसली असून २०११ सालापासून बुद्धिमत्ता विकास केंद्र येथे कार्यरत आहे. गेल्या पाच वर्षात अकरा हजार शिक्षकांना येथून कौशल्य विकास योजनेतून प्रशिक्षित केले आहे.
या सर्व विभागातून काम करणारे अनेक संशोधक व विद्यार्थी यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे. भारतातील एक अग्रणी संस्था एवढेच नव्हे तर एक आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था म्हणून ही नावारूपाला आली आहे. या संस्थेस स्वायत्त संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे.
संदर्भ :
समीक्षक : मोहन मद्वाण्णा