सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स रासायनिक द्रव्ये कीटक, बुरशी, जीवाणू आणि चराऊ प्राण्यापासून रक्षण करण्यासाठी वनस्पतींमध्ये तयार केली जातात. उपलब्ध सपुष्प वनस्पतींपैकी सु. २७०० वनस्पतींमध्ये ६० प्रकारची सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स आढळतात. वनस्पतींमध्ये उत्पन्न होत असलेली ही रसायने उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांत स्वसंरक्षणार्थ तयार झाली असावीत असे संकेत मिळाले आहेत.
ज्ञात असलेल्या सायनोजेनिक वनस्पतींपैकी सु. ३३० वनस्पती भारतामध्ये आढळतात. दैनंदिन जीवनात वापरण्यात येणार्या अनेक वनस्पतींमध्ये ही रसायने आढळतात. ग्लायकोसाइड्सच्या विघटनामुळे निर्माण होणारे प्रुसिक ॲसिड (हायड्रोजन सायनाइड) मानवी शरीर आपल्या नैसर्गिक क्षमतेआधारे पचवू शकते. हे प्रमाण दशलक्षात १०० ते १५० भाग (ppm) एवढे अल्प आहे. या प्रमाणापेक्षा जास्त वनस्पतीजन्य विषारी पदार्थ शरीरामध्ये गेल्यास विषबाधा होते. आपल्या आहारातील सायनोजेनिक वनस्पतींपैकी साबुदाणा, जवस, कडू बदाम, अक्रोड यांचा यामध्ये समावेश होतो.
शेतामध्ये सु. ०.५ मी. उंचीच्या ज्वारीच्या रोपामध्ये या द्रव्याचे प्रमाण भरपूर असते. अशी रोपे चराऊ जनावरांनी खाल्ली, तर त्या जनावरास विषबाधा होते, त्यामध्ये त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. म्हणून शेतकरी अशी खुजी रोपे शेताच्या काठाने लावून ज्वारीच्या पिकाचे रक्षण करतात.
दक्षिण आफ्रिकेत ‘कसावा’ (Manihot esculenta) हा कंद मुख्य खादय पदार्थ म्हणून वापरला जातो. त्यामध्ये दशलक्षात ८०० भाग प्रुसिक ॲसिड असते. योग्य प्रक्रिया न केल्यास यापासून अर्धांगवायूसारखे आजार होतात. भारतात काही ठिकाणी कसावापासून साबुदाणा तयार करतात; परंतु त्यामध्ये दशलक्षात फक्त २० भाग प्रुसिक ॲसिड असते, म्हणून त्याचे सेवन सुरक्षित असते. नवीन संशोधनात असे आढळले आहे की, या सायनोजेनिक वनस्पतींचा कॅन्सरच्या निदानामध्ये आणि उपचारामध्ये महत्त्वाचा उपयोग होऊ शकतो.
संदर्भ :
- Bernays E.A.,Chapman,R.F. “Plant Secondary Compounds and Grasshopper Beyound Plant Defence.” Journal of Chemical Ecology, V.26(8):pp.1773-1794, 2000.
- Bradbury J.H.,Bradbury M.G. and Egan S.V. “Comparison of methods of analysis of Cyanogens in Cassava” Acta Hart. 375:87-96,1994.
- Chillawar R.G. and Omprakash Rathor, “Cyanogenic Plants of India”, Verlag Publishers: LAP LAMBERT Academic Publishing house. ISBN:978-3-330-08554-1, 2017.
समीक्षक : शरद चाफेकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.