दोशी, वालचंद हिराचंद : (२३ नोव्हेंबर १८८२ – ८ एप्रिल १९५३) एकोणिसाव्या शतकात गुजरातमधील सौराष्ट्र भागातून प्रतिकूल परिस्थितीमुळे दोशी कुटुंब उद्योगासाठी महाराष्ट्रात आले आणि इथेच त्यांनी व्यापार सुरू केला. एका जैन धार्मिक दोशी कुटुंबात श्री. हिराचंद आणि सौ. राजुबाई या दांपत्याच्या पोटी सोलापूर येथे वालचंद यांचा जन्म झाला. बालपणीच त्यांची कुशाग्र आणि सर्जनशील बुद्धी लक्षात आल्यामुळे वडलांनी त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवले. धार्मिक एकत्र कुटुंबामुळे, त्यांच्यावर बालवयात सामाजिक बांधिलकीचे संस्कार झाले. सोलापूर, पुणे आणि औरंगाबाद येथे त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी बी.ए. साठी प्रवेश घेतला पण एका कौटुंबिक आघातामुळे त्यांना घरी परतावे लागले. घरच्या व्यापारात लक्ष घालावे लागले. उद्योग जमणार नाही या टीकेमुळे व्यथित होऊन त्यांनी उत्पादन क्षेत्रात जायचा धाडसी निर्णय घेतला.
रेल्वेतील एक कारकून श्री. लक्ष्मण बळवंत फाटक यांच्या भागीदारीत त्यांनी अनेक लहान-मोठी रेल्वेची कंत्राटे घेतली आणि भरपूर पैसे मिळवले. बांधकाम कंत्राटाच्या सर्व व्यावहारिक बाबींमध्ये पारंगत झाल्यावर अधिक मोठी कंत्राटे घेण्य़ासाठी त्यांनी १९२० साली आपली कंपनी टाटा कन्स्ट्रक्शन कंपनीत विलीन केली. या कंपनीने पुणे-मुंबई मार्गावर भोरघाटात बांधलेले मोठमोठे बोगदे, तानसा तलाव ते मुंबईपर्यंत पाणी पुरवठ्यासाठी घातलेल्या अजस्त्र पाईपलाईन्स, आजही वाखाणले जातात इतकी ती कामे परिपूर्ण आहेत.
उत्कृष्टतेचा ध्यास त्यांच्या सर्व कामांत दिसून येत असे. ब्रिटिश अधिकारी त्यांच्या कामाबद्दल पसंती व्यक्त करत असत. उत्तर भारतात सिंधूनदीवरील कलबाग पूल, ब्रम्हदेशातील इरावती नदीवरील पूल अशी महत्त्वाची कंत्राटे त्यांनी पूर्ण केली. १९२९ साली ते कंपनीचे कार्यकारी संचालक झाले, १९३५ साली टाटांनी आपला भाग त्यांना विकला. कंपनीचे नाव बदलून हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी असे ठेवून त्यांनी अनेक मोठमोठी कामे पार पाडली आणि आपल्या नावावर दर्जेदार कामाची मोहोर उमटवली.
बोट वहातूक हा व्यवसाय विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकात चांगला फोफावला होता. व्यवसायाचा विस्तार वेगवेगळ्या उद्योगात व्हावा म्हणून १९१९ साली एस. एस. लॉयल्टी ही बोट ग्वाल्हेरचे राजे शिंदे यांच्याकडून विकत घेऊन त्यांनी मालवाहतुकीचा व्यवसाय आरंभला. परदेशी कंपन्यांशी भाड्याच्या दरात टक्कर देत वालचंद यानी हुशारीने हे समुद्रातील साहस यशस्वी केले. सिंदिया स्टीम नॅव्हीगेशन या कंपनीच्या प्रमुखपदी ते १९२९ ते १९५० सालापर्यंत होते. महात्मा गांधीनी तरुण भारत, हरिजन या वृत्तपत्रातून पहिली स्वदेशी कंपनी म्हणून त्यांचा गौरव केला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे १९५० साली त्यांनी हे पद सोडले, तेव्हा एकूण किनारी वाहतुकीपैकी २१ टक्के भाग या कंपनीने काबीज केला होता. ५ एप्रिल १९१९ साली त्यांच्या एम. एस. लॉयल्टी या बोटीने मुंबई ते लंडन हा पहिला प्रवास केला याचा सन्मान म्हणून ५ एप्रिल हा नौदल दिवस साजरा होतो.
वालचंद यांची १९३९ साली अमेरिकेतील विमान उत्पादकांशी भेट झाली. भारतीय लोकांमध्ये सर्व उद्योगात देशाला स्वयंपूर्ण करण्याची ताकद आहे असा विश्वास असणाऱ्या वालचंद यांनी त्यावेळच्या म्हैसूर संस्थानाचे दिवाण श्री. मिर्झा इस्माईल यांच्याशी बोलणी करुन पाठिंबा मिळवला आणि बंगलोरजवळ हिंदुस्थान एअरक्राफ्ट या कारखान्यात विमानाचे उत्पादन सुरू केले. १९४० साली भारत सरकारची त्यामध्ये एक तृतियांश भागीदारी होती. १९४२ मध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली तेव्हा लष्करी विमानासाठी सुरक्षितता आणि वेगाने विस्तार करायला प्रचंड भांडवलाची गरज निर्माण झाली. ते सरकारने पुरवले आणि कंपनी सरकारच्या मालकीची झाली. तिचे नाव हिंदुस्तान एअरॉनॉटिक्स लिमिटेड असे बदलण्यात आले. आज तिथे जागतिक दर्जाची विमाने बनतात.
बोट वाहतूक व्यवसायात पाय रोवल्यावर श्री. वालचंद यांनी बोटींच्या बांधणीचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेऊन १९४० साली विशाखापट्टण येथे हिंदुस्तान शिपयार्डची मूहूर्तमेढ रोवली. स्वातंत्र्यानंतर १९४८ साली पहिली जलसाही बोट बांधण्यात आली.
हा व्यवसायही लष्कराशी संबधित असल्याने १९६१ साली टप्प्याटप्प्याने सरकारकडे हस्तांतरित झाला.
वालचंद यांनी १९३९ च्या सुमारास वाहन उद्योगाचे भवितव्य जाणले. १९४० साली क्रायस्लर या कंपनीशी करार करुन ते या उद्योगात उतरले. १९४८ साली मुंबईजवळ प्रिमियर ऑटोमोबाईल कंपनीची सुरुवात झाली. सुरुवातीला मोटारीचे सुटे भाग आयात करून ते मुंबईला एकत्र करून मोटार बनवली जात असे. १९५५ साली फियाट कंपनीशी हात मिळवून १९५६ साली वाहनांच्या स्वदेशी निर्मितीस सुरुवात झाली.
काही व्यवसायात त्यांनी पाय रोवायचा प्रयत्न केला पण अपयश आले तसे त्यांनी ते उद्योगबंद केले. विमान व्यवसाय त्यांना जमला नाही.
त्यांनी हॉलिवुडला भेट दिली, तेव्हा भारतात सिनेस्टुडियो उभी करण्यासाठी व्ही. शांताराम यांच्याशी बोलणी झाली पण हा प्रकल्प उभा राहिला नाही. काही उद्योगांची सुरुवात त्यांनी केली आणि नंतर वालचंद उद्योग समूहाने ते यशस्वी केले. रावळगाव येथील चॉकलेट निर्मिती, सातारा येथील कूपर इंजिनियरिंग, कळंब येथील साखर कारखाना, ॲक्मे मॅन्युफॅक्चरिंग आदी उद्योगनंतर नावारुपाला आले.
पुण्याजवळ वालचंदनगर येथे त्यांनी साखरउद्योगासाठी लागणाऱ्या यंत्रांची निर्मिती करायचा कारखाना काढला. या सुमारास त्यांची प्रकृती बिघडू लागली. १९४९मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. १९५० साली ते स्वेच्छेने निवृत्त झाले.
गुजरातमधील सिद्धपूर येथे त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या १२२ व्या जयंतीला २३ नोव्हेंबर, २००४ साली भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिट काढले.
संदर्भ :
- Walchand Hirachand Biography
समीक्षक : अ. पां. देशपांडे