अन्न व पोषणाचा प्रश्न एक जागतिक समस्या आहे. ही समस्या कमी करण्यासाठी जे पर्याय उपलब्ध आहेत त्यांमधील शैवलांचा अन्नासाठी उपयोग हा पर्याय अग्रस्थानी आहे. सुमारे २००० वर्षांपूर्वी चीनमध्ये नॉस्टॉक (Nostoc) या शैवलांचा उपयोग अन्नासाठी झाल्याचे आढळून येते. अलीकडे १३ व्या शतकात मेक्सिकोमधील तेक्स्कॉको या तलावातील स्पिरुलीना या शैवलाच्या उपयोगाबाबत माहिती आढळते. चाड या आफ्रिकी देशात अनेक शतकांपासून स्पिरुलीनाचा अन्न म्हणून उपयोग केला जात आहे. तर जपानमध्ये अफनोथेका सॅक्रुम (Aphanotheca sacrum) या शैवलापासून स्रुइझेन्जि-नॉरी (Suizenji-nori) हा खास चविष्ट पदार्थ बनविला जातो. याबरोबरच बर्मा (सध्याचे म्यानमार), थायलंड, व्हिएटनाम व भारताच्या काही भागांत स्पायरोगायरा (Spirogyra) व इडोगोनियमचा (Oedogonium) अन्नासाठी समावेश केला जात होता.
अन्नासाठी शैवलांचा उपयोग जरी जुना असला तरी जैव तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांच्या विकासाला मात्र विसाव्या शतकाच्या मध्यावर सुरुवात झाली. पुढे १९७४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जागतिक अन्न परिषदेमध्ये (United Nations World Food Conference)स्पिरुलीनाला भविष्यातील उत्कृष्ट अन्न म्हणून घोषित करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते स्पिरुलीना हे बहुविध कारणांसाठी रुचिपूर्ण अन्न आहे. त्यांमध्ये लोह आणि प्रथिने भरपूर असून ते लहान मुलांना देण्यात कोणताही धोका नाही. म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ६० व्या अधिवेशनात ‘स्पिरुलीनाचा उपयोग भूक आणि कुपोषण यांवर मात करणे, तसेच त्यातून शाश्वत विकास साधने यासाठी केला जावा’ असा ठराव मांडण्यात आला.
शैवलांमध्ये कर्बोदके, प्रथिने, तंतुमय घटक व विकरे (Enzymes) खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. तसेच जीवनसत्त्व अ, क, ई, व ब वर्गीय (ब १, २, ६ व १२) फॉलिक अम्ल, बायोटीन, निकोटिनेट व पेंटोथेनिक अम्ल हे घटक आढळतात. यांबरोबरच खनिज द्रव्यांपैकी आयोडीन, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम व मॅग्नेशियम हे मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळेच अनेक शतकांपासून आशिया खंडात व प्रामुख्याने चीन, जपान व कोरिया इ. देशांमध्ये शैवलांचा पूरक आहारामध्ये समावेश केला गेला व आजही तो टिकून आहे. शैवलांचा उपयोग गोळ्या व पूड (पावडर) या स्वरूपात मर्यादित न राहता तो चिप्स, पास्ता, च्युईंगम व आईस्क्रीम अशा आधुनिक स्वरूपातही आढळतो.
शैवलांच्या असंख्य प्रजातींपैकी स्पिरुलीना, क्लोरेल्ला व ड्युनालिएल्ला यांचा व्यावसायिक वापर मोठ्या प्रमाणात आढळतो. शैवलांमध्ये प्रथिनांचे प्रमाण प्राणिजन्य व अन्य वनस्पतिजन्य आहारापेक्षा सर्वाधिक आढळते. हे प्रमाण स्पिरुलीनामध्ये साधारणपणे ६० ते ७१ टक्के क्लोरेल्लामध्ये ४१ ते ५८ टक्के, तर ड्युनालिएल्लामध्ये सरासरी ५७ टक्के आढळते. पोषक तत्त्वांबरोबरच विविध औषधी गुणांसाठीही शैवले प्रसिद्ध आहेत. उदा., उच्च रक्तदाबाचे शमन करणे, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे, आतड्यांमधे लॅक्टोबॅसिलस या जीवाणूंच्या वाढीसाठी मदत करणे इत्यादी.
शास्त्रज्ञांच्या मते शैवलांचे पचन व त्यांतील उपयोगी घटकांचे अभिशोषण हे कळीचे मुद्दे आहेत; ज्यामुळे त्यांच्या उपयोगावर मर्यादा येतात. काही शास्त्रज्ञ शैवलांच्या चयापचय क्रियेदरम्यान तयार होणाऱ्या युरीक अम्ल व तत्सम घटकाचा किडनी व आरोग्यावर होणारा परिणाम यावर चिंता व्यक्त करतात. याचबरोबर काही शैवले विषद्रव्य (toxin) तयार करू शकतात हीदेखील शास्त्रज्ञांना चिंतेची बाब वाटते.
संदर्भ :
- Garcıa Jose L., Marta de Vicente and Beatriz Galan. Microalgae, old sustainable food and fashion nutraceuticals, Microbial Biotechnology 10(5), 1017–1024 doi:10.1111/1751-7915.12800, 2017.
- Spolaore, P., Joannis-Cassan, C., Duran, E. and Isambert, A. Commercial applications of microalgae, Journal of Bioscience and Bioengineering 101: 87-96, 2006.
समीक्षक : बाळ फोंडके