मध्वाचार्य : ( सु. ११९९—सु. १२७८ ). वैष्णव संप्रदायातील द्वैत-वेदान्त-मताचे प्रवर्तक. मध्वाचार्य यांचा जन्म दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील उडिपी गावाजवळील रजतपीठ (हल्लीचे कल्याणपूर) या ठिकाणी झाला (त्यांच्या जन्मग्रामाचे नाव ‘पाजकक्षेत्र’ असेही नमूद आहे). आई-वडिलांनी त्यांचे नाव वासुदेव असे ठेवले होते. वयाच्या पंधराव्या वर्षी उडिपी येथे अच्युतप्रेक्षमुनी या गुरूंच्याकडे जाऊन संन्यासाश्रम स्वीकारल्यानंतर ‘पूर्णप्रज्ञ’ हे नाव त्यांनी घेतले. पण त्यांनी जे निरनिराळे सदतीस ग्रंथ लिहिले, त्या प्रत्येकाचे अखेरीस ‘आनंदतीर्थ’ अशी स्वतःची नाममुद्रा त्यांनी ठेवून दिली. कालांतराने ‘मध्वाचार्य’ असे त्यांचे नाव रूढ झाले. त्यांची जीवनयात्रा एकुणऐशी वर्षांची झाली; तथापि त्यांच्या जन्म-मृत्यूच्या तिथींबाबत अभ्यासकांत मतभेद आहेत. बी. एन. के. शर्मा त्यांचा काल १२३८−१३१७ असा देतात. मध्वाचार्यांचे एक साक्षात शिष्य त्रिविक्रम यांचे पुत्र नारायण भट्ट यांनी लिहिलेल्या मध्व-विजय आणि मणिमंजरी या अद्‍भुतरम्य आणि अतिरंजित ग्रंथांच्या साहाय्याने मध्वाचार्यांच्या चरित्राची जुळणी मुख्यतः करावी लागते. वायुस्तुति या त्रिविक्रम पंडितांच्या मध्वस्तुतिपर स्तोत्रातूनही काही माहिती मिळते.

त्यांच्या आईचे नाव वेदवती व वडिलांचे मध्यगेहभट्ट होते. परंतु काही पंडितांनी त्यांच्या वडिलांचे नाव नारायणाचार्य असेही सांगितले आहे. वासुदेव लहानपणी हूड होता आणि हुशारही होता. वासुदेवाच्या आधी जन्मलेले त्याचे भाऊ लहानपणीच कालवश झाले. वासुदेवाने पंधराव्या वर्षीच संन्यास घ्यावयाचे ठरविल्यामुळे त्याच्या आईवडिलांना अतिशय दुःख झाले. त्यांनी त्याचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला; पण वासुदेव निश्चयापासून ढळला नाही.

अच्युतप्रेक्षमुनी हे अद्वैतमताकडे कललेले होते; पण पूर्णप्रज्ञांनी आपल्या बुद्धिचातुर्याने आणि प्राचीन ग्रंथांचा अर्थ लावण्याच्या हातोटीमुळे आपल्या गुरूंना द्वैतसिद्धांत पटवून दिला. शंकराचार्यप्रणीत जीव-ब्रह्मैक्य-वाद आणि मायावाद यांचे खंडन करून ईश्वर, जीव व जगत् यांतील भेद सत्य आहे व जगही सत्य आहे, या द्वैत सिद्धांताचा प्रचार करण्यासाठी त्यांनी देशभर संचार केला. शंकराचार्यांना ते ‘प्रच्छन्न बौद्ध’ असे म्हणत.

मध्वाचार्यांची पहिली यात्रा दक्षिण भारतात थेट रामेश्वरापर्यंत झाली. सुरुवातीसच शृंगेरी येथील शंकराचार्यपीठावरील आचार्य विद्याशंकरयती यांचा त्यांनी वादात पराभव केल्यामुळे शंकराचार्यांच्या अनुयायांनी कलह केला व त्यांना बराच उपद्रवही दिला. शृंगेरीच्या मठाधिपतींनी मध्वाचार्यांची हस्तलिखिते पळवून नेली; पण विष्णुमंगल येथील राजा जससिंह याच्या मध्यस्थीने ती परत मिळाली, असे मध्व-विजय  या ग्रंथात म्हटले आहे. याच प्रवासात मध्वाचार्यांनी भगवद्‍गीतेवरील आपले भाष्य लिहिले.

स्वमतप्रचाराच्या दुसऱ्या यात्रेसाठी मध्वाचार्य उत्तरेत बदरिकाश्रमापर्यंत जावयाचे ठरविले. तेथे मानवी दृष्टीला अगोचर असा वेदव्यासांचा आश्रम आहे, अशी पुरातन श्रद्धा आहे. वेदव्यासांचे साक्षात दर्शन घ्यावे, हाही दुसऱ्या यात्रेतील त्यांचा एक प्रमुख उद्देश होता. बदरिकाश्रमी त्यांनी ब्रम्हसूत्रा वरील आपले भाष्य लिहिले. द्वैतमताची संपूर्ण रचना प्रथम याच ग्रंथात आकारास आली.

या यात्रेहून उडिपीस परत आल्यावर तेथे श्रीकृष्णाच्या प्रतिमेची त्यांनी स्थापना केली. याच सुमारास रचलेले श्रीकृष्णाच्या स्तुतिपर असलेले द्वादशस्तोत्र  माध्व-वैष्णवांच्या नित्यपाठात असते. उडिपी हे माध्व संप्रदायाचे सर्वांत महत्त्वाचे क्षेत्र होय. काही दिवस उडिपीस थांबून मध्वाचार्य परत हिमालयातील बदरिकाश्रमाच्या यात्रेस निघाले. ते महाराष्ट्रातून उत्तरेस सरकले, त्या वेळी देवगिरीच्या यादव वंशातील महादेवराय हे राज्य करीत होते, अशी नोंद सापडते. तिन्ही यात्रा मिळून त्यांचे सबंध भारतभर पर्यटन झाले. या तिसऱ्या यात्रेवरून परत आल्यावर महाभारत-तात्पर्य-निर्णय  हा महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिला.

त्यांनी एकूण सदतीस ग्रंथ लिहिले. त्यांना ‘ग्रंथ’ असे म्हटले तरी, तत्सम इतर ग्रंथांच्या तुलनेने, त्या प्रत्येकाचा आकार लहानच आहे. त्यांच्या ग्रंथांची नामवार यादी पुढीलप्रमाणे आहे : (१) महाभारत-तात्पर्य-निर्णय, (२) भगवद्‍गीता-तात्पर्य-निर्णय, (३) ब्रम्हसूत्र-भाष्य, (४) ब्रम्हसूत्र-अनुव्याखान, (५) विष्णुतत्त्व-निर्णय, (६) ब्रम्हसूत्र-अनुभाष्य, (७) ऋग्‍भाष्य, (८) भागवत-तात्पर्य-निर्णय, (९  ते १८) दहा प्राचीन उपनिषदांवरील भाष्ये, (१९) कर्मनिर्णय, (२०) भगवद्‍गीता-भाष्य, (२१) ब्रम्हसूत्रानुव्याख्यान-निर्णय, (२२) प्रमाणलक्षण, (२३) कथालक्षण, (२४) उपाधिखंडन, (२५) मायावादखंडन, (२६) प्रपंच-मिथ्यात्वानुमान-खंडन, (२७) तत्त्वोद्योत,  (२८) तत्त्वविवेक, (२९) तत्त्वसंख्यान, (३०) द्वादशस्तोत्र, (३१) तंत्रसार-संग्रह, (३२) कृष्णामृत-महार्णव, (३३) यतिप्रणवकल्प, (३४) सदाचारस्मृती, (३५) जयंती-निर्णय (जयंतीकल्प), (३६) यमकभारत आणि (३७) नृसिंहनखस्तोत्र. यांपैकी पहिले पाच ग्रंथ अधिक महत्त्वाचे होत.

एकुणएशी वर्षांचे होऊन मध्वाचार्य वैकुंठवासी झाल्यावर माध्य-वैष्णव-पीठाचे आधिपत्य त्यांचे साक्षात शिष्य पद्‍मनामतीर्थ, नरहरीतीर्थ, माधवतीर्थ व अक्षोभ्यतीर्थ यांनी एकामागून एक याप्रमाणे केले. अक्षोभ्यतीर्थांनंतर त्यांचे शिष्य जयतीर्थ पीठावर आले. मध्वाचार्यांच्या ब्रम्हसूत्र-भाष्यावरील तत्त्वप्रकाशिका  ही जयतीर्थांची टीका विशेष मान्यता पावलेली आहे.

मध्वाचार्यांनी उडिपीमध्ये केलेल्या श्रीकृष्णमूर्तीच्या प्रतिष्ठापनेमुळे उडिपी आणि या गावचा परिसर हे सांप्रदायिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे. येथील मंदिरात मकरसंक्रांतीपूर्वी दहा दिवस मोठा उत्सव होत असतो.

संदर्भ :

  • Dasgupta, S. N. A History of Indian Philosophy, Vol. IV, Delhi, 1975.
  • Krishna Rao, C. R. Sri Madlvwa :  His Life and Doctrine, Udipi, 1929.
  • Krishnaswami  Aiyar, C. N. Shri Madhva and Madhvaism, Madras.
  • Narain, K. An Outline of Madhava Philosophy, Allahabad, 1962.
  • Narayanacharya, Dwaita Philosophy, Hosahalli, 1927.
  • Padmanabhacharya, C. M. Life of Madhvacharya, Madras.
  • Raghavendrachar, H. N. The Dvaita Philosophy and its Place in the Vedanta, Mysore, 1941.
  • Sharma, B. N. K. Madhva’s Teaching in His Own Words, Bombay, 1961.
  • Sharma, B. N. K. Philosophy of Sri Madhvacharya, Bombay, 1962.
  • https://www.newworldencyclopedia.org/entry/Madhva