मोरवंचीकर रा.श्री. : ( ६ डिसेंबर १९३७ )

चिंचोली या सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली या गावी रा. श्री. मोरवंचीकर यांचा जन्म झाला. इतिहासकार असलेल्या मोरवंचीकर यांनी आपल्या ४० वर्षाच्या कारकिर्दीत पैठणमध्ये उत्खनन केले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला ओळख करून दिली . ते ज्या ज्या स्थानी जात त्या ठिकाणाचा भूगोल आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य शोधणे हा त्यांचा ध्यास होता. नवनवीन विषयाचे आकलन करताना त्यावर भाष्य करण्याची स्वतःची वेगळी शैली हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्यं. शुष्क मराठवाड्याच्या लोकसंस्कृतीचा इतिहास नदीचा भवताल घेऊन  जागतिक स्तरावर मांडला. यातूनच ‘दक्षिण काशी पैठण’, ‘सातवाहनकालीन महाराष्ट्र’, ‘जैनांचे सांस्कृतिक योगदान’, ‘युगानुयुगे चांदवड’, ‘देवगिरी-दौलताबाद येथील जलव्यवस्थापन’ अशा विषयांवर त्यांनी महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. त्यांनी जलसंस्कृतीची मांडणी भारतीय मानसिकतेने केली. त्यासाठी त्यांनी सातवाहनांवर मूलभूत काम केले. अश्मकमूलक, पेतनिक, मौर्य सत्ता आणि सातवाहन, त्यातील वेगवेगळे राजे यांचा अभ्यास करणारा त्यांचा ‘प्रतिष्ठान ते पैठण’ हा ग्रंथ मोलाचा आहे. मोगल काळातील विकसित स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी दौलताबादच्या उंच किल्ल्याचे सर्वेक्षण केले. मलिक अंबरने तेव्हा राजाच्या सोयीसाठी पाणवठा किल्ल्यात आणला होता. त्यांनी या अभ्यासातून जगभरातील लोकसंस्कृतीचा पाण्याच्या अंगाने अभ्यास केला. दौलताबाद किल्ल्यात उत्खनन करताना त्यांनी मध्ययुगीन जलव्यवस्थापनाचा अभ्यास, पुरातत्त्व इतिहास, तत्कालीन स्थापत्य, या व्यवस्थेसाठी उपयोगात आणलेली साधनं व तंत्र, तत्कालीन – अभियांत्रिकी या व अशा अनेक बाबी तपासल्या. उपलब्ध होणारं पाणी किती ? या आधारे उपजीविका करू शकणारी लोकसंख्या किती, याचा शोध घेताना माणसं, प्राणी, पर्यावरण, तत्कालीन कृषिजीवन असे अनेक पैलू एकत्रितपणे त्यांनीच प्रथम पुढे आणले.

इतिहासाच्या वेगवेगळ्या पैलूवर प्रकाश टाकणारी त्यांची ५२ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यापैकी  ‘शुष्क नद्यांचे आक्रोश’,‘जल संपत्ति-व्याप्ती आणि स्वरूप’ ही पुस्तके पाणी क्षेत्रातील अभ्यासकांना उपयोगी अशी आहेत. ‘भारतीय जलसंस्कृती’ या ग्रंथाबरोबरच ‘पैठण :थ्रू द एजेस्, ‘पैठणी – तंत्रव वैभव’, ‘देवगिरी-दौलताबाद ॲन आर्किऑलॉजिकल व्ह्यू’, ‘वूड वर्क ऑफ वेस्टर्न इंडिया’ यांसारखे ग्रंथ त्यांच्या अभ्यासाचं वेगळेपण सांगणारे आहेत. ‘भारतीय जलसंस्कृती स्वरूप आणि व्याप्ती’ या ग्रंथात त्यांनी इतिहास व संस्कृतीचं साधन म्हणून पाणी या विषयाचा अभ्यास केला. असं करताना विविध स्थापत्य, त्याची वैशिष्ट्यं अगदी प्रागैतिहासिक काळापासून वर्तमानापर्यंत मानवनिर्मित साधनांचा आढावा तर त्यांनी घेतलाच, शिवाय साहित्यिक संदर्भ, लोकस्मृती, रूढ परंपरा आणि अनुभवजन्य ज्ञानातून निर्माण झालेल्या जलसंवर्धनाच्या व सिंचनाच्या विविध पद्धतींचाही मागोवा घेतला.

त्यामुळे भारतीय जलसंस्कृतीवरील त्यांचा ग्रंथ या विषयावरील वेगळेपण सांगणारा ठरतो. पाण्यासंबधी जनजागृती व्हावी म्हणून त्यांनी भारतीय जलसंस्कृती मंडळ स्थापन केले. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी त्यांनी न्यायालीन लढा दिला आहे. इतिहासाच्या वारशाला धर्म आणि जात नसते. तो जपला तर लोक संस्कृती कळू शकते, हा विचार इतिहास-संस्कृती आणि पुरातत्त्वीय दृष्ट्या मराठवाड्याचं उत्खनन करणारे मोरवंचीकर सातत्याने मांडत आले. इतिहासाचा अभ्यास म्हटलं की एका ठराविक चाकोरीमध्ये काम न करता त्याविषयाच्या विविध बाजूंना स्पर्श करणे, त्यासाठी ग्रंथातील संदर्भाबरोबर परिसर अभ्यास आणि ते त्या विषयाच्या पलीकडे जाऊन आपलं स्वतःचं भाष्य करताना दिसतात.

‘नकाशात नद्या दाखवायच्या असतील तर रेषांना निळा रंग दिला जातो. भविष्यात त्या लाल रंगाने दाखवायला लागतील. हा लाल रंग रक्ताचा असू शकतो,’ असे ते सूचक भाष्य करतात. समाजाचं काही ऋण असतं व ते लक्षात घेऊन काम करायला हवं, याची जाणीव ते सातत्याने स्वतःसह इतरांना करुन देतात. त्यासाठी जे परिश्रम करायला हवेत त्यात कुठलीही तडजोड मान्य करायला ते तयार होत नाहीत.

वयाच्या ८० व्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना ‘जीवन साधना’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.

  समीक्षक : अ. पां. देशपांडे