पराखंडकीय घटक : भाषेतील ध्वनिव्यवस्थेच्या घटकांमधे स्वर आणि व्यंजन या प्रमुख घटकांबरोबरच काही पराखंडकीय घटकही असतात. बोलीभाषांमध्ये हे घटक भाषा वापराच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावतात. उच्चारलेल्या कोणत्याही वाक्याच्या अर्थनिष्पत्तीसाठी आवाजाची उंची, चढउतार, मोठेपणा यांसारख्या पराखंडकीय घटकांचे स्थान महत्त्वाचे असते. भाषाशास्त्राचा अभ्यास करताना प्रत्यक्ष वापर केलेल्या (बोललेल्या) भाषेचा अभ्यास विशिष्ट स्तरावर केला जातो. आघात (बलाघात) आणि सूरयोजन या पराखंडकीय घटकांचा अभ्यास यामधे फार महत्त्वाचा ठरतो.
सूरयोजन : सूरयोजन हे भाषाविशिष्ट असते. सामान्यपणे दोन प्रकारची माहिती सूरयोजनेतून व्यक्त होते, व्याकरणिक माहिती आणि बोलणाऱ्या व्यक्तीची बोलण्यामागची भूमिका म्हणजे बोलणाऱ्याची भावना आणि त्याला अपेक्षित असणारा अर्थ या गोष्टी सूरयोजनेतून समजतात. व्याकरणिक माहिती म्हणजे वाक्य कशा प्रकारचे आहे- ते प्रश्नार्थक आहे, विधानात्मक आहे हे सूरयोजनेतून समजते. वाक्यातील मुख्यार्थ आणि गौण वाक्यर्थ हे ही सूरयोजनेतून समजते. आग्रह, आश्चर्य, खोचकपणा यांसारख्या अनेक भावना सूरयोजनेतून पोहोचवता येतात. आफ्रिका खंड, पूर्व अशिया, मध्य अमेरिका या जगाच्या भागात काही ध्वनीभाषा (tonal languages) आहेत. या भाषांमधे एकाच शब्दाच्या उच्चारणात असणाऱ्या ध्वनींच्या उच्चनीचतेमुळे अनेकार्थता व्यक्त करता येते. मेंडरीन-चीनी ही सर्वाधिक बोलली जाणारी ध्वनीभाषा आहे. पंजाबी आणि तिबेटी-ब्रह्मदेशी या भारतीय भाषा ध्वनीभाषा आहेत. यासारख्या भाषांमधे आवाजाची पट्टी आणि सूरयोजन याचा एकत्रित वापर वेगवेगळे अर्थ दाखवण्यास केलेला असतो. उदा. पंजाबी भाषेत काही वर्ण शब्दाच्या सुरुवातीला पहिल्या स्थानी आल्यास त्याचा उच्चार वेगळा होतो. शब्दाचे सूरयोजन बदलले की अर्थही बदलतो.
करी (kári) असे आरोही सूरयोजन असल्यास घड्याळ असा अर्थ होतो.
करी (karī) असे समतल सूरयोजन असल्यास साखळीची कडी असा अर्थ होतो. आणि
करी (kari) असे अवरोही सूरयोजन असल्यास रस्सा असा अर्थ होतो.
मराठीसारख्या भाषांमधे सूरयोजन ही संकल्पना सामान्यपणे वाक्यस्तरावर अभ्यासली जाते. आघात आणि सूरयोजन हे वाक्यभर पसरलेले असतात आणि त्यामुळे वाक्यातून वेगळे करता येत नाहीत. काही एकावयवी उच्चारणातून उच्चारणाच्या पद्धतीवरून अनेक अर्थ व्यक्त होतात. मराठी भाषिकांच्या वापरात येणारे अं, हं, हश्श्, च् च् (सामान्यपणे शब्दाचा उच्चार करताना हवा मुखविवरातून बाहेर फेकली जाते पण च् च् हा उच्चार करताना हवा आत ओढली जाते.) हे शब्द वैशिष्ट्यपूर्ण अर्थ व्यक्त करतात.
सामान्यपणे चार प्रकारचे सूरयोजन सर्व भाषांमध्ये आढळते. आरोही, अवरोही, प्रलंबित अवरोही आणि समस्तर. सुरयोजनेचे चार प्रकार आहेत. उदा. पाऊस पडतो आहे हे एक वाक्य वेगवेगळ्या चालीत म्हटले असता वेगवेगळा भाव, वेगवेगळा अर्थ व्यक्त करते. बाहेर का जात नाही ? असा प्रश्न विचारला असता, त्याचे उत्तर म्हणून जेव्हा येईल तेव्हा पाऊस पडतो आहे असे विधानात्मक वाक्याला असणारे अवरोही सूरयोजन असेल. पाऊस पडतो आहे ? असा प्रश्न असेल तर आरोही सूरयोजन असेल. वस्तुस्थितीचे वर्णन म्हणून जर हेच वाक्य आले तर पाऊस पडतो आहे. असे समस्तर सूरयोजन असेल. आशीर्वाद, शाप यातून इच्छा व्यक्त करणाणाऱ्या वाक्याचेही समस्तर सूरयोजन असेल. सदा सुखी रहा. एखाद्याला बाहेर जाणे अत्यावश्यक आहे आणि त्याच्याकडे छत्री नसेल तर हताशपणे तो जेव्हा म्हणेल पाऊस पडतो आहे. तेव्हा प्रलंबित अवरोही सूरयोजन असेल. विधानार्थक आणि आज्ञार्थ वाक्यात अवरोही सूरयोजन असेल.
विशिष्ट उद्देशाने बोलणाणाऱ्या व्यक्तींना जेव्हा लक्षवेधी बोलायचे असेल तेव्हा एक विशिष्ट सूरयोजन वापरून बोलले जाते. भाजी किंवा तत्सम वस्तू विकणारे विक्रेते विशिष्ट सूरयोजन वापरून बोलतात. उदा. भाजी घ्या भाजी. या ठिकाणी भाजी घ्या या वाक्याला समस्तर सूरयोजन असले तरी त्याची पट्टी वरची असते. आणि त्यानंतरच्या भाजी या शब्दाचे आरोही सूरयोजन असेल. एखाद्यावेळी बोलताना प्रसंगाचे गांभीर्य राखणे, तटस्थता दाखवणे यासाठीही अवरोही सूरयोजन वापरले जाते. बातम्या देताना अशाप्रकारे अवरोही सूरयोजन वापरले जाते.
बलाघात : बोलीभाषांमध्ये आघात हा घटक भाषावापराच्या अभ्यासात महत्त्वाची भूमिका बजावतो. भाषाशास्त्राचा अभ्यास करताना प्रत्यक्षवापर केलेल्या (बोललेल्या) भाषेचा अभ्यास करताना आघात आणि सूरयोजन या पराखंडकीय घटकांचा अभ्यास फार महत्त्वाचा ठरतो. बोलताना एखाद्या विशिष्ट स्वरावर किंवा शब्दावर दिलेला आघात किंवा जोर म्हणजे बलाघात. यालाच स्वराघात असेही म्हणतात ; कारण आघात हा नेहमी स्वरावर दिला जातो वर्णावर नाही. मोठा आवाज, उच्चस्वर, दीर्घ उच्चार यांच्या आधारे हा आघात दाखविला जातो. आघात हा शब्द स्तरावर आणि वाक्यस्तरावर स्वतंत्रपणे अभ्यासता येतो. प्रत्येक शब्दात किमान एकतरी बलाघात असतोच. मराठी भाषेत सामान्यपणे पहिल्या अक्षरावरील स्वरावर बलाघात असतो. उदा. दृष्ट शब्दामधे दृ मधल्या उ वर आघात आहे. फळ शब्दात फ मधील अ वर आघात आहे.
वाक्यातील बलाघात वक्त्याला अभिप्रेत असणारा अर्थ ध्वनित करतो.
उदा.कोण खेळायला गेला ? या प्रश्नाचे उत्तर म्हणून जेव्हा राजीव खेळायला गेला असे वाक्य येते, तेव्हा राजीव खेळायला गेला असे होऊन राजीव शब्दावर आघात येतो. पण हेच जर राजीव कुठे गेला ? या प्रश्नाचे उत्तर म्हणून हे वाक्य येते तेव्हा राजीव खेळायला गेला. अशाप्रकारे ते वाक्य उच्चारले जाउन खेळायला शब्दावर आघात येईल.
तो तुला बागेत काय म्हणाला ? या वाक्यातील निरनिराळ्या शब्दांवर जोर दिल्यास वाक्याचे अनेक अर्थ निघतील.
– तो तुला बागेत काय म्हणाला ?
– बागेत तुला खूपजण भेटले असतील. पण त्यातला तो काय म्हणाला ?
– तो तुला बागेत काय म्हणाला ?
-तो बागेत अनेकांशी बोलला असेल पण विशेषतः तुला काय म्हणाला ?
-तो तुला बागेत काय म्हणाला ?
अशाप्रकारे प्रत्येक शब्दावर दिलेला आघात वेगवेगळा अर्थ सुचवतो.
इंग्रजी भाषेतील बलाघात नेमकेपणाने नियमात बांधणे अवघड आहे ; कारण तो अनियमीत आहे.उदा. object या शब्दात शब्दाच्या पहिल्या भागावर आघात दिल्यास तो नाम असतो. (car is an object). हाच आघात शब्दाच्या दुसऱ्या भागावर दिल्यास तो शब्द क्रियापद असतो. (I object to what you say).
संदर्भ :
- Kelkar ,Ashok, The phonology and morphology of Marathi, Cornell University ,USA,1958.
- Pandharipande ,Rajeshwari, Marathi,Descriptive Grammars Series, Routledge, London, 1997.
- घोंगडे, रमेश,भाषा आणि भाषाविज्ञान, पुणे, 2006.