अनुमानाचा एक प्रकार. ‘ॲनॅलॉजी’ हा इंग्रजी शब्द ana logon ह्या ग्रीक शब्दावरून आलेला असून आरंभी हा शब्द समप्रमाणे दर्शविण्यासाठी उपयोगात आला. म्हणजे आरंभी ह्या शब्दाला संख्यावाचक अर्थ होता. उदा., ३ : ६ ∷ १२ : २४ ह्याचा अर्थ ३ : ६ ह्यांतील प्रमाण व १२ : २४ ह्यांतील प्रमाण ही दोन्ही समानधर्मी आहेत. इथे संख्यावाचक संबंधांतील सादृश्य दाखविण्यात आले आहे. ‘ॲनॅलॉजी’ ह्या शब्दाने इतर संबंधांतील सादृश्यही दाखविण्यात येत असे. उदा., उत्तम प्रकृती आणि शरीर ह्यांतील संबंध आणि सद्गुण व आत्मा ह्यांचा संबंध ह्यांतील साधर्म्य. हे साधर्म्य अर्थात गुणवाचक आहे.
आता, सादृश्य म्हणजे सारखेपणा आणि सादृश्यानुमान म्हणजे दोन गोष्टींतील काही सारखेपणाच्या आधाराने त्यांच्यांत इतर काही बाबतींतही सादृश्य असू शकेल, असा संभव व्यक्त करणारा निष्कर्ष काढणे. ‘ॲनॅलॉजी’ हा शब्द सादृश्य आणि सादृश्यानुमान अशा दोन्ही अर्थांनी वापरला जातो.
सादृश्यानुमानाची काही उदाहरणे अशी : (१) मानवाप्रमाणे इतर प्राण्यांतही चैतन्य आहे. माणसाला सुखदुःखाच्या संवेदना होतात, म्हणून इतर प्राण्यांनाही तशा संवेदना होत असल्या पाहिजेत. (२) एखाद्या व्यक्तीत अ, ब, क हे गुण आहेत. त्या व्यक्तीत ड हाही एक गुण असल्याचे पुढे निष्पन्न झाले, म्हणून अ, ब, क हे गुण असलेल्या दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीत ड हा गुण असला पाहिजे. (३) मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी हे ग्रह पृथ्वीप्रमाणेच सूर्याभोवती फिरतात. सूर्याचा प्रकाश पृथ्वीप्रमाणेच त्यांनाही मिळतो. गुरुत्वाकर्षणाचा नियम पृथ्वीप्रमाणेच त्यांनाही लागू आहे, म्हणून पृथ्वीप्रमाणेच ह्या ग्रहांवरही जीवसृष्टी असली पाहिजे.
सादृश्यानुमानात प्रामुख्याने दोन वस्तूंमधील काही गुणांचे साम्य वा साधर्म्य पाहून त्याच्या आधारे अनुमान केले जात असले, तरी हे अनुमान बहुधा संभाव्यच असते. ही संभाव्यता अनिश्चिततेच्या अगदी खालच्या पातळीपासून निश्चिततेच्या अगदी वरच्या पातळीपर्यंतची असू शकते. सादृश्यानुमानातील निष्कर्ष किती विश्वसनीय आहे, ह्यावर त्याचे मूल्य, महत्त्व आणि स्वीकारार्हता अवलंबून असते; म्हणून ही विश्वसनीयता नीट तपासली पाहिजे. त्यासाठी साम्य असलेल्या गोष्टींची संख्या जास्त आणि महत्त्वाचीही हवी. म्हणजेच नुसत्या संख्येपेक्षा त्यांचे महत्त्व विचारात घेतले पाहिजे. कधी कधी साम्य असणारी बाब एकच पण अत्यंत महत्त्वाची असू शकते आणि कधी कधी साम्य असणाऱ्या बाबी संख्येने बऱ्याच पण वरपांगी असू शकतात.
जिथे दोन वस्तूंमधील साधर्म्यांपेक्षा त्यांच्यातील भेदाच्या बाबी जास्त आणि महत्त्वाच्याही असतात, तेथे केलेले सादृश्यानुमान कनिष्ठ प्रतीचे असते. उदा., पृथ्वी आणि चंद्र ह्यांच्यात काही बाबी साधर्म्याच्या असल्या, तरी भेदाच्या बाबी अनेक आणि महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पृथ्वीप्रमाणेच तेथेही जीवसृष्टी असली पाहिजे, असा निष्कर्ष काढता येणार नाही. प्राण्यांच्या अस्तित्वासाठी असणाऱ्या अनेक गोष्टी–उदा., प्राणवायू–चंद्रावर नाही.
दोन वस्तूंत साम्य असणारे मुद्दे विश्वसनीय सादृश्यानुमानाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि प्रभावी पाहिजेत; त्यांची नुसती संख्या मोठी असून चालणार नाही. उदा., दोन व्यक्ती एकाच वयाच्या, एकाच ठिकाणी जन्मलेल्या आहेत. त्यांचा व्यवसाय, पगारही सारखाच आहे, म्हणून त्यांच्यापैकी एकाप्रमाणे दुसराही तीव्र बुद्धीचाच असेल, असा निष्कर्ष काढल्यास तो चुकीचा ठरू शकतो.
काही तर्कशास्त्रज्ञांनी सादृश्यानुमानाकडे विगमनाचा (Induction) एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणून पाहिले आहे. विगमनात आपल्या अनुभवास आलेल्या काही गोष्टींकडून आपण सर्वसामान्य नियमाकडे जात असतो किंवा ‘काही’ विशिष्ट गोष्टींकडून दुसऱ्या काही, न पाहिलेल्या अशा, ‘सर्व’ विशिष्ट गोष्टींकडे जात असतो. विगमनाला साधर्म्य हा एक प्रमुख पायाभूत आधार असतो. इथे ‘काही’ वरून सर्वांकडे आपण जी झेप घेतो, तिला वैगमनिक झेप (Inductive Leap) असे नाव दिले गेले आहे. सादृश्यानुमानातही सादृश्याचा आधार म्हणून उपयोग केला जात असल्यामुळे त्यात ‘वैगमनिक झेप’ आहे, असे म्हटले जाते; तथापि सादृश्यानुमान हे वैज्ञानिक विगमनापेक्षा (Scientific Induction) वेगळे आहे. उदा., सादृश्यानुमान हे विशिष्टाकडून विशिष्टाकडे जात असते, तर वैज्ञानिक निगमन हे विशिष्टाकडून सामान्याकडे जात असते; मात्र सादृश्यानुमानालाही काही महत्त्व आहे. वैज्ञानिक संशोधनाला ज्यांच्यामुळे चालना मिळू शकते, अशा सिद्धान्त-कल्पना पुरवण्याचे कार्य सादृश्यानुमानामुळे होऊ शकते.
संदर्भ :
- Cajetan, Tommaso; Trans. Bushinski, E.; Koren, H. The Analogy of Names and the Concept of Being, Pittsburgh, 1953.
- Copi, Irving M. Introduction to Logic, New York, 1961.
- Lyttkens, H. The Analogy between God and the World, Uppsala, 1952.
- Mascall, E. I. Existence and Analogy, New York, 1949.
- Phelan, G. St. Thomas and Analogy, Milwaukee, 1941.
- हुल्याळकर, श्री. गो.; काळे, श्री. वा.; कावळे, श्री. र. सुगम तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक पद्धती, पुणे, १९६४.
- https://www.encyclopedia.com/science-and-technology/biology-and-genetics/biology-general/analogy
- https://plato.stanford.edu/entries/reasoning-analogy/