चव्हाण, सुलोचना : (१३ मार्च १९३३). महाराष्ट्रातील ज्येष्ठ लावणी गायिका, पार्श्वगीत गायिका. फडावरची लावणी त्यांनी रुपेरी पडद्यावर लोकप्रिय केली तशीच ती थेट माजघरापर्यंत पोहचविली. त्यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांचे विवाहापूर्वीचे नाव सुलोचना महादेव कदम असे होते. त्यांचे शिक्षण जेमतेम चौथ्या इयत्तेपर्यंत झाले. बालपणी श्रीकृष्ण बालमेळ्यात त्यांनी काम केले. हिंदी, उर्दू, गुजराती, मराठी नाटकात बालभूमिका केल्या. सुलोचना यांच्या मोठ्या भगिनीने त्यांना कलाक्षेत्रासाठी प्रोत्साहन दिले. श्रीकृष्ण बालमेळ्याचे रंगभूषाकार दांडेकर चित्रपट सृष्टीशी संबंधित होते. दांडेकर यांच्या ओळखीतून संगीत दिग्दर्शक शाम बाबू पाठक यांच्याकडे सुलोचनाबाईंनी पहिले चित्रपट गीत गायिले. वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्यांनी गायनाला प्रारंभ केला. लग्नापूर्वी सुमारे ७० हिंदी चित्रपटांतून त्यांनी पार्श्वगायन केले. हिंदी चित्रपट सृष्टीत त्या सुलोचना कदम अथवा के. सुलोचना नावाने ओळखल्या जायच्या . मास्टर भगवान यांच्या चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केले तेव्हा त्यांच्या सोबत सहगायक सी . रामचंद्र होते. मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, शामसुंदर अशा कलावंतांबरोबर सहगायनाची संधी त्यांना लाभली. वयाच्या सोळाव्या वर्षी मन्ना डे यांच्यासोबत त्यांनी भोजपुरी रामायण गायिले. भोजपुरी, हिंदी, गुजराती, तामिळ, पंजाबी आदी भाषांतील गीते त्यांनी गायिली.
चित्रपटातील पार्श्वगायनासोबत मराठी चित्रपटातील लावणी गायन ही सुलोचनाबाईंची खरी ओळख झाली. त्यांना त्यासाठी लावणीसाम्राज्ञी हा किताब आचार्य अत्रे यांच्याकडून प्राप्त झाला. फडावरची लावणी रुपेरी पडद्यावर आणि थेट माजघरात लोकप्रिय करण्याचे ऐतिहासिक कार्य सुलोचनाबाईंनी केले. त्यांनी लावणी सादरीकरणाचे हजारांवर प्रयोग केले. वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायिलेल्या ‘ सांभाळ गं , सांभाळ गं ‘ , ‘ दौलत लाखाची ‘ या लावणीने सुलोचनाबाई विलक्षण प्रभावित झाल्या. आचार्य अत्रे यांच्या हीच माझी लक्ष्मी या चित्रपटात त्यांनी मराठीतले पहिले पार्श्वगायन केले. संगीतकार वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेल्या तसेच सुलोचनाबाईंनी गायिलेल्या या गीताला रुपेरी पडद्यावर हंसा वाडकर यांनी साकार केले होते .
१९५२ साली कलगी तुरा या चित्रपटासाठी त्यांनी लावणी गायन केले. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक होते श्यामराव चव्हाण. लावणी गायनात सुरांची नजाकत आणि शब्दफेक यांचे शिक्षण सुलोचनाबाईंना श्यामराव चव्हाण यांनी दिले. १२ ऑगस्ट १९५३ रोजी त्या श्यामराव चव्हाण यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या. रंगल्या रात्री अशा या चित्रपटातील सुलोचना चव्हाण यांच्या लावण्या खूपच गाजल्या. गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या लावण्यांपैकी ‘ नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची मला हो म्हत्यात लवंगी मिरची ‘ ही लावणी सुलोचना चव्हाण यांनी लावणीच्या मूळ ठसक्यात गाजविली .
लावणीच्या चपखल, फटकेबाज शब्दांना आपल्या सुरांच्या माध्यमातून ठसका तसेच खटका देण्याचे काम सुलोचनाबाईंनी केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शाळा, महाविद्यालये , इस्पितळे इतकेच काय अनाथाश्रम उभारणीसाठी मदतीचे कार्यक्रम आपल्या ६० वर्षांच्या कलाजीवनात सुलोचनाबाईंनी केले. १९६० साली त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले असता दुःख, शोक बाजूला ठेवून शाळेच्या मदतीसाठी त्यांनी सलग १० दिवस कार्यक्रम केले. नागालँड येथे भारतीय लष्कराच्या मनोरंजनासाठी त्यांनी कार्यक्रम केले .’ फड सांभाळ तुऱ्याला गं आला तुझ्या उसाला लागला कोल्हा ‘ , ‘ पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा ‘ , ‘ कसं काय पाटील बरं हाय का ‘ या व अशा अनेक लावण्या सुलोचनाबाईंनी गायिल्या, त्या लोकप्रिय झाल्या.
शरद सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम पुरस्कार त्यांना २००९ मध्ये प्राप्त झाला. पी. सावळाराम यांच्या नावाने दिला जाणाऱ्या गंगा जमुना पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, राज्य सांस्कृतिक पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांचा वाढदिवस रेडिओ सिलोनवर गाणी प्रसारित करून साजरा केला जातो.
सुलोचनाबाईंनी लावणी सोबत भावगीते आणि भक्तिगीते देखील गाऊन लोकसंगीताचे दालन समृद्ध केले आहे. त्यांचे पुत्र विजय चव्हाण हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तालवाद्य सम्राट आहेत. सुलोचनाबाईंच्या लावणी गायन प्रस्तुतीला तालवाद्याची साथसंगत विजय चव्हाण यांची असते. लावणीचा ठसका आवाजातून सादर करताना या गेय प्रकारचा घरंदाजपणा आणि अभिजात लोकसंगीताची परंपरा सुलोचनाबाई यांनी समर्थपणे सांभाळली.
संदर्भ :
- खांडगे, शैला, अंतरिचें धांवे, संधिकाल प्रकाशन, २०२०.