लक्ष्मी कोल्हापूरकर : (१९२२ – २ डिसेंबर २००२). महाराष्ट्रातील लावणी कलावंत, चित्रपट नृत्य दिग्दर्शिका. लक्ष्मीबाई कोल्हापूरकर सुप्रसिद्ध लावणी कलावंत, चित्रपट नृत्यदिग्दर्शिका म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांचे संपूर्ण नाव लक्ष्मीबाई सीताराम जावळकर आहे. त्यांच्या आईचं नाव मंजुळाबाई जावळकर आहे. त्यांचं जन्मस्थळ कोल्हापूर हे आहे. आईकडून त्यांना तमाशा कलेचा वारसा मिळाला. बालपणापासून आईच्या मागे तुणतुण्यावर लक्ष्मीबाई गाण्याला साथ द्यायच्या. उंच स्वरात झील धरायच्या. पुरूष झीलकऱ्यांसोबत साथ संगत करायच्या. त्यांचे कुटूंब नंतर अहमदनगर मध्ये स्थायिक झाल्यावर घरच्या अत्यंत गरीब परिस्थितीत त्यांना जीवन कंठावे लागले. नगरमध्ये एक पंजाबी गायन करणाऱ्या बाईकडे त्यांनी धुणी भांडी करता करता नृत्य आणि गायन कला आत्मसात केली. त्यांनी ठुमरी गायकीचे धडे घेतले. एका कार्यक्रमात लावणी गाता गाता आईचा आवाज एकाएकी बसला, ते बघताच माणसांनी हुल्लडबाजी केली. तशी छोटी लक्ष्मी उठून आईच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करू लागली. आईने तोंड हलवून अदा केली अन वेळ मारून नेली.

छोटे मोठे कार्यक्रम करता करता घरच्या मंडळींना घेऊन लक्ष्मीबाईंच्या साथीने ढोलकी फडाचा तमाशा उभा राहिला. हा ढोलकी फडाचा तमाशा १९५०-५२ च्या सुमारास गावोगावी चालत होता. हौसा – मंजुळा कोल्हापूरकर नावाने काढलेला हा ढोलकी फडाचा तमाशा गावच्या जत्रा यात्रांमध्ये प्रसिद्ध होता. सुशीला, बेबी, हौसा आणि लक्ष्मी या बहिणी तर भाऊ पांडुरंग उत्तम तबला वाजवीत तसेच धाकटा भाऊ शंकरदादा उत्तम हार्मोनियम वाजवी. सुमारे पंचवीस वर्षे हौसा – मंजुळा कोल्हापूरकर ढोलकी फडाने नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, पंढरपुर व कोकणात जाऊन अगणित खेळ केले. त्यांच्याकडे स्वतःचा तंबू आणि मालकीची गाडीही होती. मात्र पुढे तमाशाच्या अनेक फडबाऱ्या निर्माण झाल्याने लक्ष्मीबाईंनी ढोलकी फडाचा तमाशा बंद केला. ढोलकी फडाचा तमाशा बंद पडल्यावर लक्ष्मीबाईंनी उषा जयसिंगपूरकरसह लक्ष्मीबाई कोल्हापूरकर अशी नव्या धाटणीची संगीत बारी सुरु करून त्या मुंबईत दाखल झाल्या. तो काळ तमाशाप्रधान चित्रपटांचा होता. मराठी लावण्यांवर नृत्य करणाऱ्या लीला गांधींची छाप लक्ष्मीबाईंवर पडली होती. त्यातच मुंबईच्या तमाशा थिएटरातून अनेक लावणी अदाकारा नजाकतीच्या लावण्या पेश करून वाहवा मिळवत होत्या, मुळातच हरहुन्नरी असणाऱ्या लक्ष्मीबाईंच्या मनात लावणी क्षेत्रात काहीतरी वेगळं करून दाखविणाऱ्यांची उर्मी दाटली होती. त्यांनी कथ्थक चं शिक्षण घेतलं. त्याकाळी गाजलेले नामांकित उस्ताद फकीर अहमद कुरेशी, गोविंद निकम – गुरुजी व गुलाम हुसेन यांच्याकडून नृत्य कलेचे धडे गिरवले .

त्या काळी संगीत बाऱ्यांना मोठमोठे शागीर्द आवर्जून हजेरी लावीत. त्यात चित्रपट व नाटकातली मंडळी मोठ्या प्रमाणावर असत. कारण लावणी पेश करणाऱ्या संगीत बाऱ्यातून लावणी अदा करणाऱ्या गायिकेसह जी संगीताची साथ मिळायची ती लावणी बाजाला वेगळ्याच उंचीवर घेऊन जाई. या संगीतात चर्मवाद्यांबरोबर तंतू वाद्यांचाही वापर होत असे. त्यात सारंगी, दिलरुबा वाजवली जाई. अशा नादमयी संगीताच्या लयीत लक्ष्मीबाईंनी बैठकीच्या लावणी कथ्थक नृत्यातून परावर्तित केलं. लावणी ढंगात तत्कार, तोडे, मुखडे, रेले आणले. लावणीला पूर्वी नृत्याची परंपरा अशी नव्हती, पण लक्ष्मीबाईंनी अदा – नखऱ्यांचाही बेमालूम वापर करून लावणीला नवं रूप दिल. लावणीला वैभवाचे दिवस आले. शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत मुंबई – दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमातून मराठी चित्रसृष्टी व नाट्यसृष्टीतल्या मंडळीच लक्ष वेधलं गेलं. लक्ष्मीबाईंचे कार्यक्रम सर्वदूर लोकप्रिय झाले.

लक्ष्मीबाईंची लावणीचा वेगळा अविष्कार बघताच त्यांना मराठी चित्रसृष्टीने पाचारण केले. राम डवरिंच्या सुधारलेल्या बायका, ही नार रूप सुंदरी , मानाचा मुजरा, सुगंध आला मातीचा , रावसाहेब आणि बेलभंडार या चित्रपटातून त्यांना नृत्यप्रधान भूमिका देण्यात आल्या. तसेच या चित्रपटासाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलं. त्याबरोबरच काटा रुते कुणाला  व  सखी माझी लावणी  या नाटकांसाठीही लक्ष्मीबाईंनी नृत्य दिग्दर्शन केलं. शिवाय मराठी चित्रपटसृष्टीत गाजलेल्या तमाशा प्रधान भूमिका एक होता विदूषक या चित्रपटाला मोठ्या कल्पकतेने नृत्यदिग्दर्शन करून त्यांनी अमाप लोकप्रियता मिळवली. लक्ष्मीबाई कोल्हापूर कर यांना १९८३ साली एक होता विदूषक या चित्रपटाच्या नृत्य दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला तसेच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला. सखी माझी लावणी  या मधु कांबीकर यांनी रंगभूमीवर आणलेल्या लावणीवर आधारित कार्यक्रमात लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांचे योगदान मोठे होते. या कर्यक्रमात त्या ढोलकी फडाच्या तमाशातील गायकी प्रमाणे टिपेची झील धरीत तसेच लावणी नृत्य आणि अदाकारीचे दर्शन घडवीत.लावणीला वैभवाचे दिवस आणण्यात लक्ष्मीबाईंचा मोलाचा वाटा राहिला आहे .

संदर्भ : क्षेत्रसंशोधन