पेनरोज, रॉजर : ( ८ ऑगस्ट १९३१ )

पेनरोज यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून त्यांनी गणित विषयात पदवी संपादन केली. १९५८ मध्ये पेनरोज यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी प्राप्त केली. त्या संशोधनासाठी त्यांना जॉन ए.टॉड यांचे मार्गदर्शन लाभले.

पुढच्या काळात ते लंडनच्या बरबॅक महाविद्यालयामध्ये प्रपाठक झाले. या काळात त्यांचे लक्ष शुद्ध गणिताकडून खगोल भौतिकशास्त्राकडे वळले. विश्वरचनाशास्त्रामध्ये जे गणित वापरले जाते त्यामध्ये त्यांनी क्रांती घडवून आणली. स्टीफन हॉकिंग यांच्याबरोबर त्यांनी काही संशोधन केले आहे. १९६५ मध्ये या दोघांनी असा सिद्धांत मांडला की, सूर्यापेक्षा २५ पटींनी मोठ्या असलेल्या महाप्रचंड ताऱ्यांच्या उत्क्रांतीदरम्यान जेव्हा त्यांचा महाविस्फोट होतो तेव्हा गुरुत्वीय बलाचा प्रभाव वाढल्याने सर्व द्रव्य आकुंचन पावत एका बिंदूमध्ये सामावले जाते. या बिंदूची घनता अनंत असते आणि आकारमान शून्य असते. म्हणजेच विश्वातले सर्व वस्तूमान त्यामध्ये एकवटते. ताऱ्याच्या या अवस्थेला ‘कृष्णविवर’ (ब्लॅक होल) म्हणतात. कृष्णविवराभोवती असलेल्या अवकाश-काळाची स्थिती दर्शवणाऱ्या द्विमितीय आकृत्या काढण्याचे कामही पेनरोज यांनी केले. या आकृत्यांना ‘पेनरोजची आकृती’ असे म्हटले जाते. कृष्णविवराच्या जवळून जाणाऱ्या वस्तूवर त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा कसा प्रभाव पडतो हे समजून घेण्यासाठी या आकृत्यांचा उपयोग होतो.

१९८३ ते १९८७ या काळात पेनरोज यांनी ह्युस्टन येथील राईस विद्यापीठात अध्यापन केले. २००४ मध्ये त्यांनी The Road to Reality: A Complete Guide to the Laws of the Universe या नावाचे १०९९ पानांचे एक पुस्तक प्रसिद्ध केले. भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांच्या नियमांचा हा जणू एक कोशच म्हटला पाहिजे. या पुस्तकात त्यांनी स्वत: मांडलेल्या सिद्धांतांचे स्पष्टीकरणही दिले आहे. Cycles of Time: An Extraordinary New View of the Universe या पुस्तकात त्यांनी महास्फोट ही विश्वाच्या इतिहासातील आवर्ती घटना असल्याचे क्रांतिकारी मत मांडले आहे. म्हणजे महाविस्फोट एकदाच झालेला नसून ती पुन्हा पुन्हा घडणारी घटना आहे असे त्यांचे म्हणणे आहे. विश्वरचनाशास्त्रात पुंज सिद्धांत आणि व्यापक सापेक्षता सिद्धांत यांच्या एकत्रीकरणाची गरज भासेल, असे त्यांचे मत आहे. त्याला ‘पुंज गुरुत्व’ असे म्हटले जाते.

मूलभूत भौतिकशास्त्र आणि मानवी जाणीवा याबाबतही त्यांनी संशोधन आणि लेखन केले आहे. The Emperor’s New Mind, Shadows of the Mind आणि The Large, the Small and the Human Mind ही त्यांची पुस्तके या विषयाची चर्चा करणारी आहेत. मानवी जाणीवा समजून घेण्यासाठी पुंज सिद्धांताची आवश्यकता आहे असे त्यांनी प्रतिपादन केले आहे.

रॉजर पेनरोज यांना रॉयल सोसायटीचे फेलो, रॉयल ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे एडींग्टन पदक, रॉयल सोसायटीचे रॉयल पदक, भौतिकशास्त्रासाठीचा वूल्फ फाऊंडेशनचा वूल्फ पुरस्कार, ब्रिटीश इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स तर्फे डिरॅक पदक, अल्बर्ट आइन्स्टाइन सोसायटीचे अल्बर्ट आइन्स्टाइन पदक, लंडन मॅथेमॅटिकल सोसायटी नायलॉर पुरस्कार, सर पदवी, डी.मॉर्गन पदक आणि रॉयल सोसायटीचे कॉप्ले पदक असे अनेक सन्मान प्राप्त आहेत. पेनरोज यांना २०२० या वर्षाचे भौतिकीमधील नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांना ‘for the discovery that black hole formation is a robust prediction of the general theory of relativity.’ या संशोधनासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले.

पेनरोज सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठात एमेरीट राउस बॉल प्रोफेसर ऑफ मॅथेमॅटिक्स आणि ऑक्सफर्डच्या वाडहॅम महाविद्यालयामध्ये एमेरीटस फेलो आहेत.

संदर्भ :

 समीक्षक : हेमंत लागवणकर