शिगा, किओशी : (७ फेबुवारी १८७१ – २५ जानेवारी १९५७) किओशी शिगा यांचा जन्ममियागी प्रांतातील सेंजई येथे झाला. ते एक जपानी वैद्य आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. त्यांचे लालनपालन त्यांच्या मामाने केले व तेव्हा त्यांचे मूळ कौटुंबिक नाव साटो बदलून आईच्या माहेरचे नाव शिगा लावण्यास सुरुवात केली.
त्यांनी १८९६ मध्ये टोलिओ इंपिरिअल विद्यापीठातून पदवी संपादन केली. किटासाटो यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संसर्गजन्य रोगांचा अभ्यास केला. १८९७ साली जपानमध्ये जीवाणुमुळे होणाऱ्या आमांशाचे ९०,००० रुग्ण आढळले. त्यातील ३० रुग्ण दगावले. या संसर्गास कारणीभूत असलेल्या जीवाणूस प्रथम बॅसिलस डिसेंट्री असे संबोधले गेले. परंतु किओशी शिगाने केलेल्या या संशोधनच्या स्मरणार्थ त्या जीवाणूस शिगेला डिसेंट्री असे म्हंटले गेले. तसेच जीवाणूने तयार केलेल्या विषारी पदार्थास शिगा टॉक्झिन असे नाव देण्यात आले.
या जीवाणूच्या शोधानंतर १९०१-१९०५ दरम्यान शिगा यांना पॉल एर्लिक यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मनी येथे काम करण्याची संधी मिळाली. जर्मनीहून परत आल्यावर पुन्हा किरासाटो यांचा बरोबर काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातील शिगा यांच्याकडे क्षय व घटसर्प कक्षाचा अभ्यास करण्याची जबाबदारी दिली होती. १८९७ मध्ये किरासाटो यांनी शिगा यांना आमांश या रोगाच्या सूक्ष्मजीवांवर शास्त्रीय संशोधन करण्यास सांगितले.
शिगा हे आमांशाच्या रोग्यांचा अभ्यास करून त्यास कारणीभूत असलेला जीवाणू शोधण्यात यशस्वी झाले. हे जीवाणू ग्राम निगेटिव्ह दंडाकार प्रजाती होती. या खेरीज शिगा यांनी शिगेलाची लस विकसित करण्याचे काम हाती घेतले. सुरुवातीच्या असफल प्रयत्नानंतर शिगा हे शिगेलाची तोंडावाटे घेण्याची (Oral) लस शोधून काढण्यात यशस्वी झाले. ही लस हजारो जपानी नागरिकांना देण्यात आली. यावरूनच शिगा यांनी सार्वजनिक आरोग्यातील पोटाच्या विकाराच्या नियंत्रणासाठी लसीच्या वापराचे महत्त्व नमूद केले.
आमांश होण्यासाठी कमीत कमी १० ते जास्तीत जास्त १०० जीवाणूंची आवश्यकता असते. जंतूची लागणारी कमीत कमी संख्या व अत्यंत सांसर्गिक अशा या रोगाचे नियंत्रण हे सार्वजनिक क्षेत्रातील आव्हान होते.
फ्रँकफर्ट येथील संस्थेत पॉल एर्लिक प्रयोगशाळेत सहायक संशोधक म्हणून काम करण्यासाठी ते जर्मनीत रवाना झाले. शिगा यांनी विविध प्रकल्पावर काम केले. ट्रिपॅनोसोमियासिस या रोगावरील उपाय शोधण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. १९१४ मध्ये किरासाटो संस्थेत संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
ते १९२० मध्ये टोकिओमधील किओ विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. जपान सरकारच्या विनंतीवरून शिगा कोरियाला नॅशनल हॉस्पिटल ऑफ सेऊनचे संचालक म्हणून गेले. १९२६ मध्ये शिगा सेऊल विद्यापीठात स्कूल ऑफ मेडिसीनचे डीन झाले. १९२९-१९४५ या दरम्यान किरासाटो संस्थेत संशोधनासाठी ते जपानला परतले. याच काळात विविध रोगांचा अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली.
वयाच्या ८५ व्या वर्षी शिगा मृत्यू पावले.
संदर्भ :
- https://academic.oup.com/cid/article/29/5/1303/344334
- https://www.britannica.com/biography/Shiga-Kiyoshi
- https://transmissible.eu/archives/2349
समीक्षक : रंजन गर्गे