ट्वॉर्ट, फ्रेडरिक विल्यम : ( २२ ऑक्टोबर १८७७  – २० मार्च १९५० )

फ्रेडरिक विल्यम ट्वॉर्ट हे इंग्लिश सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, बॅक्टिरिओफाजेस (Bacteriophages) चे संशोधक. बॅक्टिरिओफाजेस म्हणजे असे विषाणू (viruses) की जे फक्त जीवाणू (bacteria) मध्येच वाढतात. ट्वॉर्ट यांचे डॉक्टरी शिक्षण लंडन येथील सेंट थॉमस हॉस्पिटल येथे झाले. सन १९०० मध्ये रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स व रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सचे ते सदस्य झाले. डॉ. लुईस  जेनर (Dr. Lewis Jenner) ह्यांच्या हाताखाली त्यांनी विकृतीशास्त्राचे शिक्षण घेतले व त्यात काम केले. त्यानंतर ते ब्राऊन इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमल्स येथे अधीक्षक व कालांतराने सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक झाले.

जीवाणूंच्या गुणसूत्रातील बदलामुळे जीवाणूंचे संवर्धन होताना कालांतराने गुणधर्मातही ( mutation in properties) बदल होतात हे त्यांनी प्रयोगाद्वारे दाखवून दिले. विसाव्या शतकात महारोग (कुष्ठरोग) हा भयंकर आजार मानला जायचा. मायकोबॅक्टीरियम लेप्रे (Mycobacterium leprae) ह्या जीवाणूंचे संवर्धन प्रयोगशाळेत अशक्य होते त्यामुळे त्यावरील संशोधनात अडथळे निर्माण होत. अनेक प्रयोगांनंतर ट्वॉर्ट ह्यांना कळले की महारोगाच्या जिवाणूंच्या वाढीसाठी व्हिटॅमिन के ह्या घटकाची नितांत आवश्यकता असते. व्हिटॅमिन के च्या संशोधनामुळे बऱ्याच प्रकारच्या जीवाणूंचे संवर्धन करावयास लागणारी पोषक मूल्ये कशी वापरायची ही माहिती कळली. परंतु ट्वॉर्ट यांच्या कामाचे महत्त्व फार उशिरा म्हणजे अनेक दशकांनंतर इतर शास्त्रज्ञांना उमगले.

जॉन्स रोगाच्या बाबतीतही तेच घडले. जॉन्स रोग (Johne’s disease) हा गुरांच्या आतड्यांना होणारा दीर्घकालीन चिवट व संसर्गजन्य आजार. ट्वॉर्ट यांनी त्या जिवाणूंचे संवर्धन व त्यामुळे होणाऱ्या आजाराचे विश्लेषण करून दाखवले. सरतेशेवटी त्यांच्या कामाला मान्यता मिळाली. मायकोबॅक्टीरियम एव्हियममुळे (Mycobacterium avium) होणारा पॅराट्यूबरक्युलॉसिस (paratuberculosis) हा गुरांमध्ये होणारा रोग घातक ठरायचा त्यालाच जॉन्स रोग असे म्हणत.

देवी या रोगाची लस संसर्ग झालेल्या वासराच्या कातड्यातून मिळणाऱ्या स्रावापासून तयार केली जायची. परंतु नेहमी स्टॅफायलोकोकस (Staphylococcus) या जीवाणूंच्या संसर्गामुळे ती परिणामशून्य व्हायची. त्या समस्येचे कारण शोधताना त्यांनी बॅक्टिरिओफाजेसचा शोध लावला. त्याला त्यांनी १९१५ साली कंटेजिऑन (Contagion) असे नाव दिले. काही कालावधीत डी’हेरेल (d’Herelle) या शास्त्रज्ञाने स्वतंत्रपणे बॅक्टिरिओफाजेसवर संशोधन केले – त्याला ट्वॉर्ट – डी’ हेरेल फिनॉमेनॉन असे नाव देऊन दोघांना त्याचे श्रेय देण्यात आले.

त्यानंतर पहिल्या महायुद्धादरम्यान ट्वॉर्ट यांनी रॉयल आर्मी मेडिकल कोरमध्ये नोकरी केली व त्यामुळे संशोधन मागे पडले. पुढे काही वर्षे त्यांनी बॅक्टिरिओफाजेसवर काम करण्याचा अटोकाट प्रयत्न केला, मात्र अपूर्ण अनुदानामुळे त्यांना म्हणावे तसे यश आले नाही.

त्यांना १९३१ साली युनिव्हर्सिटी ऑफ लंडनने प्रोफेसर ऑफ बॅक्टिरिऑलॉजी हे पद देऊन भूषविले. ही त्यांच्या लौकिकाची, विद्वत्तेची संशोधनादरम्यान केलेल्या कष्टाची पावती होती. सायन्स न्यूज  ह्या लेखमालेत त्यांचे संशोधन प्रसिद्ध झाले.

वयाच्या ७२ व्या वर्षी ट्वॉर्ट यांचे निधन  झाले.

संदर्भ :

 समीक्षक : रंजन गर्गे