वू, शियान-फु जेफ : (१९४९ – ) तैवान येथे जन्मलेले वू राष्ट्रीय तैवान विद्यापीठातून गणित विषयात बी.एस्सी. झाले. कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली येथे त्यांनी पीटर बिकेल (Peter Bickel) यांच्या मार्गदर्शनाखाली संख्याशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली. सध्या ते जॉर्जिया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कोका-कोला अध्यासनपीठ प्राध्यापक तसेच एच्. मिल्टन स्टेवार्ट स्कूल ऑफ इंडस्ट्रियल अँड सिस्टिम्स इंजिनिअरिंग येथे प्राध्यापक आहेत.
संख्याशास्त्रात प्रतिमानातील मापदंडांची कमाल शक्यता शोधण्याची एक पुनरावृत्तक रीत आहे EM Algorithm – Expectation Maximization Method. ती पुनरावृत्तक पद्धतीने सांख्यिकी प्रतिमानांच्या मापदंडांची अनुमाने काढते जेव्हा प्रतिमाने अनिरीक्षित आणि अप्रगट चलांवर अवलंबून असतात. ही रीत विकसित करण्याच्या कामात वू यांचे योगदान आहे.
निरीक्षणांचे यादृच्छिक नमूने वापरून आकडेवारीचा कल आणि प्रचरणाचा अंदाज करण्यासाठी संख्याशास्त्रीय अनुमानात जॅक-नायफिंग हे तंत्र वापरले जाते. उपलब्ध आधारसामग्रीच्या उपसंचाचा वापर करून नमूना संख्याशास्त्राच्या घटकांच्या (मध्यक, प्रचरण, टक्केवारी) अचूकतेचे अनुमान करणे म्हणजे जॅक-नायफिंग पद्धत. निरीक्षणांच्या यादृच्छिक नमून्यांमधील भिन्नता आणि प्रमाणदोष यांचा संख्याशास्त्रीय अंदाज बांधण्यासाठी जॅक-नायफिंगचा उपयोग होतो. या संदर्भातील वू यांचे कार्य वाखाणले गेले आहे.
बहुल निविष्टि चल असलेल्या, कार्यक्षम आणि अर्थविषयक प्रयोगांसाठी क्रमगुणाकार संकल्पना अत्यंत मूलभूत भूमिका बजावते. ही संकल्पना अभियांत्रिकी, कृषी, वैद्यकशास्त्रात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. या विषयावर वू आणि राहुल मुखर्जी यांनी लिहिलेले A Modern Theory of Factorial Designs हे उपयुक्त पुस्तक प्रकाशित झाले.
माइक हमदा यांच्यासह वू यांचे Experiments: Planning, Analysis and Optimization हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या आठ आवृत्त्या निघाल्या आहेत. त्यांच्या या कामामुळे औद्योगिक वस्तू, प्रक्रिया आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रणालींचे इष्टतमीकरण, मजबुतीकरण आणि उपचारांमध्ये तुलना करून उपयोजन करणे यात सुधारणा झाली. त्यांनी मजबूत प्राचल संकल्पना, विश्वसनीयतेत वाढ, असामान्य विदांचे विश्लेषण, अनेक स्तरांवरील संकल्पना, किमान स्वाभाविक संकल्पना, लंबकोनी रचना आणि इतर पद्धतींचे विश्लेषणात्मक वर्णन केले आहे.
वू यांनी अनेक महत्त्वपूर्ण संख्याशास्त्रीय जर्नल्सचे संपादकपद आणि उपसंपादकपद भूषवले. उदाहरणार्थ,ॲनल्स ऑफ स्टॅटिस्टिक्स, जर्नल ऑफ अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन आणि टेकोमेटीक्स. आजवर त्यांनी लिहिलेल्या शोधलेखांची संख्या १७० पेक्षा जास्त आहे.
बेल कम्युनिकेशन सेंटर,न्यू जर्सी, फोर्ड मोटर, जनरल मोटर, फायजर, युनायटेड मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स कंपनी, तैवान,अशा नामवंत कंपन्यांमध्ये समंत्रक म्हणूनही वू यांनी कार्य केले आहे.
त्यांना COPSS प्रेसिडेंट अवॉर्ड (President Award of Committee of Presidents of Statistical Societies), शेवार्ट पदक (Shewhart Medal of American Society for Quality), COPSS आर्. ए. फिशर लेक्चर अवॉर्ड (R.A. Fisher Lecture Award), युनिव्हर्सिटी ऑफ वॉटर्लूची मानद पदवी, पॅन तैवानमधील अत्यंत प्रतिष्ठीत असे वेन-युआन अवॉर्ड (Pan-Wenyuon Technology Award) आणि बॉक्स मेडल पारितोषिक, ENBIS (Europian Network of Business and Industrial Statistics) मिळाली आहेत.
ते अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन आणि इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स रिसर्च अँड मॅनेजमेंट सायन्स अशा प्रथितयश संस्थांचे फेलो आहेत.
वू यांनी ४६विद्यार्थ्यांना संशोधन करण्यास मार्गदर्शन केले.
संदर्भ :
- http://www2.isye.gatech.edu/~jeffwu/
- https://projecteuclid.org/euclid.aos/1176350142
- http://www.stat.purdue.edu/~sunz/Jeff_2014/wucv.pdf
- https://web.archive.org/web/20160304040346/http://www.icsa.org/bulletin/issues/ICSABulletin08July.pdf
समीक्षक : विवेक पाटकर