ब्रुग्‌मान, कार्ल : ( १६ मार्च १८४९ – २९ जून १९१९ ). जर्मन भाषावैज्ञानिक. पूर्ण नाव फ्रीड्रिख कार्ल ब्रुग्‌मान. व्हीस्बाडेन येथे जन्म. ब्रुग्‌मान यांचे विद्यापीठ पूर्व शिक्षण व्हीस्बाडेन येथे आणि विद्यापीठीय शिक्षण हाले येथे एक वर्ष (१८६७) व पुढील (१८६८) शिक्षण लाइसपिक येथे झाले. १८७८ पासून त्यांनी लाइपसिक विद्यापीठात अध्यापनास सुरुवात केली आणि पुढे इंडो-यूरोपियन भाषांच्या तौलनिक अभ्यासाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून त्यास मान्यता प्राप्त करून दिली. मध्यंतरी फक्त तीन वर्षे (१८८४ – ८७) त्यांनी फ्रायबर्ग विद्यापीठात अध्यापन केले.

इ. स. १८७६ साली नाझालिस झोनान्ज इन डेअर इंडोगेर्मानिशेन् ग्रुंडश्प्राख  हा ब्रुग्‌मान यांचा निबंध प्रसिद्ध झाला आणि त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. संस्कृत भाषेत जसे ‘र’ आणि ‘ल’ हे दोन वर्ण व्यंजनांखेरीज ऋ आणि लृ ह्या रूपांत स्वरांचेही कार्य करतात, तसेच इंडो-यूरोपियन मूलभाषेत ह्या दोन वर्णांखेरीज न् आणि म् ही दोन अनुनासिके ते कार्य करीत असत, असे ब्रुग्‌मान यांनी वरील निबंधात प्रतिपादन केले. त्यांचा हा सिद्धांत सर्वमान्य झाला आहे. ब्रुग्‌मान यांचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ग्रुंड्‌रिस डेअर् फेरग्लाइशेन्‌डेन् ग्रामाटिक डेअर इंडोगेर्मानिशेन् श्प्राखेन् (१८८६-९३). इंडोयूरोपियन भाषांच्या तौलनिक अभ्यासासंबंधी सु. सत्तर वर्षांत जे संशोधन झाले, त्याची पद्धतशीर मांडणी ब्रुग्‌मान यांनी ह्या ग्रंथात  केली. ह्या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या आधी झालेल्या संशोधनावर जशी त्यात दृष्टी दिसते, तशीच त्यातील उणीवांची पूर्ती आणि नव्या प्रेरणाही आहेत. एका दृष्टीने ब्रुग्‌मान यांना इंडो-यूरोपियन भाषा विज्ञानाचे पथिकृत म्हणण्यास हरकत नाही. वरील ग्रंथाची दुसरी आवृत्ती तौलनिक वाक्यविन्यासासह (सिंटॅक्स) १८९७–१९१६ मध्ये प्रसिद्ध झाली. (पहिल्या आवृत्तीत ‘वाक्यविन्यास’ हा विषय डेलब्रू‌यूक यांनी वर्णिला होता). ब्रुग्‌मान यांचा हा ग्रंथ इतका महत्त्वाचा ठरला, की मध्यंतरी त्याची एक संक्षिप्त आणि तरीही त्रिखंडात्मक आवृत्ती १९०२- ०४ मध्ये प्रसिद्ध झाली. मूळ ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर करण्यास जोझेफ राइंट यांनी सुरुवात केली आणि भाषांतराचा एलिमेन्ट्स ऑफ द कंपॅरेटिव्ह ग्रॅमर ऑफ द इंडो जर्मानिक लँग्वेजीस हा पहिला खंड १८८८ साली प्रसिद्ध झाली. उर्वरित भाषांतर आर्. सीमोर कॉन्वे आणि डब्ल्यू. एच्. डी. राउस यांनी केले आणि ते दोन ते पाच खंडांत (१८९१, १८९२, १८९५) प्रसिद्ध केले. दुसऱ्या खंडापासून पुस्तकाच्या नावात थोडा बदल करून ते अ कंपॅरेटिव्ह ग्रॅमर ….. असे ठेवले गेले.

ब्रुग्‌मान यांचे दुसरे दोन महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे ग्रीखिश ग्रामाटिक (१८८५, चौथी आवृत्ती १९१३) आणि डीझ्यून्टाक्स डेस् आइनफाखेन् झाट्त्सेस इन् इंडोगेरमानिशेन् (१९२५). दुसरा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध करण्यात आला. ब्रुग्‌मान यांनी हेरमान ओस्टहोफ यांच्या सहकार्याने मोर्फोलोगिश उन्टरझूखूंगेन्……चे सहा खंड (१८७८ – १९१०) प्रसिद्ध केले. पहिल्या खंडाला लिहिलेल्या प्रस्तावनेत पुढे प्रसिद्धी पावलेल्या ‘युंगग्रामाटिकर’ (नववैयाकरणी) ह्या संज्ञेच्या मुळाशी असलेल्या ‘युंगग्रामाटिश रिखंटुग’ ह्या वाक्‌प्रयोगाचा उपयोग ब्रुग्‌मान यांनी केला. व्हिल्हेल्म श्ट्राइटबेर्ख यांच्या सहकार्याने इंडोगेर्मानिश फोर्शुंग  या नियतकालिकाचे ३८ खंड (१८९२ – १९१९) ब्रुग्‌मान यांनी संपादिले. ‘इंडोगेर्मानिश गेझेलशाफ्ट’ ह्या १९१२ साली स्थापन झालेल्या संस्थेच्या पहिल्या अध्यक्षपदी ब्रुग्‌मान यांची निवड झाली होती. १९०९ साली त्यांना त्यांचे मित्र आणि शिष्य यांनी दोन खंडांचा फेस्टश्रिफ्ट  हा अभिनंदन ग्रंथ अर्पण केला. लाइपसिक येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Pedersen, Holger Trans. Spargo J. W. The Discovery of Language, Bloomington, 1962.
  • Sebeok, Thomas A. Ed. Portraits of Linguists, Vol. I, London, 1966.