उण्णायि वारियर : (अठरावे शतक). एक मलयाळम् कवी. त्यांच्या जीवनवृत्तांताविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. बहुसंख्य विद्वानांच्या मते त्यांचा जन्म त्रिशिवपेरूर गावाजवळ झाला व कूटलमाणिक्कम् नावाच्या मंदिरात त्यांनी ईशसेवेत काही काळ घालविला. त्यांनी बरेचसे आयुष्य तिरुवांकूर राज्यात मार्तंड वर्मा किंवा धर्मराजाच्या आश्रयाखाली घालविले.

कुंचन नंप्यारचे हे समकालीन कवी होत. मलयाळम् साहित्यातील एक उत्कृष्ट काव्य म्हणून त्यांच्या नळचरितम् कथकळीचा आवर्जून उल्लेख केला जातो. या आपल्या एकाच काव्यग्रंथामुळे मलयाळम् साहित्यात त्यांचे नाव अमर झाले आहे. त्यांच्या काव्यातील व्यक्तिरेखा जिवंत व ठसठशीत आहेत. त्यांची काव्यरचना अत्यंत रसाळ आहे. शृंगारप्रधान प्रसंगांच्या वर्णनाबरोबरच उपनिषदांतील तत्त्वांचा उपदेशही त्यांच्या काव्यात आढळतो. वारियर यांची रचना स्वतंत्र असून तिचे अनुकरण अन्य कवींना करता आले नाही. रामपंचशति  व गिरिजाकल्याण  ही दोन काव्ये त्यांनीच रचली असे सांगतात पण त्याबाबत विद्वानांत मतभेद आहेत.

संदर्भ :