गेलमान मरे : (१५ सप्टेंबर १९२९ – २४ मे २०१९) मरे गेलमान यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. पदवी शिक्षणासाठी त्यांनी येल विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यांनी भौतिकशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. पुढच्या काळात गेलमान यांनी आपले पीएच्.डी.चे संशोधन व्हिक्टर विस्कोफ यांच्या मार्गदर्शनाखाली मॅसेच्यूसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या संस्थेमधून पूर्ण केले. व त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.
त्यानंतर त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी येथे पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून काम पाहिले. गेलमान एलिनोईस विद्यापीठात वर्ष-दीड वर्ष अभ्यागत संशोधन प्राध्यापक होते. त्यापुढील दोन वर्षे त्यांनी अभ्यागत सहयोगी प्राध्यापक (कोलंबिया विद्यापीठ) आणि सहयोगी प्राध्यापक (शिकागो विद्यापीठ) ही पदे भूषविली. १९५५ मध्ये ते कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ख्यातनाम संस्थेमध्ये रुजू झाले. गेलमान यांनी तेथे निवृत्तीपर्यंत काम केले.
गेलमान यांचे संशोधन मुख्यत: कण भौतिकी या शाखेतील आहे. वैश्विक किरणातून येणाऱ्या केऑन (kaon) आणि हायपरॉन (hyperon) या कणांचे काही मूलभूत गुणधर्म त्यांनी शोधून काढले. हे कण काही वेळा अनियमित स्वरूपाचे वर्तन करतात असे गेलमान यांनी दाखवून दिले. कणांच्या या वर्तनाला त्यांनी ‘Strangeness’ असे नाव दिले. हा गुणधर्म गणिताच्या चौकटीत बसविण्यासाठी त्यांनी ‘Strangeness Quantum Number’ ची संकल्पना मांडली. तीव्र विद्युतचुंबकीय आंतरक्रियांमध्ये हा क्रमांक अक्षय्य राहतो पण क्षीण आंतरक्रियांमध्ये तो अक्षय्य राहत नाही असे त्यांनी सिद्ध केले.
हॅड्रोन (Hadron) नावाच्या महत्त्वाच्या कणांचाही गेलमान यांनी सखोल अभ्यास केला. हे कण क्वार्क नावाच्या मूलभूत कणांनी बनलेले आहेत असा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत त्यांनी मांडला. क्वार्क हे कण ग्लुऑन (gluon) नावाच्या आणखी छोट्या कणांची देवघेव करतात आणि त्यामुळे ते एकमेकांशी बांधले जातात असेही त्यांनी प्रतिपादन केले. पुढच्या काळात त्यांचे हे मत प्रयोगाने देखील सिद्ध झाले.
गेलमान यांनी मूलभूत कणाचा आणखी एक महत्वाचा गुणधर्म मांडला. त्याला त्यांनी ‘हायपरचार्ज’ (Hypercharge) असे नाव दिले. या गुणधर्माचे महत्त्व असे की हायपरचार्ज जर अक्षय्य राहत असेल तरच एका मूलभूत कणाचे दुसऱ्या मूलभूत कणात रूपांतर होऊ शकते. ही गोष्ट फक्त तीव्र विद्युतचुंबकीय आंतरक्रियांमध्ये घडून येते असे त्यांनी शोधून काढले. त्या काळात सुमारे १०० मूलभूत कण शोधले गेले होते. या कणांचे वर्गीकरण करून गेलमान यांनी मोठीच कामगिरी पार पाडली. गेलमान यांचे हे सर्व संशोधन कार्य लक्षात घेऊन त्यांना १९६९ सालचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नोबेल पुरस्काराखेरीज गेलमान यांना अमेरिकन ॲकेडमी ऑफ अचिव्हमेंटसचा गोल्डन प्लेट पुरस्कार, फ्रँकलिन मेडल, अल्बर्ट आइनस्टाइन मेडल अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
आयुष्याच्या शेवटच्या काळात गेलमान कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एमेरीटस प्राध्यापक, सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठ प्राध्यापक आणि न्यू मेक्सिको विद्यापीठात अध्यक्षीय प्राध्यापक ही पदे भूषवीत होते. एन्सायक्लोपिडीया ब्रिटानिकाच्या संपादक मंडळावरही त्यांनी काम केले.
न्यू मेक्सिको येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
समीक्षक : हेमंत लागवणकर