गॉर्डमर, नेडीन : (२० नोव्हेंबर १९२३ – १३ जुलै २०१४). साहित्यातील नोबेल पुरस्कार आणि बुकर पुरस्कार प्राप्त दक्षिण आफ्रिकेतील लेखिका आणि राजकीय कार्यकर्त्या. दक्षिण आफ्रिकेच्या साहित्याचा प्रातिनिधिक आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गॉर्डमर ह्या तेथील वर्णभेदाच्या धोरणाविरोधी नेहमीच सक्रिय राहिल्या आहेत. त्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या सदस्य सुद्धा होत्या. नेल्सन मंडेलांचे सुप्रसिद्ध भाषण आय एम प्रिपेर्ड टू डाय याचे संपादन गॉर्डमर यांनी केले होते. दक्षिण आफ्रितेतील स्प्रिंग्स मध्ये जन्मलेल्या गोर्डीमरचे आई वडील ज्यू वंशाचे होते. वडील लाटाव्हियातील आणि आई इंग्लंडची होती. त्यांचा वावर धर्मनिरपेक्ष घरात झाला. आर्थिक व वांशिक समानता याविषयी त्यांची आवड आई वाडिलांमुळे वाढत होती. सुरूवातीला त्यांचे शिक्षण कॅथलिक शाळेमध्ये झाले.
गॉर्डमर यांनी कादंबऱ्या, लघुकथा आणि निबंध लेखन मुबलक प्रमाणात केले आहे. वयाच्या १५ व्या वर्षी चिलड्रन्स संडे एक्सप्रेस मध्ये गॉर्डमर यांची पहिली कथा १९३७ साली प्रकाशित झाली. गॉर्डमरच्या प्रमुख लेखनामध्ये द लायईंग डेज (१९५३), ए वर्ल्ड ऑफ स्ट्रेंजर्स (१९५८), ऑकेजन फॉर लव्हिंग (१९६३), द लेट बुर्ज्वा वर्ल्ड (१९६६) ए गेस्ट ऑफ ऑनर (१९७१) द कंझरव्हेशनिस्ट (१९७४), बर्गर्स डॉटर, जुलैज पीपल, ए स्पोर्ट ऑफ नेचर (१९८७), माय संस स्टोरी (१९९०), नन टू अकंपनी मी (१९९४), द हाऊस गन (१९९८), द पीक अप (२००१), गेट अ लाईफ (२००५), आणि नो टाईम लाईक द प्रेझंट (२०१२) या कादंबऱ्यांचा उल्लेख केला जातो. तसेच त्यांच्या महत्वाच्या कथासंग्रहमध्ये फेस टू फेस (१९४९), द सोफ्ट व्हाईस ऑफ द सर्पंट अँड अदर स्टोरीज (१९५२), सिक्स फिट ऑफ द कंट्री: फिफ्टीन शोर्ट स्टोरीज (१९५६), फ्रायडेज फूटप्रिंट (१९६०), नॉट फॉर पब्लिकेशन: फिफ्टीन स्टोरीज (१९६५), लिव्हिंगस्टन्स कंपॅनियंन्स (१९७२), सिलेक्टेड स्टोरीज (१९७५), सम मंडे फॉर शुअर (१९७६), ए सोल्जर्स एमब्रेस (१९८०), समथिंग आउट देअर (१९८४), रिफ्लेक्शन्स ऑफ साउथ आफ्रिका (१९८६), जॅम्प अँड अदर स्टोरीज (१९९१), क्राइम्स ऑफ कॉनसायन्स (१९९१), व्हाय व्हॅवंट यू रिटन: सिलेक्टेड स्टोरीज १९५०-१९७२ (१९९३), लूट अँड अदर स्टोरीज (२००३) यांचे नाव घेणे क्रमप्राप्त ठरते. त्यांच्या नॉनफिक्शन लेखनात द एसेन्सिल जेसचर: रायटिंग पोलिटिक्स अँड प्लेसेस (१९८८), ऑन द माईन्स (१९७३) आणि द ब्लॅक इंटरप्रीटर्स (१९७३), लिविंग इन होप अँड हिस्टरी: नोट्स फ्रॉम अवर कंट्री (१९९९) यांचा उल्लेख होतो.
१९७४ सालचा बुकर पुरस्कार हा स्टॅन्ली मिडलटन यांच्या हॉलिडे आणि नेडीन गॉर्डमर यांच्या द कंझरव्हेशनिस्ट या दोन कादंबऱ्यांना संयुक्तपणे दिला होता. द कंझरव्हेशनिस्ट या कादंबरीचा नायक मेहरींग हा श्रीमंत आहे. मेहरींग हा वर्णभेदकालीन दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या श्रीमंत वर्णद्वेषी उद्योगपतीचे प्रातिनिधिक पात्र आहे. त्याला तेथील वर्णभेदाचे अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे. तो पुराणमतवादी कल्पना घेऊन जगतो म्हणून कंझर्व्हेशनिस्ट. जमीन-जुमला, संपत्ती, नातेसंबंध असूनही तो खऱ्या अर्थाने मालक बनू शकत नाही. त्याची पत्नी, मुलगा, त्याची प्रेयसी हे सर्व त्याला सोडून जातात. त्याचे नोकर आणि अधीक्षक सुद्धा त्याच्याविषयी फारशी आस्था दाखवत नाहीत. पहिले दुष्काळ आणि नंतर पुरामुळे त्याचे शेत उद्ध्वस्त होते. अशा या मेहरिंगच्या गोष्टीतून वर्णभेद कालीन दक्षिण आफ्रिकेचे चित्र गॉर्डमर यांनी रेखाटले आहे.
गॉर्डमर यांच्या लेखनात नैतिक आणि वांशिक, निर्वासन आणि परकेपणा अशा प्रश्नांचा उहापोह होताना दिसतो. त्या आपल्या लिखाणातून एक प्रकारे दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेद आणि वर्णभेदोत्तर काळाचा इतिहास मांडतात. त्यांच्या साहित्यातील पात्रे वर्णभेद, अन्यायविरुद्ध उभे राहतात. निर्दयी, अत्याचारी सरकारी धोरणाविरुद्ध लढतात. दक्षिण आफ्रिकेच्या श्वेत राष्ट्रवादी लोकांकडून स्थानिक अश्वेत किंवा काळ्या लोकांना कसे भेदभाव, अपमान आणि अमानुष वागणूक दिली जाते, काळ्या नागरिकांना त्यांच्या नागरी हक्क व स्वातंत्र्यापासून कशा रीतीने वंचित ठेवले गेले याचे चित्रण त्यांनी अचूकपणे रेखले आहे. गॉर्डमर ह्या त्या समाजाचे प्रतिनिधी, आवाज आणि विवेक बनून लिखाण करतात. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदकालीन राजवटीमध्ये त्यांच्या बर्गर्स डॉटर आणि जुलैज पीपल अशा कादंबऱ्यावर सरकारकडून बंदी आणली होती. १९६० आणि १९७० मधील वर्णभेदाविरोधात उभारलेल्या चळवळी व १९९० मधील स्वतंत्र्य दक्षिण आफ्रिका हे गॉर्डमर च्या साहित्यातून प्रकट होताना दिसते.
अमेरिकेतील येल, हार्वर्ड, कोलंबिया आणि न्यू स्कुल फॉर सोशल रिसर्च, युनिव्हर्सिटी ऑफ ल्युवेन, बेल्जियम, युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क व केंब्रिज युनिव्हर्सिटी आणि दक्षिण आफ्रिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ केप टाऊन व वीटवारसँड अशा जगातील महत्त्वाच्या विद्यापीठांनी मानद पदव्या देऊन गॉर्डमर यांचा सन्मान केला आहे. तसेच २००७ साली फ्रान्सचा लिजन ऑफ ऑनर देऊन गॉर्डमर यांना सन्मानित केले आहे.
संदर्भ :
- Driver,Dorothy (compiled), Nadine Gordimer : a Bibliography of Primary and Secondary Sources, 1937-1992, 1994.
- King, Bruce (Edi), The Later Fiction of Nadine Gordimer, London: Macmillan, 1993.
- Smith,Rowland (Edi), Critical Essays on Nadine Gordimer, Boston: Hall, 1990.