ग्राहकांच्या इच्छेनुसार वस्तू व सेवा यांचे उत्पादन अथवा पुरवठा निर्धारित करणे, म्हणजे उपभोक्त्यांचे सार्वभौमत्व होय. यामध्ये उत्पादकाला ग्राहकांच्या मागणी व गरजांचा विचार करावा लागतो; उपभोक्त्यांच्या मागणीनुसार उत्पादने व त्यांत बदल करावे लागतात.
मोठे उत्पादक प्रत्यक्ष व्यवहारात ग्राहकाच्या ‘गरजा व इच्छा’ यांच्यावर जाहिरातींचा मारा करताना दिसतात. तसेच बाजारातील अन्य काही घटकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कमी-अधिक प्रमाणांत त्यांच्यावर प्रभाव पडलेला असतो. अर्थशास्त्रज्ञांना अपेक्षित असे ‘ग्राहकाचे राज्य’ केवळ ‘आदर्श प्रारूप’ आहे. वेगळ्या शब्दांत असेही म्हणता येईल की, ग्राहक-वर्तन अभ्यासताना केवळ ‘ग्राहकाची मानसिकता’ हा एकच घटक समोर न ठेवता, ग्राहकांचे व्यापक सामाजिक-सांस्कृतिक संदर्भचौकटीमध्ये अध्ययन केले, तरच अर्थपूर्ण निष्कर्ष मिळू शकतील. व्यवहारांत ‘उत्पादकांचा वरचष्मा’ किंवा ‘ग्राहकांचे राज्य’ आहे, असा तौलनिक अंदाज बांधणे शक्य असते.
उपभोक्ता उत्पादनाच्या निर्णयावर प्रभाव पाडतो. तो कोणत्या वस्तू व सेवांची खरेदी करणार आहे? हे उपभोक्त्याच्या मनाचा प्रभाव थेट उत्पादकाच्या निर्णयावर पडतो. उपभोक्ता ज्या वस्तू व सेवांना प्राधान्य देतो, त्यांच्या मागणीत वाढ होते. उपभोक्त्याचा बाजार हा त्याच्या निर्णयाभोवती फिरत असतो. उपभोक्त्याच्या मागणीनुसार उत्पादन घेतले जाते. बाजारात उपभोक्त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य असते. उपभोक्ता स्वतंत्रपणे निर्णय घेतो. त्यावर कोणाचेही दडपण नसते. उत्पादकांनी अर्थव्यवस्थेत कोणत्या वस्तू व सेवा निर्माण कराव्यात हे उपभोक्त्यांच्या हातात असते, ती उपभोक्त्यांची शक्ती असते; कारण उपभोक्त्यांनी केलेल्या वस्तूंच्या मागणीनुसारच वस्तूंचे उत्पादन केले जाते.
स्पर्धात्मक बाजारात उपभोक्त्याच्या सार्वभौमत्वाला सर्वाधिक महत्त्व आहे. उपभोक्ता आपल्या कल्याणाची काळजी घेताना ज्या वस्तू व सेवा चांगल्या आहेत, त्याच तो विकत घेतो व वापरतो. उपभोक्ता वस्तूंचा प्राधान्यक्रम ठरवितो आणि त्यांचे महत्त्व विचारात घेऊन त्यांची निवड करतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उपभोक्त्यास वस्तू व सेवांच्या निवडीचे स्वातंत्र्य असते. त्या दृष्टीकोनातून उपभोक्ता हा बाजारात राजा असतो. उपभोक्ता पाहिजे त्या वस्तू पाहिजे त्या प्रमाणात खरेदी करू शकतो. तो प्राधान्यक्रमाने वस्तू विकत घेतो. प्रत्येक उत्पादक विविध प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन करताना तो उपभोक्त्याचा प्राधान्यक्रम आणि त्यांच्या अभिरुचीप्रमाणे उत्पादन करतो. उत्पादकाला उत्पादन करण्याचे स्वातंत्र्य असते. उपभोक्त्याच्या आवडी-निवडीनुसार उत्पादन करून उपभोक्त्याचे समाधान अधिक वाढविले जाते. त्यातूनच उत्पादकाला नफा प्राप्त होते. बाजारयंत्रणेद्वारे उपभोक्ता आपली अभिरुची आणि प्राधान्य कळवितो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत अमर्याद गरजा आणि मर्यादित आणि बहूपयोगी साधनसामग्री असते. उपभोक्ता उत्पादकाने निर्माण केलेल्या विविध प्रकारच्या वस्तूंची अपेक्षा करतो. उपभोक्त्याला ज्या वस्तू व सेवांची अनपेक्षितपणे गरज भासते, ती वस्तू व सेवा अधिक किंमत देऊन खरेदी केली जाते. त्यातून उत्पादकाला जास्त नफा मिळतो. उपभोक्त्याला निकड नसलेल्या वस्तू व सेवांची खरेदी कमी प्रमाणात होते. त्यामुळे उत्पादनाच्या किमती कमी होतात. त्यातून उत्पादकाच्या नफ्याचे प्रमाण घटते. जर उत्पादकाने उपभोक्त्याचा विचार न करता उत्पादन वाढविले तर, उत्पादनाचे मूल्य कमी राहते व किंमतही कमी ठेवावी लागते. जर पुरवठ्याचे प्रमाण कमी असेल, तर वस्तूची प्रतिष्ठा वाढते. त्यामुळे उपभोक्त्याच्या मनात जास्त किंमत देण्याची इच्छा निर्माण होते. उपभोक्ता वेगवेगळ्या उत्पादनांस वेगवेगळ्या किमती अदा करतो. किमती उपभोक्त्याच्या आवडीनिवडीनुसार बदलतात. उपभोक्ता त्याच्या आवडीनिवडीला अधिक महत्त्व देतो.
उपभोक्त्याच्या आवडी-निवडीचा प्रभाव वस्तू व सेवांच्या किमतींवर दिसून येतो. उपभोक्त्याच्या निवडीच्या प्रभावामुळे उत्पादकाला मार्गदर्शन मिळते. जी कोणी व्यक्ती उद्योग सुरू करू इच्छीत असेल, तो उपभोक्त्याकडून प्रेरणा घेऊन विशिष्ट वस्तूंची निवड करते. उत्पादक अशाच उत्पादनाची निवड करतो की, ज्या उत्पादनास मोठ्या प्रमाणावर मागणी आणि जास्तीत जास्त किंमत भविष्यात प्राप्त होईल. उपभोक्त्याच्या आवडी-निवडीचा प्रभाव आपोआप किंमतयंत्रणेवर दिसून येईल. म्हणून उपभोक्ता हा सार्वभौम आहे. उपभोक्ता हा किंमत आणि उत्पादन यांचा मेळ घालताना त्याला ज्या वस्तू व सेवांची गरज जास्त भासते, त्यांना तो जास्तीत जास्त प्राधान्य देतो. उत्पादकाने अधिक उत्पादन केले, तर त्याला जास्तीत जास्त नफा मिळविता येईल. जर उपभोक्त्याचा विचार न करता उत्पादन घेतले, तर त्यास कमीत कमी किंमत आणि कमीत कमी नफा मिळेल. त्यामुळे उत्पादक उत्पादन घेताना आणि सामग्रीची वाटणी करताना उपभोक्त्याच्या आवडी-निवडीला महत्त्व देतो; कारण उत्पादक उपभोक्त्यावर अवलंबून असतात आणि उपभोक्ता स्वतंत्र, सार्वभौम असतो.
उपभोक्त्याच्या सार्वभौमत्वावरील मर्यादा : (१) उत्पन्नाच्या असमान वाटणीमुळे मर्यादा येते. (२) वस्तूच्या उपलब्धतेवर सार्वभौमत्व अवलंबून असते. (३) उपभोक्त्याची निवड/पसंती संयुक्त असेल, तर मर्यादा येते. (४) उपभोक्ता विवेकी नसेल, तर मर्यादा येते. (५) सामाजिक बंधने पाळावी लागतात. (६) वस्तूंचा दर्जा आणि गुणवत्तेनुसार सार्वभौमत्व निश्चित होते. (७) जाहिरात आणि प्रचार व प्रसाराचा परिणाम होतो. (८) मक्तेदारीमुळे सार्वभौमत्व मर्यादित होते. (९) सरकारच्या कायदे आणि बंधनांचा परिणाम होतो. (१०) करप्रणाली, फॅशन यांच्या मर्यादा येतात.
समीक्षक : राजस परचुरे