हेझ, मेरी. (१७६० – २० फेब्रुवारी १८४३). ब्रिटिश कादंबरीकार, निबंधकार, सुधारवादी आणि स्त्रीवादी विचारवंत. युसेबिया या टोपण नावानेही ती परिचित आहे. जन्म सदर्क, ब्रिटन येथे. थोर ब्रिटिश स्त्रीवादी मेरी वॉलस्टोनक्राफ्ट यांच्या विचाराने प्रभावित लेखिका असा परिचय असलेली मेरी हेझ ही १८ व्या शतकातील महत्वाच्या ब्रिटिश स्त्रीवादी लेखिकांपैकी एक आहे. वयाचे पहिले १७ वर्षे शांतपणे व्यतीत करणार्या मेरीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती शेजारच्याच घरात राहणार्या जॉन एक्ल्स या तरुणाच्या प्रेमात पडल्यानंतर. दोन्ही कुटुंबांना त्यांचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. त्यानंतर १ वर्षापेक्षा अधिक काळ दोघांनी गुप्तपणे पत्रांद्वारे आपले प्रेमसंबंध टिकवले. १७८० मध्ये दोन्ही कुटुंबाने त्यांच्या संबंधांना मंजूरी दिली; पण लग्न होण्यागोदरच जॉनचा तापाने मृत्यू झाला. मेरीने त्यानंतर अविवाहित राहण्याचा निर्णय घेवून आपलं लक्षं बौद्धिक साधना, वाचन, लेखन आणि धार्मिक आणि राजकीय सुधारकांशी वैचारिक संबंध प्रस्थापित करण्याकडे वळवले.
१७८२ ते १७८९ दरम्यान मेरीने पॉलिटिकल कॅटेचिझम (१७८२) चे लेखक बॅप्टिस्ट उपदेशक आणि परोपकारी रॉबर्ट रॉबिन्सन यांच्याशी पत्रांद्वारे विचारांची, भावनांची देवाणघेवाण केली. मेरी हेझच्या सुरुवातीच्या कठीण काळात रॉबिन्सन हे तिचे मित्र आणि मार्गदर्शक ठरले. द हमिट, अन ओरिएंटल टेल ही तिची पहिली साहित्यकृती युनिव्हर्सल मॅगझिनमध्ये १७८६ मध्ये प्रकाशित झाली. मेमोईर्स ऑफ एमा कर्टनी ही तिची पहिली कादंबरी. १७९६ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीत सॅम्यूअल जॉनसनच्या रासेलासशी मिळत्याजुळत्या हमिटच्या शैलीची प्रचिती येते. लंडनच्या जेकबिन बुद्धिवंतांच्या मंडळामध्ये जॉज डायर, मेरी वॉलस्टोनक्राफ्ट आणि प्रकाशक जोसेफ जॉनसन यांच्यासह हेझ देखील सामील झाली. ती वॉलस्टोनक्राफ्ट यांच्या अ विंडीकेशन ऑफ द राइट्स ऑफ वूमन (१७९२) या स्त्रीवादी विचारसरणीला जन्म देणार्या पुस्तकाने मेरी हेझला तिच्या साहित्यिक आणि बौद्धिक लेखन प्रकाशित करण्यास प्रेरित केले. यात तिची बहीण एलिझाबेथने देखील योगदान दिले. लेटर्स अँड एसेज, मॉरल अँड मिसलेंनीयस हे पुस्तक १७९३ मध्य प्रकाशित झाले. मेरीने या पुस्तकात संभाषणात्मक तसेच उपदेशात्मक शैलीचा वापर केला.
मेरीची मेमोईर्स ऑफ एमा कर्टनीही पहिली कादंबरी तिच्या वैयक्तिक जीवनातील विलियम फ्रेंडबरोबरच्या प्रेमसंबंध जोपासण्याची धडपड आणि त्यातील अपयश यातून प्रेरित झाली होती. एम्माची लैंगिक आणि बौद्धिक निराशा ही कादंबरीच्या नैराश्य आणि अपूर्ण अपेक्षांच्या अविरत आणि दडपणात्माक पद्धतीमध्ये प्रतिबिंबीत झालेली दिसते. एक पत्रात्मक कादंबरी म्हणून जाणीवपूर्वक असंतुलित आणि एकतर्फी वर्णन केल्याचे आढळते. प्रथमपुरुषी निवेदांनातून एम्माची अपवर्जन, नकार आणि छळाची कहाणी यात येते. मेरी हेझने आपल्या रचनात्मक तसेच विषयात्मक मांडणीतून हेच दर्शवले की महिलांना समाजातील बर्याच महत्त्वाच्या कार्यात सहभागी होण्यापासून रोखले जाते. तिच्याच रूपकात सांगायचं झालं तर महिला या “जादूच्या वर्तुळातच मर्यादीत असतात.” तिच्या स्त्रीवादी विचारांना स्पष्टपणे मांडण्याच्या क्षमतेमुळेच तिची दुसरी कादंबरी विक्टिम ऑफ प्रेज्युडिस (१७९९) प्रबळपणे पितृसत्ताक विचारसरणीचं खंडन करण्यात यशस्वी ठरते.
मेरी हेझला १८व्या शतकातील स्त्रीकोशकार म्हणून ओळख प्राप्त झाली आणि जनस्मृतीत जो साहित्य वारसा सर्वाधिक काळ टिकून राहिला. फिमेल बायोग्राफी (१८०३) या ६ खंडात प्रकाशित झालेला कोशात मेरीने २९०ब्रिटिश आणि अन्य देशांतील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या स्त्रियांची चरित्रे साकारली आहेत. हे लेखन तिच्या संकलन कौशल्य आणि मनोरंजक कथानकीय मांडणीचा एक उत्कृष्ठ नमूना आहे.
मेरी हेझ तिच्या आयुष्याच्या उत्तरार्धात देखील कादंबरी लेखन करत राहिली; तथापि तिची शैली ही अधिक उपदेशात्मक आणि पुराणमतवादी होत गेली. १८२४ नंतर मेरी हेझ लंडनमध्ये स्थायिक झाली आणि नंतरच्या काळात अशक्तपाणा वाढल्याने वयाच्या ८३ व्या वर्षी लंडन येथे तिचा मृत्यू झाला.
संदर्भ :
- Hays, Mary., Female Biography: Or Memoirs of Illustrious and Celebrated Women, of All Ages and Countries, RC Weightman, Washington City, Fry & Kammerer, Printers, 1807.
- Hays, Mary., Memoirs of Emma Courtney, Broadview Press, 2000.
- Hays, Mary., The Victim of Prejudice, Broadview Press, 1998.
- http://www.maryhayslifewritingscorrespondence.com/
- http://www.maryhayslifewritingscorrespondence.com/mary-hays-correspondence/mary-hays-chronology