नागरी अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी आधुनिक शाखा आहे की, ज्यात प्रामुख्याने नागरी भागांतील आर्थिक पर्यावरणाच्या संदर्भात अभ्यास केला जातो. आर्थिक विकासाच्या विविध निर्देशकांपैकी वृद्धिंगत नागरीकरण हे आर्थिक विकासाचे एक परिमाण व निर्देशक मानले जाते. नागरीकरणाच्या प्रक्रियेचा दर व तिची दिशा यांचे निश्चितीकरण सर्वसाधारण आर्थिक विकासाच्या प्रक्रियेशी निगडित असते. त्याच प्रमाणे ज्या वेगाने व ज्या प्रकारे नागरीकरणाची प्रक्रिया आकारत असते, त्यामुळेही विकासाचे काही प्रश्न निर्माण होतात. नागरीकरणाची प्रक्रिया आणि आर्थिक विकास यांत अन्योन्य संबंध आहे. नागरीकरणाची प्रक्रिया नागरी विभागात राहणाऱ्या सर्वच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाच्या विविध अंगांना स्पर्शणारी आहे. साहजिकच वेगाने होणाऱ्या नागरीकरणाचे लाभ व तोटे प्रत्येकाच्याच परिचयाचे आहेत.
नागरी अर्थशास्त्रात मुख्यतः नगरांचा उदय, त्यांची वृद्धी आणि विकास, नगरांची कार्यपद्धती, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, गृहनिर्माण आणि स्थानिक सरकारांची वित्तव्यवस्था, शासकीय धोरणे इत्यादींचा समावेश आहे. नागरी अर्थशास्त्र ही सूक्ष्म अर्थशास्त्राची एक शाखा असून यांत प्रामुख्याने नागरी स्थलीय रचना आणि निवासी, व्यवसाय, उत्पादन संस्था आणि उद्योगधंदा यांच्या स्थाननिश्चयनाचा अभ्यास केला जातो. वाढत्या लोकसंख्येनुसार आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टीने नगर व महानगरांना विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. विशेषतः विकसनशील राष्ट्राच्या आर्थिक विकासात नागरी भागाचे योगदान वाढत आहे. या दृष्टीने नागरी अर्थशास्त्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नागरी अर्थशास्त्र प्रामुख्याने नगरांची निर्मिती, कार्यपद्धती आणि विकास यांविषयीचे आर्थिक प्रेरणांचे मुलभूत आकलन होण्यासाठी व्यक्ती आणि संस्था यांच्यातील स्थलीय संबंधावर लक्ष केंद्रित करते.
नगरांमधील सुखसोयी, उपभोगाच्या वस्तूंची मुबलक उपलब्धता व त्यांची विविधता, नगरांमधून केंद्रीभूत झालेले आर्थिक व्यवहार व त्यामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या विविध संधी, नागरीकांचे जीवनमान, वैयक्तिक स्वातंत्र्य, विकासाचे खुले असलेले मार्ग, आधुनिकीकरण, तांत्रिक प्रगती, उत्पादकतेतील वाढ या सगळ्या नागरी जीवनाच्या देणग्या आहेत; परंतु अनिर्बंध आणि अनियंत्रित नागरीकरणाचे दुष्परिणामही प्रत्येकच नगरवासियांना जाणवतात. बेसुमार वाढणारी नगरे, अविरत होणारे स्थलांतरण, शहरांमधील रस्त्यांवरून वाढणारी गर्दी, वाहतुकीची कोंडी, हवा, पाणी व आवाज यांचे प्रदूषण, निवासी घरे, राहणीमानाचा दर्जा, वीज, पाणी, आरोग्य, मलःनिस्सारण यांसारख्या पायाभूत नागरी सुविधांचा सातत्त्याने घसरणारा दर्जा, नगरांमधील वाढती बेरोजगारी, दिवसेंदिवस वाढणाऱ्या झोपडपट्ट्या, वाढती गुन्हेगारी, प्रत्यक्ष ढासळणारा कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती या अनिर्बंध आणि अनियंत्रित नागरीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्या आहेत.
नागरीकरणाच्या अनेक समस्यांवरील परिणामकारक उपायांसाठी नागरीकरणाची प्रक्रीया, कशी, कधी व का घडून येते? या प्रक्रीयेत अंतर्भूत होणारे घटक कोणते? त्यांचा एकमेकांशी असणारा अन्योन्य संबंध कशा प्रकारचा आहे? या परस्परसंबंधामध्ये होणाऱ्या बदलांमुळे नागरी विकासाचा आकृतीबंध कसा आकारत व बदलत जातो? यांसारख्या प्रश्नांचा अभ्यास आवश्यक ठरतो. या गरजेतूनच नागरी विभागांचे आर्थिक प्रश्न स्वायत्तपणे अभ्यासण्यासाठी ‘नागरी अर्थशास्त्र’ या एका तुलनेने नवीन व सुसंघटित ज्ञानशाखेचा उदय १९६० च्या दशकात झाला.
नागरी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने नागरीकरणाची मुलभूत संकल्पना, नागरीकरणाची पातळी, नागरीकरणाचा दर, नागरीकरणाचे निर्देशक, नागरीकरणाची संख्यात्मक व गुणात्मक वैशिष्ट्ये, नागरीकरण प्रक्रिया, लोकसंख्येच्या आकारमानानुसार नगरांचे वर्गीकरण, औद्योगिकरण व नागरीकरण यांतील परस्परसंबंध, जागतिक व स्वदेशी पातळीवरील नागरीकरणाचे कल, नागरी वृद्धीचे घटक, स्थलांतरण प्रक्रिया, त्याचे निर्धारक, प्रकार, कारणे, परिणाम, स्थलांतराचे सिद्धांत, नागरी वृद्धीत स्थलांतरणाचे योगदान, नागरी विकास व वृद्धीविषयीचे सिद्धांत, भूमी उपयोजन, नागरी समूहन परिव्यय-हासक अनुकुलता, नागरी रोजगार, नागरी दारिद्र्य, नागरीकरणाचा व्यय व लाभ, नागरी मुलभूत भौतिक व सामाजिक संरचना, सार्वजनिक उपयोगिता, नागरी गृहनिर्माण, नागरी वाहतूक, नागरी स्थानिक संस्थाची भूमिका, त्याचे वित्तीय स्रोत, स्वयंसेवी संस्थांची भूमिका, पर्यावरणीय स्थिती इत्यादी घटकांचे स्वरूप, सद्यस्थितीतील बदल, समस्या, त्यांचे निराकरण व नागरी विकासाशी संबधित शासकीय धोरणे इत्यादी महत्त्वपूर्ण अंगांचा प्रामुख्याने समावेश होतो. पॉल अँटनी सॅम्युएल्सन, बॉब सोलो, बॉब लुकास, बिल व्हिक्रेय, जो स्टिग्लिट्झ आणि पॉल रॉबिन क्रूगमन या नामवंत अर्थशास्त्रज्ञांचे नागरी अर्थशास्त्र विकासात बहुमोलाचे योगदान आहे.
संदर्भ :
- Douglas, M. Brown, Introduction to Urban Economics, 1974.
- Edwin, S. Mills, Urban economics, London, 1980.
- The New Palgrave Dictionary of Economics, 2008.
समीक्षक : प्रभाकर कुलकर्णी