केनेडी, केनिथ एड्रियन रेने (Kennedy, Kenneth Adrian Raine) : (२६ जून १९३० – २३ एप्रिल २०१४). प्रसिद्ध अमेरिकन जैविक व न्यायवैद्यक मानवशास्त्रज्ञ. केनेडी यांचा जन्म अमेरीकेतील ऑकलंड, कॅलिफोर्निया येथे झाला. त्यांच्या आईचे नाव मार्गारेट, तर वडिलांचे नाव वॉल्टर होते. ते इ. स. १९४१ मध्ये सॅन फ्रॅन्सिस्को येथे स्थलांतरित झाले. तेथील लॉवेल हायस्कूलमधून इ. स. १९४९ मध्ये केनेडी यांनी पदवी संपादन केली. नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठातून १९५३ मध्ये ते बी. ए. पूर्ण करून १९५४ मध्ये त्यांनी एम. ए. ही पदवी संपादन केली. त्यांनी आपला एम. ए.चा ‘दी अबोरिजिनल पॉप्युलेशन ऑफ ग्रेट बेसिन’ हा प्रबंध थिओडोर डी. मॅककाऊन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. त्यांचा प्रबंध कवटी आणि उर्वरित शरीर अस्थिच्या स्वरूपावर होता आणि नंतर तो प्रकाशितही करण्यात आला. केनेडी यांनी १९६२ मध्ये ‘दी बालांगोडिज ऑफ सिलोन : देअर बोयोलॉजिकल अँड कल्चरल अॅफिनीटिज विथ दी वेदाज’ या प्रबंधावर पीएच. डी. पूर्ण केली. त्यांच्या या संशोधनातून आणि मॅककाऊन यांच्या प्रभावामुळे त्यांनी आपल्या दक्षिण आशियातील पुरामानवशास्त्राच्या प्रदीर्घ आणि अभ्यासपूर्ण कारकिर्दीची सुरुवात केली.
केनेडी हे एक अभ्यासक आणि क्षेत्र संशोधक असून त्यांनी १९६२ ते १९८८ या काळात दक्षिण आशियामध्ये ५० महिन्यांपेक्षा जास्त वेळ घालविला. हिमालयीन भूमीवरील त्यांनी केलेल्या व्यापक पुरामानवशास्त्राच्या कार्यामध्ये भारत (डेक्कन कॉलेज, पुणे आणि अलाहाबाद विद्यापीठ), पाकिस्तान (इस्लामाबाद विद्यापीठ) आणि श्रीलंका या देशांचा समावेश होता. भौगोलिक दृष्ट्या दक्षिण-पूर्वेकडील श्रीलंकेपासून वायव्येतील पाकिस्तानपर्यंत आणि कालखंडाच्या दृष्टीने मायोसिन काळापासून (उदा., शिवालिक टेकड्यांच्या भागातील मानवसदृश कपी) ते मध्य होलोसिनच्या काळापर्यत (उदा., सिंधू संस्कृती) त्यांच्या कामाची व्याप्ती आश्चर्यचकित करणारी होती.
केनेडी यांनी पुरामानवशास्त्र या विषयावर अनेक पुस्तके आणि मोनोग्राफचे लेखन व संपादन केले. ज्यामध्ये गॉड-एप्स अँड फोसील मॅन (२०००) या पुस्तकाचा समावेश आहे. या पुस्तकाला आणि अर्थात केनेडी यांना २००२ मध्ये अमेरिकन अॅन्थ्रोपोलॉजिकल असोसिएशनच्या बायोलॉजिकल अॅन्थ्रोपोलॉजी विभागाच्या डब्ल्यू. डब्ल्यू. होवल्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुस्तकात त्यांनी दक्षिण आशियातील पुरामानवशास्त्रीय संशोधनाच्या विस्तृत इतिहासाची रूपरेषा दिली आहे. तसेच त्यात त्यांनी उपखंडातील प्रागैतिहासिक संस्कृतींचे विस्तृत सर्वेक्षण केले आहे. पुरातत्त्व, पुराजीवशास्त्र, पर्यावरणीय आणि मानवशास्त्रविषयक माहितीचे संकलन त्यांनी सहजतेने केले. त्यांच्या अनुभवावर आधारित एक नवा दृष्टीकोनही त्यांनी दिला.
केनेडी यांनी न्यायवैद्यक मानवशास्त्र आणि जीवशास्त्रीय मानवशास्त्रामध्येदेखील प्रभावी योगदान दिले असून विसाव्या शतकातील उल्लेखनीय मानवशास्त्रज्ञांमध्ये ते सहजपणे स्वत:चे स्थान निर्माण केले. अमेरिकन बोर्ड ऑफ फॉरेन्सिक ॲन्थ्रोपोलॉजिस्टचे ते एक संस्थापक सदस्य होते. त्यांना १९७८ मध्ये डिप्लोमेट (डीएबीएफए) म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या असंख्य न्यायवैद्यक मानवशास्त्रीय लेखनात व्यावसायिक ताणतणावावर उहापोह केला आहे.
केनेडी यांनी आपल्या संशोधन कार्यांव्यतिरिक्त आपली कारकीर्द, विशेषत: व्यावसायिक संस्था, अभ्यासपूर्ण संशोधन पत्रिका, जर्नल्स आणि विद्यार्थी प्रशिक्षण यांच्यासाठी दिली. वर्षानुवर्षे ते अमेरिकन ॲन्थ्रोपोलॉजिकल असोसिएशन (एएए), अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिकल ॲन्थ्रोपोलॉजिस्ट (एएपीए) आणि अमेरिकन अकॅडेमी ऑफ फॉरेन्सिक सायन्सेस या तीन्ही संस्थांसह किमान १९ व्यावसायिक संस्थांचे ते सदस्य होते.
अमेरिकन ॲन्थ्रोपोलॉजिस्ट आणि अमेरिकन जर्नल ऑफ फिजिकल ॲन्थ्रोपोलॉजी या मासीकांसाठी त्यांनी संपादकीय भूमिका स्वीकारल्या. करंट ॲन्थ्रोपोलॉजी, ह्युमन बायोलॉजी, अमेरिकन पॅलेओन्टोलॉजिस्ट इत्यादी जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या तीसहून अधिक पुस्तकांच्या परीक्षणाचे काम त्यांनी केले. त्याच बरोबर त्यांनी दी ॲबॉरिजिनल पॉपुलेशन ऑफ दी ग्रेट बेसिन (१९५४); दी फिजिकल ॲन्थ्रोपोलॉजी ऑफ दी मेगालिथ-बिल्डर्स ऑफ साउथ इंडिया अँड श्रीलंका (१९७५); निंदर्थल मॅन (१९७५); ह्युमन व्हेरिएशन इन स्पेस अँड टाईम (१९७६); साउथ एशिया : इंडिया अंड श्रीलंका (१९९८) इत्यादी पुस्तकांचे लेखन केले आहे.
केनेडी यांचे इथाका (न्यू यॉर्क) येथे निधन झाले.
संदर्भ : Lieverse, Angela R., A Companion to South Asia in the Past, Hoboken, New Jersey, 2016.
समीक्षक : शौनक कुलकर्णी