निवडुंग परिवारातील एक महत्त्वपूर्ण फळ. यामध्ये अधिक प्रमाणात पोषक तत्त्व आणि अँटीऑक्सिडंट, फॉस्फरस व कॅल्शियमसारखी खनिजे व विविध औषधीगुण आहेत. भारतामध्ये या फळाचे क्षेत्र, मागणी, निर्यातक्षमता, औषधी व पोषकमूल्य इ. बाबी लक्षात घेऊन सन २०२१ – २२ या वर्षापासून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.

जमीन व हवामान : या पिकाची लागवड काळी, मुरमाड, कमी खोलीची इत्यादि मध्ये करता येऊ शकते. पाणी साठणार्‍या जमिनीमध्ये निचर्‍याची योग्य काळजी घ्यावी. लागवडीसाठी गादीवाफ्याचा उपयोग करावा. मातीचा सामु ५.५-६.५ योग्य मानला जातो. या फळाची अति व कमी पावसाच्या क्षेत्रामध्ये लागवड केली जाऊ शकते. पिकाच्या वाढीसाठी सरासरी वार्षिक तापमान १९-३३ (किमान-कमाल) सें., फूल आणि फळ धारणा व वाढ यासाठी २०-३० (किमान-कमाल) योग्य मानले जाते.

प्रकार : प्रामुख्याने ड्रॅगन फ्रूटचे पाच प्रकार (फळाच्या सालीचा रंग आणि गराचा रंग) लागवडीस वापरले जातात. त्यापैकी भारतामध्ये लाल साल व पांढरा गर आणि लाल साल व लाल गर प्रकारची लागवड जास्त प्रमाणात आहे. सध्या लाल गराच्या ड्रॅगन फ्रूटला मागणी व दर जास्त मिळत आहे.

रोपे तयार करण्याची पध्दत : ड्रॅगन फ्रूटची रोपे छाट कलम पद्धतीने तयार केली जातात. त्यासाठी कमीत कमी एक वर्ष वयाची, गडद हिरव्या रंगाची, २०-२५ सेमी. लांबीची फांदी निवडावी. निवडलेल्या फांद्या शक्यतो ४-५ दिवसांकरिता सावलीमध्ये सुकण्यासाठी ठेवल्याने रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. गादीवाफा शेणखत मिसळून बनवून घ्यावा व एक ड्रिपची लाइन आंथरून घ्यावी, तसेच १५-२० सेमी. च्या अंतरावर कटिंग लावावीत.

लागवड : सर्वसाधारणपणे ड्रॅगन फ्रूटची लागवड मान्सूनमध्ये ३.५ मी. x ३ मी. किंवा ३ मी. x २.५ मी. अंतरावर करावी. सिंचनाची सोय असल्यास लागवड वर्षभर करता येऊ शकते. अतिउष्ण महिने शक्यतो टाळावेत. हे वेलवर्गीय फळपीक असून लागवडीपूर्वी आधारप्रणाली आवश्यक आहे. त्यासाठी आरसीसी सिमेंट खांबांचा (६ फुट उंच, ४ इंच रुंद, ४०-४५ कि.) व त्यावर चौकोनी किंवा वर्तुळाकार प्लेटचा वापर करावा. रोपे खांबाच्या जवळ व चारही बाजूंना एकरोप लावावे. लागवडीस हेक्टरी ३८०८/५३०० रोपे दिलेल्या अंतरानुसार लागतील.

बागेमधील व्यवस्थापन : मंडप उभारणी व  छाटणी : रोपास येणारे नवीन फुटवे खांबालगत सुतळीच्या साहाय्याने बांधावेत. सुरुवातीच्या काळामध्ये सुधारात्मक छाटणी; ज्यामधे आडवे किंवा जमिनीच्या दिशेने वाढणारे फूटवे काढावेत. शक्यतो प्लेटच्या छिद्राजवळ फांद्यांचा गुच्छ तयार होणार नाही याची खबरदारी घ्यावी. फळांची तोडणी झाल्यानंतर योग्य फांद्यांची छाटणी करावी, जेणेकरून झाडांची निगा राखता येते.

पाणी व खत व्यवस्थापन : ड्रॅगन फ्रुट निवडुंगवर्गीय असल्याने इतर फळ पिकांपेक्षा पाण्याची आवश्यकता कमी आहे. पावसाळ्यामध्ये लागवड केल्यानंतर नियमित पाऊस असेल, तर खते सोडण्याव्यतिरिक्त सहसा पाण्याची आवश्यकता खूप कमी लागते. परंतु हिवाळा व उन्हाळा या दोन ऋतुमध्ये नियमित अंतराने आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. परंतु पाण्याची मात्रा एकवेळेस खूप जास्त राहणार नाही याची दक्षता घ्यावी. योग्य वाढ झालेल्या बागेमध्ये एप्रिल व मे महिन्यामध्ये पाण्याचा योग्य ताण दिल्याने अधिक प्रमाणात फूलधारणा होण्यास मदत होते. ड्रॅगन फ्रूटची मुळे खूप जास्त खोलवर जात नसल्याने सूक्ष्मसिंचन प्रणालीचा वापर करावा.

या पिकास अधिक प्रमाणात खते एका वेळी देण्याचे टाळावे. लागवडीपूर्वी वाफे तयार करताना १०-१५ कि. शेणखत प्रती खांब व ५०-१०० ग्रॅ. डीएपी खांबाच्या चारही बाजूला एकसारखे टाकावे. खडकाळ जमिनीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी ५००:५००:३०० ग्रॅ. (नत्र: स्फुरद: पालाश) ची मात्रा पहिल्या व दुस-या वर्षात चार भागांमध्ये व तिस-या वर्षी ८०० : ९०० : ५५० ग्रॅ. (नत्र: स्फुरद: पालाश) ची मात्रा सहाभागांमध्ये‍ विभाजीत करून दयावीत.

फळधारणा व उत्पादन : ड्रॅगन फ्रुटच्या बागेचे योग्य व्यवस्थापन केल्यास एका वर्षातसुद्धा फुल आणि फळधारणा होण्यास सुरुवात होते. साधारणपणे तिसर्‍या वर्षापासून अधिक उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. पाऊस सुरू झाल्यावर फुले येण्यास सुरुवात होते. ड्रॅगन फ्रूटमध्ये जूनपासून ऑक्टोबर – नोव्हेंबर पर्यंत फुले येतात. परागीकरणापासून साधारणपणे एक ते सव्वा महिन्यात फळाची वाढ पूर्ण होते. सरासरी उत्पादन १०-१२ टन प्रती हेक्टर असते. व्यवस्थापन योग्य ठेवल्याने हे उत्पादन वाढून प्रती हेक्टरी १६-२५ टनापर्यंत जाते.

रोग व कीड व्यवस्थापन : ड्रॅगन फ्रूटमध्ये खूप कमी प्रमाणात रोग व कीटकांचा प्रादुर्भाव होतो. परंतु काही बागांमध्ये खोड कूज (Stem rot), कँकररोग (Canker), क्षतादिरोग (अँथ्रॅक्नोस; Anthracnose) यांसारखे रोग व फळमाशीसारखे कीटक आढळून येतात. यासाठी एकात्मिक रोग व किड व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये निरोगी  रोपे निवडणे, छाटणीनंतर बुरशीनाशकांची फवारणी, निर्जंतुक केलेल्या कात्री वापरणे, उन्हाळ्यामध्ये झाडांचे अति उन्हापासून संरक्षण करणे, रोगनियंत्रणासाठी व फळमाशी सापळे, बागेतील वाळलेल्या गवताचे योग्य विल्हेवाट लावणे व आवश्यकतेनुसार योग्य कीटकनाशकांचा वापर करणे किड नियंत्रणासाठी फायदेशीर ठरते. तसेच ड्रॅगन फ्रुटमध्ये वाळवीचा प्रादुर्भाव काही भागांमध्ये आढळून आला आहे यासाठी क्लोरोपायरीफोस (प्रती २ मिलि. प्रमाणात, २० ईसी) चा वापर करावा. उन्हाळ्यामध्ये फांद्यावरती सनबर्न झाल्याचे दिसून येते. परंतु यातूनसुद्धा झाडांची पुनर्प्राप्ती होते असे आढळून आले आहे. सावलीद्वारे (२०-३०%) फळझाडांचे संरक्षण करता येऊ शकते.

समीक्षक : प्रमोद रसाळ


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.