कानजीलाल, तुषार : (१ मार्च १९३५ ते २९ जानेवारी २०२०) तुषार कानजीलाल यांचा जन्म, आताच्या बांगलादेशातल्या नौखाली येथे झाला. त्यांचा जन्म जरी बांगलादेशात झाला असला तरी भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी त्यांचे कुटुंब पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित झाले. कोलकाता आणि वर्धमान येथे त्यांचे बालपण आणि तरुणपण गेले. कळत्या वयात ते मार्क्सवादाकडे ओढले गेले. डाव्या चळवळीत काम करीत असल्याने  त्यांचे शिक्षण वारंवार खंडित झाले.

पुढे ते तुषार सुंदरबन भागातल्या रंगबेलीया या वाडीवजा छोट्याशा खेड्यात स्थायिक झाले. ते तेथील स्थानिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्य करीत होते. शिक्षण क्षेत्राबरोबरच तेथील स्थानिक प्रश्नावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. रंगबेलीयात पिण्याचे पाणी, पक्के रस्ते, आरोग्यसेवा उपलब्ध नव्हती म्हणून त्यांनी व त्यांच्या पत्नीने रंगबेलीयासारख्या जंगलात वरील गरजेच्या सुविधा आणि इतर सोयी यांच्यावर लक्ष केंद्रित केले. शिक्षणाला उत्तेजन दिले. रंगबेलीया येथे त्यांनी विविध समाजोपयोगी कामासाठी एक अशासकीय संस्था स्थापन केली. ही स्थानिक संस्था पुढे टागोर सोसायटी फॉर रुरल डेव्हलपमेंट ह्या स्वयंसेवी संस्थेत विलीन झाली. या संस्थेच्या माध्यमातून तुषार कानजीलाल यांनी सुंदरबन परिसरातील वीस लाख लोकांचे जीवन सुसह्य केले. त्यांच्यासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या. सुंदरबन परिसरात गेल्यानंतर त्यांच्यावर रवींद्रनाथ टागोर, जयप्रकाश नारायण, पन्नालाल दासगुप्ता यांच्या विचारांचा प्रभाव पडला. १९७५पासून पश्चिम बंगालमधील सुंदरबन येथल्या खारफुटीच्या जंगलाला वाचविण्यासाठी त्यांनी लढा हाती घेतला. टागोर व गांधी यांच्या संकल्पनेवर आधारित त्यांनी पर्यावरणविषयक अनेक सुधारणा घडवून आणल्या.

त्याशिवाय, महिला सहकारी संस्था, कृषी संशोधन केंद्र, पशुसंवर्धन केंद्र असे अनेक उपक्रम तेथील लोकांच्या चरितार्थासाठी चालू केले. मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना त्यांचे सामान्य लोकांशी संबध आले. त्यांनाच हाताशी धरून त्यांनी सुंदरबनचा विकास करण्यासाठी अनेक प्रयोग केले. त्यांची पर्यावरणविषयक आस्था त्यांना स्वस्थ बसू देईना. सुंदरबन हेच कार्यक्षेत्र मानून तेथे त्यांनी पाटबंधारे व्यवस्था विकसित केली.

प्रत्यक्षात ते अर्थशास्त्राचे पदवीधर होते. ते १९६७ पर्यंत राजकारणातही होते. या विद्येचा व राजकीय कारकीर्दीचा त्यांनी परिसर विकासासाठी उपयोग केला. संघटन कौशल्य आणि अनुभव यांच्या जोरावर त्यांनी सूक्ष्म पातळीवर विकासाचे प्रयोग केले. त्यामुळेच सुंदरबनबरोबर तुषार कानजीलाल हे समीकरण लोकांच्या मनात तयार झाले. सुंदरबनचे खारफुटी जंगल वाचविण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. त्यावर त्यांनी ‘हू किल्ड सुंदरबन?’ हे इंग्रजी पुस्तक लिहिले. त्याशिवाय, त्यांनी बंगाली भाषेत अनेक पुस्तके लिहिली. तसेच महत्त्वाची नियतकालिके आणि वृतपत्रे यातून पर्यावरण, समाज यावर लेखन केले. खारफुटीची जंगले व आधुनिक जग यांना जोडणारा दुवा म्हणून त्यांनी काम केले.

त्यांना पद्मश्री आणि जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आले. ते सुंदरबनमध्ये तेथील खारफुटीच्या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी ‘इंटरप्रिटेशन कॉम्प्लेक्स’ नावाची एक संस्था स्थापन करण्याच्या विचारात होते. त्यांच्या प्रयत्नामुळे आज या भागात बँक, सरकारी कार्यालये, दवाखाने, शाळा स्थापन झाल्या आहेत.

तुषार कानजीलाल यांचे कोलकाता येथे निधन झाले.

समीक्षक : अ. पां. देशपांडे