फाइनमन, जोन : (३१ मार्च १९२७ – २२ जुलै २०२०) जोन फाइनमन यांचे बालपण न्यूयॉर्क शहरात गेले. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फाइनमन हे त्यांचे मोठे बंधू. घरातल्या गमतीजमतीच्या प्रयोगांतून विज्ञान जाणून घेण्याची सवय त्यांना आपले वडील आणि भाऊ यांच्याकडून मिळाली.
रिचर्ड फाइनमन यांनी जोन पाच वर्षांची असतांना त्यांना आपल्या प्रयोगशाळेत मदतनीस म्हणून ठेवले होते. एकदा रात्री उशीरा रिचर्ड त्यांना गोल्फच्या मैदानावर घेऊन गेले आणि त्यांनी जोनला हिरवट रंगाचा झळाळणारा ध्रुवीय प्रकाश दाखवला व सांगितले की ह्या प्रकाशाची निर्मिती कशी होते ह्याबद्दल कुणालाच माहित नाही. जोननी पुढे त्याच विषयात मूलभूत संशोधन केले. भावाने दिलेल्या खगोलशास्त्राच्या पुस्तकामध्ये सिसीलिया पेन-गपाश्किन ह्या संशोधिकेबद्दल वाचून त्यांच्या मनात खगोलशास्त्राचे प्रेम जागे झाले आणि आत्मविश्वास मिळाला.
पुढे जोन ऑबरलिन कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र शिकण्यासाठी गेल्या. तिथे डिक हर्शबर्ग यांची ओळख झाली. हर्शबर्ग आणि जोन सिरॅक्युज विद्यापीठामध्ये पुढच्या संशोधनासाठी गेले. तिथे जोननी गणित आणि भौतिकशास्त्र विषयांचा अभ्यास सुरु केला पण त्यांना मानववंशशास्त्रसुद्धा आवडत असे. कुठल्याही विषयामध्ये खोलात जाऊन विचार करण्याची वृत्तीच त्यांना पुढील संशोधनात कामी आली. घन अवस्था भौतिकशास्त्र हा विषय घेऊन “हिऱ्यासारख्या स्फटिकामध्ये अतिरक्त किरणांचे शोषण” ह्या विषयात त्यांनी संशोधनाला सुरुवात केली. १९५८ साली त्यांना पीएच्.डी. मिळाली. त्या आधीच्या वर्षी रशियाने पहिला उपग्रह स्पुटनिक अवकाशात पाठवला. त्यामुळे अवकाश विज्ञान आणि भूभौतिकी हे नवीन विषय जोन ह्यांना साद घालत होते. १९६० साली कोलंबिया विद्यापीठाच्या लॅमॉन्ट वेधशाळेमध्ये त्यांना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्याची संधी मिळाली.
लॅमॉन्टमधील काम त्यांना आवडले. एमआयटी विद्यापीठातील संशोधक चमूने अणुस्फोटाच्या चाचण्यांवर अवकाशातून लक्ष ठेवण्यासाठी मूलकण शोधणारी यंत्रणा पाठवली होती. जोन यांनी त्यातून मिळालेल्या निरीक्षणांमधून पृथ्वीचे चुंबकावरण हे एखाद्या अश्रूबिंदूच्या आकाराचे नसून त्याला सूर्याच्या विरुद्ध दिशेमध्ये एक शेपटीसारखा आकार आहे हे सिद्ध केले. सौरवादळे आणि पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र यांचा अन्योन्य संबंध आहे हेही त्यांनी सिद्ध केले. धृवीय प्रकाशावरील त्यांच्या संशोधनाला इथेच चालना मिळाली. पुढे कॅलिफोर्नियामध्ये गेल्यावरही लॅमॉन्ट वेधशाळेशी संलग्न राहून जोन कार्यरत होत्या पण लवकरच त्यांना नासाच्या एम्स रिसर्च सेंटरमध्ये जॉन स्प्रायटर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाची संधी मिळाली. सूर्याच्या किरीटामधून (कोरोना) वेगाने बाहेर पडणाऱ्या वायूंचे विश्लेषण केले. किरीटातून बाहेर पडणाऱ्या वायूंमधील हेलियमचे प्रमाण तपासून नेमका किती वायू सूर्यामधून बाहेर फेकला जात आहे ह्याचा त्यांनी अभ्यास केला. स्प्रायटर आणि जोन स्टॅनफोर्डमध्ये काम करु लागले. त्याच सुमारास नासाने आपले लक्ष चांद्र मोहिमांवर केंद्रित केले.
१९७३ मध्ये त्यांना कोलरॅडो बोल्डर विद्यापीठाच्या हाय ॲल्टिट्युड वेधशाळेमध्ये काम मिळाले. नंतर त्या वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल सायन्स फाउंडेशनमध्ये प्रशासकीय सेवेची नोकरी करु लागल्या. तिथे तीन वर्षे काढल्यावर त्यांनी मॅसॅच्युसेटसच्या एअरफोर्स जिओफिजिक्स लॅबमध्ये काही वर्षे संशोधन केले.
१९७४ मध्ये जोन अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या पहिल्या महिला पदाधिकारी झाल्या. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनच्या त्या दीर्घ काळ सभासद होत्या. ध्रुवीय प्रकाश, सौरचक्र व त्याचा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावरील परिणाम, हवामान बदल अशा अनेक विषयांत त्यांनी जवळ जवळ १८५ शोधनिबंध लिहिले. तीन विज्ञानविषयक पुस्तके लिहिली. दहा हजार वर्षांपूर्वीच मानव शेती का करु लागला? त्या आधी का नाही याचे उत्तर हवामानातील बदलांवर कसे अवलंबून आहे ह्यावरचे त्यांचे संशोधन महत्त्वाचे मानले जाते. १९८५ पासून ते २००३ पर्यंत त्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीमध्ये काम करत होत्या. २००० साली नासाने त्यांच्या भूचुंबकीय आणि हवामानाशास्त्रातील विशेष कामगिरीबद्दल खास पदक देऊन त्यांना सन्मानित केले. २००४ च्या सेवानिवृत्तीनंतरसुद्धा २०१५ पर्यंत त्या नेहमी कामाला जात असत. त्या म्हणत की सूर्य इतक्या गमतीजमती करतोय, मग मी कशी निवृत्त होऊ?
संदर्भ :
- Hirshberg, C (2002), “My Mother, the Scientist”, Popular Science, Bonnier Corporation
- https://findingada.com/shop/a-passion-for-science-stories-of-discovery-and-invention/joan-feynman-from-auroras-to-anthropology
समीक्षक : हेमचंद्र प्रधान