ड्रॉसेरा मॅग्निफिका ही ड्रॉसेरा वंशातील कीटकभक्षी वनस्पती सर्वांत मोठी दवपर्णी (Sundew) असल्याचा शोध २०१५ मध्ये ‘पावलो गोनीला’ या वनस्पती वैज्ञानिकाने लावला. एका हौशी वनस्पती अभ्यासकाने समाजमाध्यमावर टाकलेल्या छायाचित्रामुळे या भव्य कीटकभक्षी वनस्पतीचा उलगडा झाला.
ड्रॉसेरा मॅग्निफिका ही अमेरिकास्थित कीटकभक्षी दवपर्णी केवळ ब्राझील येथे ‘मिना जराइस’ राज्यातील ‘पिको पद्रे ऐंजलो’ या १५३० मी. उंचीच्या शिखरावर आढळून आल्याने प्रदेशनिष्ठ असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या शिखराच्या दक्षिण उतारावरील ५०×५० मी. भागातील वालुकाश्म परिसरातच या दवपर्णीचा अधिवास असल्याने या वनस्पतीचे अस्तित्व धोक्यात असल्याचा उल्लेख ‘निसर्ग संवर्धनाच्या आंतरराष्ट्रीय संघटने’मार्फत (International Union for Conservation of Nature: IUCN) जाहीर होणाऱ्या लाल यादी (‘रेड लिस्ट) मध्ये आहे.
ड्रॉसेरा मॅग्निफिका ही अक्षय गुच्छाकृत, सरळ व विकसित खोड असलेली, १२३.५ सेमी. लांब भूशायी वा आरोही वाढत जाणारी वनस्पती. मूळ मांसल, काळी, क्वचित शाखा असणारी, घनदाट मूलरोमाच्छादित. घनलोमावरण दोन प्रकारचे आढळते. अग्रंथिल रोम ४ मिमी. लांब असून ते अक्षालगत पानाच्या तळाशी, अक्षविमुख पानाच्या संपूर्ण भागावर, फुलाच्या देठावर, फुलाच्या देठाशी असलेल्या लहान पानावर व बाह्यदलावर असतात, तर ग्रंथिल रोम ०.१ ते ०.५ मिमी. लांब असून ते फुलाच्या देठाशी असलेल्या लहान पानावर बाह्यदलावर दिसतात. पाने हिरवीगार, १००—२४० मिमी. लांब, ३—८ मिमी. रुंद, एका गुच्छात ७—१८ पाने, अग्रे टोकेरी, पानांचे टोक तळाच्या दिशेने आतील बाजूस गुंडाळलेले काही पाने देठविरहित असून त्यांची पातं बाहेरील बाजूस वळलेली असतात. पानांच्या आतील बाजूस असंख्य देठरहित ग्रंथी, तसेच लालसर मांसभक्षक ग्रंथीची शीर्षे सदृश्य असतात. पुष्पबंध हिरवा ते लालसर हिरवा रंग असेलेले, पुष्पबंधास १७—१९० फुले. प्रत्येक फुलात हलक्या गुलाबीसर रंगाच्या ५ पाकळ्या, ५ केसरदल व १.२-१.४ मिमी. व्यासाचे अंडकोश, ३ किंजल तळाशी भंगलेले, ४.०-४.८ मिमी. किंजल्क असतात. फळ १.५-२.५ मिमी. सुकलेले व गोलाकार असून बीज गर्द तपकिरी रंगाचे असते.
संदर्भ :
- Gonella, P., Rivadavia, F. and Fleischmann, A. Droseramagnifica (Droseraceae): the largest New World Sundew, discovered on Facebook. Phytotaxa 220 (3): 257-267, 2015.
समीक्षक : शरद चाफेकर