पुरोहित, आदित्य नारायण : (३० जुलै १९४०-) आदित्य नारायण पुरोहित यांचा जन्म चमोली जिल्ह्यातील किमनी या ठिकाणी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण चमोली जिल्ह्यातील थारली, रुद्रप्रयाग आणि लॅन्डसडाउन या पावरी जिल्ह्यात झाले. त्यांनी बी.एस्सी. आणि एम.एस्सी. आग्रा विद्यापीठातून केली. नंतर त्यांनी पंजाब विद्यापीठात संशोधन सुरू केले आणि त्यांना पीएच्.डी. मिळाली. पुढे त्यांनी सिमाल्याचे केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र, कॅनडाची ब्रिटिश कोलंबिया युनिव्हर्सिटी, शिलाँगची नॉर्थ ईस्टर्न हिल विद्यापीठ आणि एचएनबी गडवाल विद्यापीठामध्ये त्यांनी काम केले. गडवाल विद्यापीठात ते प्राध्यापक आणि अति उंचावरील वृक्ष शरीर विज्ञान (हाय अल्टिट्यूड प्लांट फिजिओलोजी) संशोधन केंद्राचे संचालक होते. हिमालय पर्यावरण जी. बी. पंत इन्स्टिट्यूटचे कुलगुरू हे त्यांचे अखेरचे पद होते. त्यांच्या निवृत्तीनंतर गडवाल विद्यापीठात त्यांच्यासाठी अधिक उंचावरील औषधी आणि सुगंधी वनस्पतीवर संशोधन करण्यासाठी खास पदाची निर्मिती करण्यात आली.
पुरोहित यांचे मुख्य संशोधन रोपाच्या अक्षाच्या वाढी संबंधात होते. शीतकाळात जे पर्वतीय वृक्ष वाढ खुंटल्यासारखे वाटतात त्यांचे प्रजनन शीत कालखंड संपल्यानंतर कसे होते याचा त्यांनी अभ्यास केला. शीतकाळात दिवसाची लांबी कमी होते. त्यामुळे हवेतील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढते. हवेतील अधिक कार्बन डाय-ऑक्साइडमुळे मोठा दिवस असलेल्या काळातील वृक्षांना फुले येतात. प्रकाश संश्लेषण आणि वनस्पतीतील प्रजनन यांचा संबंध त्यांनी दाखवून दिला. पुरोहित यांनी अधिक उंच ठिकाणी येणाऱ्या वृक्षांच्या अभ्यासासाठी ३९६२ मीटर उंचीवर तुंगनाथ (बनियाकुंड – हिमाचल प्रदेश ) येथे संशोधन केंद्र सुरू केले. अशा प्रकारचे हे भारतातील प्रथम संशोधन केंद्र आहे.
समुद्र सपाटीपासून पर्वतावर जसे वर वरजावे तसे थंडी आणि इतर घटकामुळे वृक्ष विविधता कमी होते. युरोपमध्ये आल्प्स पर्वतावर चढणाऱ्या गिर्यारोहकांना एका विशिष्ट उंचीवर व त्याच्या पलीकडे वृक्ष उगवत नाहीत असे लक्षात आले. जे वृक्ष या उंचीवर वाढत होते, ते शंकूकार व त्याच्यावरून पडलेले हिम खाली ओघळेल अशा आकाराचे होते. अशा वृक्षांना अल्पाईन असे म्हणण्याची पद्धत आहे.
ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आकोनाईट, अल्पाईन आणि सबअल्पाईन वृक्ष यांच्या वाढीसाठी प्रयत्न केले. यातील काही वृक्ष औषधी म्हणून महत्त्वाचे आहेत. त्यांचे उत्पादन दहा ते बारा पटीने वाढवण्यात संस्थेचा वाटा आहे. पर्वतीय पर्यावरण आणि पर्वतीय वनस्पती यांच्या अभ्यासात पुरोहित यांनी मोलाची भर घातली आहे.
डेहराडूनमध्ये त्यांनी सुगंधी वृक्ष व वनस्पती केंद्र सुरू केले. ते आंतरराष्ट्रीय सेंटर फॉर माऊंटन डेव्हलपमेंट मंडळाचे सभासद, नेपाळच्या आंतरराष्ट्रीय इन्टिग्रेटेड माऊंटन डेव्हलपमेंटच्या सदस्य मंडळाचे सभासद आणि अमेरिकेतील जर्नल सस्टेनेबल फोरेस्ट्री या जर्नलच्या संपादक मंडळावर होते.
पुरोहित यांना पद्मश्री पुरस्कार, सिसको पुरस्कार, सेट मेमोरिअल अवार्ड, इंडियन सोसायटी ऑफ ट्री सायंटिस्ट सन्मान, आयसीएआरचे वीर केसरी एन्व्हायरॉन्मेंटल कॉन्झर्वेशन अवार्ड, बिरबल साहनी जन्म शताब्दी अवार्ड, अलाहाबादच्या नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्स, नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्स आणि सोसायटी फॉर प्लांट फिजिऑलॉजी अॅन्ड बायोकेमिस्ट्रीवर निवड असे सन्मान लाभले.
संदर्भ :
समीक्षक : मोहन मद्वाण्णा