मारिया, ग्योपर्ट मेअर : (२८ जून १९०६ – २० फेब्रुवारी १९७२) मारिया ग्योपर्ट मेअर यांचा जन्म त्या वेळेच्या जर्मन अंमलाखालील प्रशिया प्रांतामधील काटोविट्ज (Kattowitz) या गावी झाला. मारिया लहान असताना १९१० साली त्यांचे वडील फ्रीडरिश ग्योपर्ट यांची जर्मनीतील गॉटिंजेन विद्यापीठात बालरोगाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली, त्यामुळे हे कुटुंब गॉटिंजेन येथे स्थलांतरीत झाले.
मारिया यांचे सुरुवातीचे शालेय शिक्षण गॉटिंजेन येथील शाळेत झाले. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मध्यमवर्गीय मुलींसाठी ही शाळा होती. पुढे त्यांनी १९२१ मध्ये फ्राऊनस्टुडियम या खाजगी शाळेत प्रवेश घेतला. ही शाळा विसाव्या शतकातील सफ्रजेट्स या स्त्रीहक्क चळवळीशी संबंधित होती. या शाळेत मुख्यत: मुलींना विद्यापीठात प्रवेश मिळण्यासाठी तयारी करून घेतली जात असे. मारियाने १७ व्या वर्षीच अबितूर ही विद्यापीठ प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेत तिच्याबरोबर ३-४ विद्यार्थिनी आणि ३० विद्यार्थी होते, त्यापैकी सर्व विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या तर फक्त एकच विद्यार्थी उत्तीर्ण झाला.
मारिया यांनी गॉटिंजेन विद्यापीठात गणिताच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला. परंतु कालांतराने त्यांना भौतिकीमध्ये विशेष रुची निर्माण झाली आणि त्याच विषयात संशोधन करायचे त्यांनी ठरवले. अणूंमध्ये होत असलेल्या संभाव्य दोन फोटॉनच्या अवशोषणाबद्दलचे सैद्धांतिक संशोधन करून त्यांनी मॅक्स बॉर्न यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्.डी. पदवी मिळविली. या संशोधनप्रबंधाचे परीक्षक मॅक्स बॉर्न हे नोबेल पारितोषिक विजेते आहेत. युजीन विग्नर या नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञाने मारिया यांच्या संशोधनप्रबंधाचे वर्णन सुस्पष्टता आणि नेमकेपणाचा नमुना या शब्दात केले आहे. अर्थातच त्यांच्या सिद्धांताचा प्रायोगिक पडताळा पाहणे त्यावेळी शक्य नव्हते. पुढे लेसरचा शोध लागल्यानंतर याची पडताळणी शक्य झाली. मारिया यांच्या या क्षेत्रातील मूलभूत संशोधनाच्या सन्मानार्थ दोन फोटॉन अवशोषण परिक्षेत्राच्या (two photon absorption cross-section) एककाला GM हे नाव दिले गेले आहे.
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात काम करीत असतानाच त्यांनी दुहेरी बीटा ऱ्हासासंबंधी (double beta decay) शोधनिबंध प्रसिद्ध केला. शिवाय याच संस्थेतील कार्ल हर्झफेल्ड या भौतिकशास्त्रज्ञाच्या बरोबर अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले.
या दरम्यान मारिया यांनी सलग तीन वर्षे प्रत्येक उन्हाळ्यात गॉटिंजेन विद्यापीठात जाऊन मॅक्स बॉर्न यांच्याबरोबर हांडबुख डर फीजिकसाठी लेखन केले; नाझींचा अंमल सुरू झाल्यावर मात्र हे काम बंद पडले.
कोलंबिया विद्यापीठात मारिया यांची ओळख सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ हॅरल्ड यूरी आणि भौतिकशास्त्रज्ञ एन्रिको फर्मी यांच्याशी झाली. एन्रिको फर्मी यांनी अद्यापि विचार न झालेल्या युरेनियमपार मूलद्रव्यांच्या संयुजकवचाचा (valence shell) अभ्यास करण्यास मारिया यांना सुचविले. क्वांटम यांत्रिकीच्या संकल्पनेवर आधारीत थॉमस-फर्मी प्रारूप (Thomas-Fermi model) वापरून मारिया यांनी रेअर अर्थ मूलद्रव्यांप्रमाणे युरेनियमपार मूलद्रव्यांचीसुद्धा एक वेगळी श्रेणी असू शकते असे भाकीत केले. हे पूर्वानुमान पुढे खरे ठरले.
अनेक वर्षे विनावेतन काम केल्यावर पुढे मात्र मारिया यांना न्यूयॉर्कमधील सारा-लॉरेन्स महाविद्यालयात अर्धवेळ अध्यापनाचे, योग्य वेतनावर पहिले काम मिळाले. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर त्यांनी मॅनहॅटन प्रॉजेक्टमध्ये कामाला सुरुवात केली. येथे त्यांनी युरेनियमचे विखंडनक्षम समस्थानिक नैसर्गिक युरेनियमपासून वेगळे करण्यासंबंधी संशोधन केले. दरम्यान एडवर्ड टेलर या आपल्या परिचित संशोधकामार्फत टेलर सुपर बॉम्ब या तापन्यूक्लीय अस्त्रांच्या (thermonuclear weapons) निर्मितीसंबंधी संशोधनामध्ये भाग घेण्याची संधी त्यांना मिळाली. यामध्ये त्यांनी अतिउच्च तापमानाला द्रव्य आणि प्रारण यांचे गुणधर्म काय असतात याचा अभ्यास केला.
दुसरे महायुद्ध संपल्यावर मारिया यांनी शिकागो विद्यापीठात भौतिकीचे अध्यापन करण्यास सुरुवात केली. शिवाय शिकागोपासून जवळच नव्याने स्थापन झालेल्या अरगॉन नॅशनल लॅबोरेटरीमध्ये ज्येष्ठ संशोधक म्हणून इनियाक (ENIAC) या पहिल्या अंकीय संगणकावर (digital computer) काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
येथील वास्तव्यात मारिया यांनी न्यूक्लीय कवचाच्या संरचनेसंबंधी एक गणितीय प्रारूप तयार केले. त्यांनी या प्रारूपानुसार एखाद्या केंद्रकामध्ये ठराविक संख्येने न्यूक्लिऑन असतील तरच ते संरूपण (configuration) स्थिर होते असे प्रतिपादन केले. याच ठराविक संख्यांना युजिन विग्नर यांनी स्थायित्व संख्या (magic numbers) असे नाव दिले. एन्रिको फर्मी यांनी सुचविल्यावरून मारिया यांनी आभ्राम-कक्षा अन्योन्यक्रियेसंबंधी (spin-orbit interaction) आधारतत्त्व (postulate) मांडले. या दरम्यान ओटो हाग्झेल, योहानस जेन्सन आणि हान्स सूएस हे जर्मन शास्त्रज्ञ स्वतंत्रपणे याच विषयासंबंधी संशोधन करीत होते. त्या तिघांनी आणि मारियांनी १९४९ साली काही महिन्यांच्या अंतराने आपापले शोधनिबंध प्रसिद्ध केले. मारियांनी यापैकी योहानस जेन्सन यांच्या बरोबर न्यूक्लीय कवचाच्या संरचनेसंबंधी एका पुस्तकाचे सहलेखन केले. पुढे १९६३ साली मारिया यांना योहानस जेन्सन यांच्यासह याच संशोधनासाठी नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्काराची अर्धी रक्कम या दोघांना देण्यात आली तर उरलेली अर्धी युजीन विग्नर यांना दिली गेली. मेरी क्यूरी यांच्यानंतर दीर्घकाळाने भौतिकीमध्ये नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या मारिया या दुसऱ्या महिला शास्त्रज्ञ ठरल्या.
दरम्यान मारिया यांनी सॅन डिआगो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात भौतिकीच्या प्राध्यापक म्हणून अध्यापन आणि संशोधनाला सुरुवात केली. अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टस् अँड सायन्सेस या संस्थेच्या मानद सदस्य म्हणून आणि अमेरिकन अकॅडमी ऑफ अचिव्हमेंट यांनी मारिया यांना सुवर्णपदक प्रदान केले.
मारिया यांचा सॅन डिआगो येथे हृदयविकाराने मृत्यू झाला. अमेरिकन फिजिकल सोसायटीने मारिया यांच्या स्मरणार्थ भौतिकीमध्ये संशोधन करणाऱ्या तरूण महिला शास्त्रज्ञाला प्रोत्साहनपर एका पुरस्काराची सुरुवात केली आहे. सॅन डिआगोच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात दरवर्षी मारिया यांच्या सन्मानार्थ महिला शास्त्रज्ञांचे एक संमेलन भरवले जाते. तसेच येथील भौतिकी विभागाला मारिया आणि त्यांच्या पतीच्या स्मरणार्थ ’मेअर हॉल’ असे नाव देण्यात आले आहे. शिवाय शुक्र ग्रहावरील एका विवरालाही मारिया ग्योपर्ट मेअर यांचे नाव दिले गेले आहे.
संदर्भ :
समीक्षक : हेमचंद्र प्रधान